पुणे येथे ‘एम्.बी.ए.’च्या बनावट पदवी आणि गुणपत्रिका देणार्‍या दोघांना अटक !

शैक्षणिक क्षेत्रातील वाढते घोटाळे नवीन पिढीला बरबाद करत आहेत, हे लक्षात घेऊन घोटाळा करणार्‍यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे.  बनावट पदवी देऊन तरुणाईला बिघडवण्याचे काम करणारे शिक्षण क्षेत्राला कलंकच आहेत.

पुणे – कानपूर येथील एका विद्यापिठाच्या नावाने ‘माईर्स एम्.आय.टी. महाविद्यालया’ला ‘एम्.बी.ए.’च्या बनावट पदवी आणि गुणपत्रिका देऊन त्यांची ५८ लाख १७ सहस्र रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एम्.आय.टी.चे कुलसचिव महेश देशपांडे, तसेच स्वप्नील ठाकरे या दोघांना अटक केली आहे. तसेच माधव पाटील नावाच्या व्यक्तीवर गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी ‘एम्.आय.टी.’ संस्थेचे डॉ. जयदीप जाधव यांनी कोथरूड पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट केली आहे. हा प्रकार वर्ष २०१४ ते २०१८ या कालावधीमध्ये घडला आहे. एकूण २९२ विद्यार्थ्यांना अशा बनावट पदव्या वितरित केल्याचे समजते. (बनावट पदव्या घेऊन उत्तीर्ण झालेले विद्यार्थी देशाचे भवितव्य काय घडवणार ? – संपादक)

काही विद्यार्थी संबंधित प्रमाणपत्र घेऊन चाकरी मिळवण्यासाठी गेल्यानंतर ते प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले. त्यानंतर संस्थेने चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.