(म्हणे) ‘पाकमध्ये ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ हा ‘हिजाब दिवस’ म्हणून साजरा करावा !’  

  • पाकच्या मंत्र्याची पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे मागणी

  • भारतातील हिजाब बंदीकडे जगाने लक्ष देण्यासाठी केली मागणी !

  • ८ मार्चला जगभरातील महिला त्यांच्यावर अत्याचारांच्या विरोधात संघटित होऊन हा दिवस साजरा करतात; मात्र पाकचे मंत्री ‘हिजाब दिवस’ साजरा करण्यास सांगून महिलांना पुन्हा गुलामगिरीमध्ये बंदीस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. याविरोधात महिला संघटना, आंतरराष्ट्रीय महिला आयोग, भारतातील महिला नेत्या यांनी आवाज उठवला पाहिजे ! – संपादक
  • भारतातील मुसलमान महिलांना हिजाब घालायला मिळत नाही; म्हणून पोटशूळ उठणार्‍या पाकच्या मंत्र्यांना चीनमधील उघूर महिलांवर होणार्‍या अन्यायाविषयी काहीच कसे वाटत नाही ? – संपादक
पाकच्या धार्मिक प्रकरणांचे मंत्री नूरुल हक कादरी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारतात मुसलमान महिलांना हिजाब (मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र) घालण्यास बंदी घातली जात आहे. जागतिक समुदायाचे याकडे लक्ष वेधण्यासठी येत्या ८ मार्चचा प्रस्तावित ‘औरत मार्च’ला (महिलांच्या हक्कांसाठी काढलेल्या मोर्चाला) बंदी घालून त्याऐवजी ‘हिजाब दिवस’ साजरा करण्यात यावा, अशी मागणी पाकच्या धार्मिक प्रकरणांचे मंत्री नूरुल हक कादरी यांनी पंतप्रधान इम्रान खान यांना पत्र लिहून केली आहे. ८ मार्च हा ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ आहे.

कादरी यांनी म्हटले, ‘वर्ष २०१८ पासून ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ पाकमध्ये ‘औरत मार्च’ म्हणून आयोजित केला जात आहे. असा मोर्चा काढणे हा इस्लामच्या सिद्धांताच्या विरोधात आहे. या दिवशी कोणत्याही कार्यक्रमांतून इस्लामची मूल्ये, समाजाचे मानदंड, हिजाब आदींविषयी प्रश्‍न उपस्थित करणे किंवा त्यांचा अवमान करणे, यासाठी अनुमती दिली जाऊ नये. यामुळे मुसलमानांच्या भावना दुखावल्या जातात.’