अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून अटक !

अटकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन !

मुंबई – अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) २३ फेब्रुवारी या दिवशी आर्थिक अपहाराच्या आरोपाखाली अटक केली. २ दिवसांपूर्वी दाऊद याचा भाऊ इक्बाल कासकर याला अंमलबजावणी संचालनालयाने चौकशीसाठी कह्यात घेतले आहे. या चौकशीत नवाब मलिक यांचे नाव आल्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले.

अंमलबजावणी संचालनालयाने नवाब मलिक यांना सकाळी ७.३० वाजता त्यांच्या कुर्ला येथील निवासस्थानाहून कह्यात घेतले. अंमलबाजावणी संचालनालयात दुपारी ३ वाजेपर्यंत त्यांची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना अटक केली. अटकेनंतर मलिक यांची जे.जे. रुग्णालयात वैद्यकीय पडताळणी करून त्यांना मुंबई सत्र न्यायालयात उपस्थित करण्यात आले. मागील मासात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही नवाब मलिक यांचे आतंकवाद्यांशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला होता.

अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयाच्या बाहेर जमलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस पहारा ठेवण्यात आला होता. महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांनी नवाब मलिक यांच्या अटकेच्या विरोधात वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.