हिजाबला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत सह्यांची मोहीम !

कर्नाटकमधील महाविद्यालयात हिजाब घालण्याचे प्रकरण

  • सहली, मॉल किंवा अन्य ठिकाणी मित्र-मैत्रिणी यांच्यासमवेत मौजमजा करतांना अनेक मुसलमान मुली हिजाब घालत नाहीत. अनेक अभिनेत्री किंवा खेळाडूही तो परिधान करत नाहीत. १४ देशांत हिजाब घालायला बंदी आहे. इस्लामी देश जॉर्डनमध्ये महंमद यांचे ४१ वे वंशज म्हणून ओळखले जाणारे कुटुंब आहे, त्या कुटुंबातील स्त्रियांचेही हिजाब न घातलेले छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. असे असतांना केवळ महाविद्यालयात जातांना हिजाबचा आग्रह का ?
  •  तथाकथित पुरोगामी स्त्रीवादी याविषयी काही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !

मुंबई – कर्नाटकातील महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्यावरून वाद चालू आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ८ फेब्रुवारी या दिवशी मदनपुरा आणि भिवंडी येथे हिजाबच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.

हिजाब घालण्याच्या हक्कासाठी लढणार्‍या कर्नाटकातील मुलींना पाठिंबा दर्शवण्यासाठी ही मोहीम घेण्यात आली होती. ‘हिजाब घालणे हा राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे. या सूत्रावरून निर्माण झालेल्या या अनावश्यक वादामुळे आम्ही दुखावलो आहोत’, असे समाजवादी पक्षाचे दक्षिण मुंबई क्षेत्र प्रमुख सोहेल खान यांनी या वेळी सांगितले.

या मुलींना पाठिंबा देण्यासाठी हिजाब परिधान केलेल्या महिला मोठ्या संख्येने मदनपुरा येथे जमल्या आणि हिजाब परिधान करण्याच्या समर्थनार्थ त्यांनी आवाज उठवला. घटनास्थळी जमलेल्या ५०० हून अधिक महिलांनी मोहिमेत स्वाक्षर्‍या करून घोषणाबाजी केली. (धर्मासाठी लगेच एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्र येणार्‍या धर्मांध महिला कुठे आणि हिंदु धर्मरक्षणार्थ काहीच कृती न करणार्‍या हिंदु महिला कुठे ? – संपादक)

(म्हणे) ‘हिजाबच्या विषयाला महत्त्व देऊ नका !’ –  दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

जे हिजाब घालतात, त्यांना गृहमंत्री हे का सांगत नाहीत ?

मुंबई – महाविद्यालयांमध्ये हिजाबवरून चालू असलेल्या वादाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत; परंतु या विषयाला महत्त्व न देण्याचे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्वीट करून केले आहे.

कर्नाटकमध्ये हिजाब प्रकरणावरून चालू असलेला गदारोळ दुर्दैवी आहे. शैक्षणिक क्षेत्रात अशा प्रकारचे वाद निर्माणच व्हायला नकोत. कर्नाटक उच्च न्यायालयात याविषयी सुनावणी चालू आहे. धार्मिक कटुता निर्माण होईल, असे वक्तव्य किंवा कृती कुणीही करू नये, असे त्यांनी पुढे म्हटले आहे.