आसामच्या खासगी मदरशांमध्ये आतंकवादी सिद्ध केले जात आहेत ! – भाजपचा आरोप

आसामध्ये भाजपचेच सरकार असतांना भाजपने अशा मदरशांची चौकशी करून त्यात ते दोषी आढळले, तर त्यांवर बंदी घातली पाहिजे ! – संपादक

प्रातिनिधिक छायाचित्र

गौहत्ती (आसाम) – आसामच्या खासगी मदरशांमध्ये आतंकवादी सिद्ध केले जात आहेत. या मदरशांमधून देशविरोधी कारवाया चालू आहेत, असा आरोप भारतीय जनता पक्षाच्या आसाम शाखेने केला आहे. मदरसे सरकारच्या सूचनांचे पालन करत आहेत कि नाही ?, यावर लक्षात ठेवण्याचा आदेश भाजपने राज्य प्रशासनाला लिदा आहे.

चापोरी भागात असलेल्या चार मदरशांमध्ये ‘अल् कायदा’ या कट्टर जिहादी आतंकवादी संघटनेसाठी ‘स्लीपर सेल’ (छुप्या पद्धतीने आतंकवादी कारवाया करणे) सिद्ध केले जात आहेत. गेल्या काही वर्षांपासून हे कार्य चालू आहे, असा आरोप भाजपचा प्रवक्ते रणजीब कुमार शर्मा यांनी येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत केला. खासगी मदरशांमध्ये सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जात नाही. काँग्रेसने आतापर्यंत अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करण्याचे काम केले. त्यांनी कधीही आतंकवादाच्या विरोधात आवाज उठवला नाही. ‘ए.आय.यू.डी.एफ्.’ आणि ‘ए.एम्.एस्.यू’ यांनी नेहमीच इस्लामी आतंकवादी संघटनांची बाजू घेतली आहे, असाही आरोप शर्मा यांनी केला.