पाकमध्ये वर्ष २०२१ मध्ये ईशनिंदेच्या प्रकरणांमध्ये निम्मे आरोपी मुसलमानच !

(ईशनिंदा म्हणजे श्रद्धास्थानांचा अवमान करणे)

पाकमध्ये मुसलमानच मुसलमानांवर ईशनिंदेचा आरोप करत असतील, तर अन्य धर्मियांची काय स्थिती असेल, हे लक्षात येते ! – संपादक

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमध्ये वर्ष २०२१ मध्ये ईशनिंदेच्या प्रकरणांतील निम्मे आरोपी मुसलमानच होते, अशी माहिती ‘सेंटर फॉर सोशल जस्टिस’च्या ‘ह्युमन राईट्स ऑब्झर्व्हर २०२२’च्या अहवालात देण्यात आली आहे. या अहवालानुसार वर्ष २०२१ मध्ये ईशनिंदेच्या प्रकरणांत एकूण ८४ जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले होते, त्यांतील ४२ मुसलमान, २५ अहमदी, ७ हिंदू, ३ ख्रिस्ती, तर उर्वरित ७ अन्य होते.

१. या अहवालात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत ईशनिंदेचे अनेक खोटे आरोप करण्यात आले आहेत. यामुळे जमावाकडून हत्या आणि अन्य गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. व्यक्तीगत द्वेष आणि मुसलमानेतरांच्या विरोधातच नव्हे, तर मुसलमानांच्याही विरोधात ईशनिंदा कायद्याचा दुरुपयोग केला जात आहे.

२. पाकमध्ये ईशनिंदेच्या प्रकरणांत आरोपीचे वकीलपत्र घेण्यास अधिवक्ते घाबरतात. काही प्रकरणांमध्ये आरोपींचा बचाव करणार्‍या अधिवक्त्यांवर आक्रमणे करण्यात आली आहेत. मुलतान येथे पूर्वी एका आरोपीच्या अधिवक्त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यामुळे अधिवक्ते ही प्रकरणे लढवण्यास नकार देतात. परिणामी आरोपी अनेक वर्षे कारागृहातच खितपत पडतो. अनेकदा खोट्या आरोपांमुळे व्यक्तीला शिक्षा भोगावी लागते. काही कनिष्ठ न्यायालयांमध्ये तर चौकशीपूर्वीच आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावली जाते.

३. लाहोर उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधिशाची त्यांच्या कार्यालयामध्येच गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या न्यायाधिशाने ईशनिंदेच्या प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता केली होती.