समर्थ रामदासस्वामी यांनी परमार्थाशी अनुसंधान ठेवून राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी केलेले राजकारण !

२५ फेब्रुवारी २०२२ या दिवशी ‘रामदासनवमी’ आहे. त्या निमित्ताने…

२५ फेब्रुवारी २०२२ या दिवशी रामदासनवमी असून त्या निमित्ताने समर्थ रामदासस्वामी यांनी परमार्थाशी अनुसंधान ठेवून राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी राजकारण कसे केले ? याविषयीचा लेख येथे देत आहोत.

(उत्तरार्ध)

या लेखाचा आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/555861.html

समर्थ रामदासस्वामी

४ ए. त्या वेळच्या समाजस्थितीनुसार हरिकथा निरूपणाला राजकारणाची जोड देण्याविना गत्यंतर नसणे : ‘समर्थ रामदासस्वामी मुळात भक्तीमार्गी होते. देवधर्माची स्थापना हे त्यांचे अंगीकृत कार्य होते. त्यांनी राजकारणाला भक्तीनंतरचे स्वप्न दिले आहे. त्यांचे आचार-विचार, आचरण आणि उपदेश यांची देवकारण अन् राजकारण ही दोन महत्त्वाची अंगे होती. त्या काळच्या एकूण समाजस्थितीविषयी त्यांना जी चिंता लागली होती, तिचे स्वरूप लक्षात घेता हरिकथा निरूपणाला राजकारणाची जोड देण्याविना गत्यंतरच नव्हते.

४ ऐ. ‘राजा हाच काळाला कारण असतो’, हे वचन लक्षात ठेवून समर्थांनी राष्ट्रोत्थानासाठी शक्तिदेवतेला प्रार्थना करणे

कालो वा कारणं राज्ञो राजा वा कालकारणम् ।
इति ते संशयो मा भूत् राजा कालस्य कारणम् ।।

– महाभारत, पर्व ५, अध्याय १३२, श्लोक १६

अर्थ : ‘काळ हा राजाचे कारण आहे किंवा राजा काळासाठी कारण आहे’, याविषयी शंका घेऊ नये. (वस्तुतः) राजा हाच काळाला (जनतेच्या सुख-दुःखाला) कारणीभूत असतो.

हे वचन समर्थ रामदासस्वामी कधीही विसरले नाहीत आणि म्हणूनच राष्ट्रोत्थान अन् राष्ट्रप्रतिष्ठा या ध्येयभावनेपोटीच त्यांनी तुळजाभवानीच्या स्तोत्रात शक्तिदेवतेला प्रार्थना केली.

५. कर्मयोगाला व्यवहारवाद आणि प्रयत्नवाद यांची जोड देऊन त्याची परिणती ऐहिक जीवनाच्या उत्कर्षात  करणारे एकमेव संत समर्थ रामदासस्वामी !

देव मस्तकी धरावा । अवघा हलकल्लोळ करावा ।।

याप्रमाणे त्यांच्या या राजकारणाचे कार्य होते. ते प्राधान्याने संत होते. ‘देवकारण, रामाची उपासना, भक्तीचा प्रसार’, ही त्यांची मुख्य उद्दिष्टे होती. त्यांनी ठिकठिकाणी अकराशे मठ स्थापन केले होते. त्यांनी लोकांना हरिकथा निरूपणापासून प्रपंच आणि परमार्थ यांचे संमीलन करायला सांगितले. समर्थ चातुर्याने राजकारण करायला सांगतात. ‘चातुर्य म्हणजेच राजकारण’, असे त्यांना मुळीच म्हणायचे नव्हते. चातुर्य, प्रयत्न, उपाधी आणि राजकारण इत्यादींतून त्यांचा एकच दृष्टीकोन दिसतो, तो म्हणजे ‘विवेकवाद.’ समर्थांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कर्मयोगाला व्यवहारवाद आणि प्रयत्नवाद यांची जोड देऊन त्याची परिणती ऐहिक जीवनाच्या उत्कर्षात केली. असे करणारे समर्थ रामदासस्वामी एकमेव संत ठरावेत.

६. ‘ब्राह्मणवर्ग सुव्यवस्थित राहिला, म्हणजे चारही वर्ण सुव्यवस्थित रहातील’, अशी व्यापक आणि भव्य दृष्टी असणारे समर्थ रामदासस्वामी !

समर्थ रामदासस्वामी हे ब्राह्मणांचे कैवारी आणि पुरस्कार करणारे वाटतात. त्यामागची त्यांची डोळस भूमिका फारसे कुणी लक्षात घेत नाही. लौकिक व्यवहारात समतेचे ध्येय महत्त्वाचे असले, तरी ‘कोणती ना कोणती व्यवस्था ही मानलीच पाहिजे’, असा त्यांचा दृष्टीकोन होता. यासाठीच त्यांनी लौकिक क्षेत्रातील जातीभेद पारमार्थिक क्षेत्रातही कायम ठेवला; म्हणूनच त्यांचे आनंदभुवनाचे स्वप्न साकार होऊन बहुजन समाजही सुखी होऊ शकला. ब्राह्मणांना जागे करून त्यांना धर्मस्थापनेचे कार्य करायचे होते. ‘एक ब्राह्मणवर्ग सुव्यवस्थित राहिला, म्हणजे चारही वर्ण सुव्यवस्थित रहातील’, असा विश्वास व्यक्त करण्यातील त्यांची व्यापक आणि विशाल दृष्टी भव्यच म्हटली पाहिजे.

७. ‘सर्वांचा अंतरात्मा हा एकच आहे’, असे मानून उच्चतम मानवी नीतीची भक्तीशी सांगड घालणे’, हे समर्थांचे ध्येय असणे

त्यांचा ‘महाराष्ट्र धर्म’ हा केवळ चातुर्वर्ण्यप्रधान ब्राह्मणवर्ग किंवा वैदिक धर्मच होता’, असे मुळीच नाही; कारण ते म्हणतात,

सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें ।
परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ।।

– दासबोध, दशक २०, समास ४, ओवी २६

अर्थ : जो कुणी जे जे कार्य करतो, त्याला त्या कार्यानुसार सामर्थ्य प्राप्त होते; परंतु ‘कुठलेही कार्य आणि चळवळ याला भगवंताचा आश्रय असतो’, अशी दृढ श्रद्धा पाहिजे.

या त्यांच्या म्हणण्यातले मर्म पूर्णार्थाने लक्षात घेतले पाहिजे. ‘सुसंघटित अशा सामाजिक जीवनाच्या निर्मितीसाठी ‘परंपरेने ज्ञान प्राप्त झालेले ब्राह्मण आणि क्षात्रधर्म जोपासलेले क्षत्रिय यांना प्रबुद्ध करणे, तसेच ‘पारमार्थिक जीवनात उच्च-नीच, स्पृश्य-अस्पृश्य या सर्वांचा अंतरात्मा एकच आहे’, असे मानून उच्चतम मानवी नीतीची भक्तीशी सांगड घालणे’, हे त्यांचे ध्येयलक्ष होते.

८. समर्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यवर्धनासाठी आवश्यक असणारी धार्मिक, नैतिक आणि वैचारिक जागृती करणे

समर्थ रामदासस्वामींनी स्वतः प्रत्यक्ष राजकारणात भाग घेतला नाही; पण भाग घेऊनही त्यांना जे करता आले नसते, ते त्यांनी अलिप्तपणे करून दाखवले, हे विशेष ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला त्यांचे कार्य पोषक होते; पण याचा अर्थ ‘समर्थ रामदासस्वामी होते; म्हणून छत्रपती शिवाजी महाराज तरले’, असा नाही. समर्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यवर्धनाला आवश्यक असणारी धार्मिक, नैतिक आणि वैचारिक जागृती केली अन् ही क्रांती स्वराज्यक्रांतीला निश्चितच साहाय्यकारी ठरली.

९. राजकारणाविषयी प्रबोधन करणारी काही महत्त्वाची सूत्रे

जो दुसर्‍यावरी विश्वासला । त्याचा कार्यभाग बुडाला ।
जो आपणचि कष्टत गेला । तोचि भला ।।

– दासबोध, दशक १९, समास ९, ओवी १६

अर्थ : जो मनुष्य सर्वस्वी दुसर्‍यावर अवलंबून असतो, त्याचे कार्य होत नाही. जो स्वतःच झटून प्रयत्न करतो, त्याचे कार्य लवकर सिद्धीस जाते.

असे म्हणून समर्थ अनेक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांना राजकारणाचे ज्ञान मार्मिकपणाने देतांना दिसतात. त्यांनी आपले कार्यही तसेच चातुर्यानेच केले आहे.

अधिकार पाहोन कार्य सांगणें ।
साक्षेप पाहोन विश्वास धरणें ।।

– दासबोध, दशक ११, समास १०, ओवी २३

अर्थ : ‘ज्याचा त्याचा अधिकार पाहून त्यास अनुसरून कार्य सांगावे. त्याची काम करण्याची क्षमता पाहून त्याच्यावर विश्वास ठेवावा’, असे समर्थ म्हणतात.

१०. समर्थांची श्रीरामावरील पूर्ण श्रद्धा आणि भाव दर्शवणारे त्यांनी रचलेले मनाचे श्लोक अन् करुणाष्टके !

आपला आत्मविश्वास व्यक्त करतांना ते शांतपणे प्रश्न टाकतात,

समर्थाचिया सेवका वक्र पाहे ।
असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।

– मनाचे श्लोक, श्लोक ३०

अर्थ : ‘समर्थाच्या (श्रीरामाच्या) सेवकाकडे वाकड्या दृष्टीने पाहील’, असा या भूतलावर कोणी आहे का ?

‘बुडाला औरंग्या पापी’, असे त्वेषाने म्हणणारे समर्थ रामदासस्वामी म्हणतात,

तुजविण शीण होतो धांव रे धांव आता ।।

– श्री समर्थ रामदासस्वामी कृत करुणाष्टके, अष्टक १

अर्थ : समर्थ म्हणतात, ‘हे रामराया, तुझ्याविना मी दुःखी-कष्टी झालो आहे. तू धावत ये आणि मला दर्शन दे.’

‘ते अशा भावकाव्याचा आदर्श ठरणारी करुणाष्टकेही लिहू शकतात’, हे कसे विसरता येईल ? त्यांचे राजकारण, समाजकारण आणि धर्मकारण एकमेकांत इतकी बेमालूम मिसळलेली आहेत की, त्यांची पूर्णतः वेगळी विभागणी कशी करता येईल ?

११. सामाजिक अधिष्ठान असलेले भावोत्कट; पण बुद्धीचातुर्याने लिखाण करणारे अलौकिक प्रज्ञा असलेले समर्थ रामदासस्वामी !

मानवी जीवनाच्या ऐहिक, दैविक आणि आध्यात्मिक या अंगांचा व्यापक विचार करणारे समर्थ रामदासस्वामी हे एक अलौकिक पुरुष होते. ‘विवेकयुक्त वैराग्य, उद्योगशीलता, समाजोन्मुखता, दुबळेपणाची चीड, भव्यता आणि उत्कटता यांची आवड, लोकांच्या उद्धाराची प्रचंड तळमळ, प्रचार, साक्षेप आणि प्रयत्नवाद’, यांवर त्यांचा विशेष कटाक्ष होता. त्यांच्या साहित्यालाही (लेखनालाही) सामाजिक अधिष्ठान आहे. त्यांचे लिखाण भावोत्कट आहेच; पण त्यात बुद्धीचातुर्याचा भाग अधिक आहे.

त्यांचे राजकारण आणि त्या राजकारणाचा आशय व्यापक आहे. तो समजणार्‍याला निश्चित समजतो. त्यांचे राजकारण हे परमार्थाशी सतत अनुसंधान राखून केलेले आहे. त्यांच्या खास शैलीत लिहिलेला दासबोध, म्हणजे राजकारण, बुद्धीवाद आणि प्रपंच-विज्ञान इत्यादी विषयांचे रसाळ निरूपणच आहे. त्यांच्या दासबोधातील राजकारणाचा प्रवेश हासुद्धा क्रमप्राप्त आणि परिस्थितीप्राप्त आहे. ‘त्याची उभारणी अध्यात्म, उपासना आणि आचारधर्म’, या त्रिसूत्रींच्या संदर्भातच झाली आहे’, हे महत्त्वाचे !’

– डॉ. (सौ.) वासंती इनामदार-जोशी, कोल्हापूर (साभार : मासिक ‘हरि-विजय’, दीपोत्सव २००७)

कृतज्ञतापूर्वक प्रार्थना !

‘अंतःकरणात वास करणार्‍या सर्वव्यापी, सर्वज्ञ, सर्वशक्तीमान, दयाघन परमेश्वरा, ‘मी हा देह, मन, इंद्रिये, बुद्धी, धन, कर्मफळे आणि अंतःकरण तुझ्या चरणांवर अर्पण करतो. मी जे जे करतो, ते ते तुझी आज्ञा म्हणून करतो. वस्तूतः कर्ता-करविता तूच आहेस. ‘जे जे होते, ते आमच्या खर्‍या कल्याणासाठीच होते आणि ते तूच घडवून आणत असतोस’, यावर माझी अढळ निष्ठा आहे; म्हणूनच तू ज्या स्थितीत ठेवशील, त्या स्थितीत आनंदाने राहून तुझे स्मरण आणि कर्तव्य करीन. भगवंता, मी तुला पूर्ण शरण आलो आहे. मागणे काही एक नाही. सर्वकाही तुझ्या इच्छेने होऊ दे. केवळ तुझे अखंड स्मरण मला असू दे. या दासाकडून अखंड सेवा होऊ दे. भगवंता, मी सर्वस्वी तुझाच आहे.’

– डॉ. (सौ.) वासंती इनामदार-जोशी, कोल्हापूर (साभार : मासिक ‘हरि-विजय’, दीपोत्सव २००७)