पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्रपती झेलेंस्की यांच्याशी संवाद !

१. सध्याचे युद्ध म्हणजे रशियाच्या सैन्याकडील अफाट शक्ती आणि युक्रेनच्या सैन्याचे मनोबल, युद्ध कौशल्य अन् नेतृत्व यांच्यातील लढाई !

‘रशियाच्या सैन्याला जे यश अपेक्षित होते, तेवढे यश मिळालेले नाही. याची अनेक कारणे आहेत. रशियाचे सैन्य युक्रेनच्या २०० ते २५० किलोमीटर आत घुसले आहे. रशियाच्या सैन्यासाठी लागणारे धान्य, पाणी, दारूगोळा, पेट्रोल आदी साहित्य आणणार्‍या रशियाच्या ताफ्यांवर युक्रेनचे सैन्य किंवा नागरिक आक्रमण करत आहेत. त्यामुळे रशियाच्या सैन्याला पुरेशी सामुग्री मिळत नाही. रशियाचे रणगाडे आणि चिलखती वाहने हे मोकळ्या मैदानातून जाऊ शकत नाहीत; कारण बर्फ पडल्याने तो भाग अतिशय मऊ झाला आहे. त्यामुळे रशियाचा युद्धसामुग्री आणण्याचा वेग मंदावला आहे. रशियाकडे युद्धसामुग्रीची कमतरता नसून त्यांना ते आणण्यास अडचण येत असल्याने युद्धाला विलंब होत असण्याची शक्यता आहे. रशियाच्या सैन्याने ज्या शहरांना वेढा दिला आहे, त्यांना तेथील इमारतीमध्ये असलेल्या युक्रेनच्या सैनिकांना मारावे लागेल, तसेच त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वातही पालट करावा लागेल. सध्या चालू असलेले युद्ध म्हणजे रशियाच्या सैन्याकडे असलेली अफाट शक्ती आणि युक्रेनच्या सैन्याचे मनोबल, युद्ध कौशल्य अन् नेतृत्व यांच्यामध्ये आहे.

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

२. दोन्ही देशांचे राष्ट्रपती भारताच्या पंतप्रधानांशी चर्चा करत असल्याने जगात भारताचे राजनैतिक महत्त्व वाढणे

एवढ्या मोठ्या प्रमाणात युद्ध चालू असतांनाही पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी तिसर्‍यांदा बोलणी केली आणि अनुमाने ती ५० मिनिटे चालली. एवढेच नव्हे, तर त्यांनी युक्रेनचे राष्ट्रपती झेलेंस्की यांच्याशीही ४० मिनिटे बोलणी केली. एवढे महत्त्वाचे युद्ध चालू असतांना दोन्ही राष्ट्रपती भारताच्या पंतप्रधानांशी बोलत असतील, तर भारताचे राजनैतिक महत्त्व किती वाढले आहे, याची कल्पना येते. या राष्ट्रपतींशी बोलल्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठीच्या मोहिमेत बर्‍यापैकी यश मिळाले आहे. युक्रेनमध्ये १८ सहस्र विद्यार्थी होते. त्यापैकी ७०० ते ८०० विद्यार्थी अजूनही दोन शहरांमध्ये अडकलेले आहेत. युद्धबंदी झाली, तरच त्यांना तेथून बाहेर येता येणार आहे. त्यासाठीच भारत या दोन देशांशी पुनःपुन्हा बोलणी करत आहे. महत्त्वाचे म्हणजे ते भारताचे बोलणे ऐकून युद्धबंदी करत आहेत. ‘ते केवळ भारतासाठीच युद्धबंदी करत आहेत’, असे म्हणणे योग्य होणार नाही; कारण रशियालाही त्यांचे अन्नपाणी आणि युद्धसामुग्री पुढे आणायची आहे. त्यामुळे त्यांनाही मध्ये मध्ये विश्रांतीची आवश्यकता असते. या माध्यमातून ‘आम्हाला नागरिकांना मारायचे नाही, तर त्यांना सुरक्षित मार्ग द्यायचा आहे’, असा संदेश त्यांना जगाला द्यायचा आहे. यासमवेतच युक्रेनलाही मध्ये मध्ये विश्रांती हवीच आहे. आजच्या स्थितीला भारताखेरीज जगात असे कुठलेही राष्ट्र नाही, ज्याने अशा प्रकारे दोन्ही राष्ट्रांशी बोलणी केलेली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पटलावर भारताचे निश्चितच महत्त्व वाढले आहे. त्याचा सर्वाधिक लाभ आपल्या ८०० विद्यार्थ्यांना व्हायला पाहिजे, जे तेथे अडकून पडले आहेत. ते रशियाच्या किंवा पोलंडच्या मार्गाने परत येतील.

(सौजन्य : Brig Hemant Mahajan,YSM)

३. …तर भारत दोन्ही राष्ट्रांची मध्यस्थी करू शकणे

पंतप्रधान मोदी यांनी रशिया आणि युक्रेन यांना थेट बोलण्यास सांगितले आहे. या दोन देशांच्या मध्ये भारत विशेष भूमिका बजावू शकतो. रशिया आणि युक्रेन यांना वाटले, तर ते भारताचे साहाय्य घेऊ शकतात. आज अमेरिका मध्यस्थी करायला सिद्ध नाही आणि युरोपचे महत्त्व उरलेले नाही. अशा स्थितीत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला कुणी विचारत नाही. त्यामुळे पुतिन आणि झेलेंस्की यांनी मान्य केले, तर भारत मध्यस्थी करू शकतो. त्यामुळे हे दोघेही यासाठी कधी सिद्ध होतील ? याची वाट पहावी लागेल.

४. भारताने भारतियांच्या सुरक्षेकडे प्राधान्याने लक्ष द्यावे आणि त्यानंतर त्याने रशिया अन् युक्रेन यांना साहाय्य करावे !

‘हे युद्ध संपले नाही, तर आम्ही युक्रेनला जगाच्या नकाशावरून संपवून टाकू’, अशी धमकी पुतिन यांनी दिली आहे. आतापर्यंत असे कोणतेही पारंपरिक शस्त्र राहिले नाही, ज्याचा पुतिन यांनी वापर केला नाही. आता त्यांच्याकडे केवळ एकच शस्त्र शेष आहे, ते म्हणजे ‘फादर ऑफ ऑल बाँब !’ हा असा पारंपरिक बाँब आहे, जो अतिशय शक्तीशाली आहे. त्याची शक्ती ४० टी.एन्.टी. (४० टन ट्रायनायट्रोटोल्यूइन) आहे. त्याचा वापर करू, अशी धमकी पुतिन सर्वांना देत आहेत. युद्धामध्ये ‘फादर ऑफ ऑल बाँम्ब’ वापरला गेला, तर प्रचंड हानी होईल, यात काही शंका नाही. याखेरीज जो अणूकचरा असतो, त्याच्या किरणोत्सर्गाचा वापर केला जात आहे. तसेच अणूबाँब वापरण्याच्याही धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे मला वाटते की, अशा वेळी भारताने केवळ आपल्या नागरिकांच्या सुरक्षेकडे बघावे. त्यांना आधी बाहेर काढावे आणि त्यानंतर रशिया अन् युक्रेन यांना साहाय्य करावे.’

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.