युक्रेन-रशिया युद्धाचा भारतियांसाठी बोध !

सध्या चालू असलेल्या युद्धातून भारतियांनी बोध घेऊन युद्धपूर्वसिद्धता करावी !

युक्रेन आणि रशिया यांच्या शिष्टमंडळाची चर्चा निष्फळ

२८ फेब्रुवारी या दिवशी झालेली युक्रेन आणि रशिया यांच्या शिष्टमंडळाची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर रशियाने तात्काळ परत आक्रमण चालू केले आणि १ मार्चला सकाळपर्यंत युक्रेनचे ७० सैनिक मारलेही गेले होते. आतापर्यंत हळूहळू आक्रमण करणारी रशिया आता मोठ्या शक्तीनिशी आक्रमण करील, अशी शक्यता १ मार्चला दुपारपर्यंत तरी निर्माण झाली आहे. महायुद्धाच्या सहाव्या दिवशी युद्ध आता अधिक गंभीर वळणावर जाण्याची चिन्हे स्पष्ट आहेत; कारण ‘रशिया आता नौसेनेचा वापर करणार आहे’, अशी वृत्ते येत आहेत. आतापर्यंत सर्व बाजूंनी घेरलेल्या युक्रेनमधील सैन्यतळां नंतर रशियाने शहरातील रहिवासी इमारती यांना लक्ष्य केले आणि आता शासकीय इमारतीवर ‘व्हॅक्युम बाँब’ (प्राणवायू शोषून घेणारा बाँब) टाकला. हा बाँब प्राणांतिकच आहे.

तिसर्‍या महायुद्धाचे मूळ कारणही ‘तेल’ हेच ठरले आहे

तेलसाठे हेच युद्धाचे मूळ कारण !

या युद्धाची वरवरची अनेक कारणे दिसत असली, तरी तज्ञांच्या मते अनेक वर्षे सांगितले जात असलेले तिसर्‍या महायुद्धाचे मूळ कारणही ‘तेल’ हेच ठरले आहे. आज जग ज्या कच्च्या तेलावर चालत आहे, त्याचा ५० टक्के भाग हा सौदी अरेबिया आणि तेथील भागांत अन् ५० टक्के भाग हा रशिया आणि शेजारील भागांत आहे. सौदीकडील तेल निर्यात करणार्‍या देशांच्या ‘ओपेक’ या संघटनेवर अमेरिकेचे वर्चस्व आहे, तर रशियाच्या भागात जे तेलसाठे आहेत, त्यावर अर्थात् रशियाचे. दोन्ही भागांतील देशांची अर्थव्यवस्था तेलनिर्यातीवर अवलंबून आहे. रशियाने तेलाच्या किमती न्यून केल्या, तर सौदीकडील देशांना त्या करणे भाग पडते. रशिया सध्या सर्व शस्त्रास्त्रांच्या दृष्टीने मोठा आहे. त्याच्याकडे ६ सहस्रांहून अधिक अणूबाँब असून ही संख्या अमेरिकेपेक्षा अधिक आहे. अणूबाँबचा अचूक ठिकाणी मारा करणारी आणि त्याची आक्रमणे परतवणारी यंत्रणा यातही रशिया सक्षम आहे. अमेरिकेला रशियाला सतत शह द्यायचा असतो. या युद्धामुळे रशियाची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी अमेरिका, ब्रिटनसह युरोपीय महासंघाने (‘ईयु’ने) निवडक रशियन बँकांची ‘स्विफ्ट’ या जागतिक आर्थिक संदेश प्रणालीतून हकालपट्टी केली आहे. रशियाच्या मध्यवर्ती बँकेवरही निर्बंध आणले आहेत. रशियाची आर्थिक क्षमता नियंत्रित करून रशियाचा युद्धासाठीचा अर्थपुरवठा खंडित करण्याचा अमेरिका आणि मित्रराष्ट्र यांचा हेतू आहे.

झेलेंस्की यांची मानसिकता !

आंतरराष्ट्रीय स्तरावर युक्रेनने आतापर्यंत सतत भारताच्या विरोधात भूमिका घेतली होती; तरीही संकट आल्यावर कुठलीही भीड किंवा लाज न बाळगता उलट महाभारत, चाणक्यादी प्राचीन भारतीय सैद्धांतिक उदाहरणांचे दाखले देऊन व्लोदिमिर झेलेंस्की यांनी भारताला साहाय्य करण्याचे भावनिक आवाहन केले. अर्थात् भारताने त्याला बळी न पडणे योग्यच होते. शक्तीशाली रशिया मागे न हटता सर्व बाजूंनी पुढे येत आहे आणि राजधानीला गिळंकृत करत आहे, तरीही रशियाच्या सैनिकांना ‘मारले जाल’, म्हणून मागे हटण्याचे आवाहन करत प्रतिआक्रमण ते करत आहेत. राष्ट्राध्यक्षाने स्वतः रणांगणात उतरणे, हे योग्य कि अयोग्य ? याविषयीचा अभ्यास वेगळा असू शकतो; मात्र झेलेंस्की यांनी रणांगणात स्वतः उतरण्याला न्यून लेखता येणार नाही. हार समोर दिसत असूनही त्यांनी कच खाल्लेली नाही, हे येथे नोंद घेण्यासारखे आहे.

भारतियांनी काय बोध घ्यावा ?

‘युद्धस्य कथा रम्यः’ (युद्धाच्या कथा मनोरंजन करतात), असे काळ उलटून गेल्यानंतर वाटत असले, तरी ज्यांनी ते स्वतः भोगलेले असते, त्यांच्यासाठी ते दाहक आठवणींहून अधिक वेगळे नसते. रशिया सर्वदृष्ट्या शक्तीशाली असल्यामुळे युक्रेनची स्थिती आरंभीपासूनच कमकुवत असल्याचे स्पष्ट असूनही अनेक प्रसंगातून ‘युक्रेनी जनतेचा युद्धातील उत्स्फूर्त सहभाग’ हा भाग शिकण्यासारखा आहे. झेलेंस्की यांनी आवाहन केल्यावर कधीही हातात शस्त्र न धरलेल्या जनतेने हातात शस्त्र घेऊन ते चालवण्याचे प्रशिक्षण घेतले. युक्रेनची ‘मिस युनिव्हर्स’ही (सौंदर्यस्पर्धेतील विजयी) हातात मोठे थोरले शस्त्र घेऊन रस्त्यावर उतरली. उद्या भारतात अशी वेळ आलीच, तर किती अभिनेत्रींमध्ये हे धैर्य येईल ? एक युक्रेनी महिला रस्त्यावर असलेल्या रशियाच्या रणगाड्यात जाऊन बसली आणि तिने प्रयत्न करून तो चालवायचा कसा ते शिकून त्याचा व्हिडिओ प्रसारित केला. युक्रेनमधून प्रसारित झालेले असे काही व्हिडिओ हे युक्रेनी जनतेचे देशप्रेम दर्शवतात. युद्धकाळात या नागरिकांनी देशाला उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला आहे. भारतात युद्ध चालू झाल्यावर ‘देशविरोधकांनी त्यांची तोंडे बंद ठेवली, तरी पुष्कळ झाले’, अशी स्थिती आहे. युद्धकाळात अनेक गुणांसह ‘आज्ञापालन’ हा गुण सर्वांत महत्त्वाचा ठरतो. आपल्याकडे पुराचे पाणी भरल्यावरही लोक घर सोडायला सिद्ध नसतात, तर युद्धकाळात कसे करणार ? युक्रेन सोडण्याविषयी विद्यार्थ्यांना भारताकडून गेल्या अनेक दिवसांपासून सांगण्यात येत होते; परंतु ‘तशी कृती झाली नाही’, असेही आता पुढे येत आहे. ‘तिसरे महायुद्ध चालू होण्याचे दिवस जवळ आले आहेत’, असे अनेक भारतियांना सांगूनही खरे वाटत नव्हते. आता चालू झालेल्या युद्धाचे ढग भारतापर्यंत यायला अधिक काळ लागणार नाही. आतापर्यंत ३ लाखांहून अधिक नागरिकांनी युक्रेन सोडले आहे. उद्या तिसर्‍या महायुद्धाचा वणवा वाढला, तर भारतियांची विविध प्रकारची पूर्वसिद्धता असणे आवश्यक आहे. त्यासाठी भारतियांनी वैयक्तिक स्तरावर काय सिद्धता केली आहे ? युद्धात सर्वाधिक लोक हे इमारतीवर बाँब पडल्यावर लागलेल्या आगीत मरत आहेत. भारतात किती जणांना अग्नीशमन प्रशिक्षण येते ? किती जणांना प्रथमोपचार करता येतात ? युद्ध अधिक काळ चालले, तर धान्य, औषधे, अत्यावश्यक गोष्टी यांचा साठा करण्याविषयी काही पूर्वसिद्धतेचा अभ्यास झाला आहे का ? लयाची देवता असलेल्या महादेवाची उपासना करणारे भारतीय खरे तर देव, अवतारी संत आणि ऋषिमुनी यांच्या कृपेमुळेच तरून जात आहेत. येत्या युद्धकाळातही भक्त तरून जाणार आहेत; पण सध्याच्या युद्धातून भारतियांनी बोध घेऊन सर्व स्तरांवर स्वतःची सिद्धता ठेवणे श्रेयस्कर ठरेल !