अमेरिकेतील पाकचे राजदूत मसूद खान यांचे आतंकवाद्यांशी संबंध असल्याने त्यांची नियुक्ती रहित करा ! – अमेरिकेतील ३ खासदार आणि अ‍ॅटर्नी जनरल यांची मागणी

अशी मागणी का करावी लागते  ? अमेरिकेच्या प्रशासनाला आणि अन्वेषण यंत्रणांना हे लक्षात येत नाही का ? कि पाकप्रेमामुळे ते असे करण्यास कचरत आहेत ? – संपादक

मध्यभागी पाकिस्तानी राजदूत मसूद खान

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे स्कॉट पेरी, डब्ल्यू. ग्रेगरी स्ट्यूब, आणि मेरी ई मिलर या ३ खासदारांनी, तसेच अटर्नी जनरल मेरिक गारलँड यांनी अमेरिकेत नियुक्त करण्यात आलेले पाकिस्तानी राजदूत मसूद खान यांची नियुक्ती रहित करण्याची मागणी केली आहे. ‘खान यांचे आतंकवादी संघटनांशी संबंध असून त्याची चौकशी करण्यात यावी’, अशी मागणीही त्यांनी केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील असलेले मसूद खान यांना पाकने गेल्या वर्षी नोव्हेंबर मासामध्ये अमेरिकेतील पाकचे राजदूत म्हणून नियुक्त केले होते.

या खासदारांचे म्हणणे आहे, ‘खान हे उघडपणे आतंकवाद्यांचे समर्थन करत आहेत. त्यांची अमेरिकेच्या ‘विदेशी एजंट नोंदणी कायद्या’चे (फेरा’चे) उल्लंघन केल्याच्या प्रकरणी चौकशी करण्यात यावी. पाक सरकारी हस्तकांना अमेरिकेच्या विरोधात वापरून घेतो, हा त्याचा इतिहास आहे. वर्ष २०११ मध्ये व्हर्जिनिया येथील काश्मिरी अमेरिकन कौन्सिलचा नेता गुलाम नबी फाई याच्यावर ‘पाकचा हस्तक’ म्हणून काम करण्याचा आरोप होता आणि तो त्याने स्वीकारलाही होता. मसूद खान अमेरिकेमध्ये भारताला लक्ष्य करण्याच्याही प्रयत्नात आहेत.

अमेरिकी खासदाराकडून पाकला ‘आतंकवाद प्रायोजित करणारा देश’ घोषित करण्यासाठी विधेयक

पेन्सिलवेनिया राज्यातील अमेरिकेचे खासदार स्कॉट पेरी यांनी पाकिस्तानला ‘आतंकवादाला प्रयोजित करणारा देश’ घोषित करण्यासाठी संसदेमध्ये एक विधेयक आणले आहे. हे विधेयक ‘यू.एस्. हाऊस कमेटी ऑन फॉरेन अफेयर्स’कडे पाठवण्यात आले आहे.