पाकिस्तानने भारतीय दूतावासाच्या प्रमुखाकडे केली विचारणा !

कर्नाटकमधील हिजाबचे प्रकरण 

पाक भारताच्या अंतर्गत प्रश्‍नात ‘धर्म’ हा केंद्रबिंदू ठेवून हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतो, तर भारत धर्माच्या प्रकरणी निष्क्रीय रहातो !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने तेथील भारतीय दूतावासाच्या प्रमुखाकडे कर्नाटकातील हिजाब प्रकरणावर विचारणा केली. तसेच याविषयी चिंता व्यक्त केली. पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून याविषयी माहिती जाणून घेण्यात आली. पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले, ‘भारतीय राजदूतावासाच्या प्रमुखाकडे आम्ही भारतात मुसलमानांच्या विरोधात वाढत असलेली (कथित) धार्मिक असहिष्णुता, नकारात्मक रूढीवाद आणि भेदभाव यांवर चिंता व्यक्त केली. भारत सरकारने कर्नाटकातील महिलांच्या होणार्‍या त्रासाला कोण उत्तरदारयी आहे, हे निश्‍चित केले पाहिजे आणि मुसलमान महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाय केले पाहिजेत.’

पाक भारताला सहिष्णुता आणि धर्मनिरपेक्षता यांवर ज्ञान देत आहे ! – केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी

यापूर्वी पाकच्या मंत्र्यांकडून या प्रकरणी टीका करण्यात आली होती. त्यावर भारताचे केंद्रीय अल्पसंख्यांक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी उत्तर देतांना म्हटले, ‘कोणत्याही संस्थेमध्ये गणवेश, शिस्त आणि अस्मिता यांना धार्मिक रंग देणे एक षड्यंत्र आहे. स्वतःच्या देशामध्ये अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत असतांना पाक सहिष्णुता आणि धर्मनिरपेक्षता यांवर भारताला ज्ञान देत आहे. पाकमध्ये अल्पसंख्यांकांच्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक या अधिकारांवर गदा आणली जात आहे.’