‘ह्युंदाई’च्या चुकीसाठी दक्षिण कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी मागितली क्षमा !

काश्मीरच्या प्रश्‍नी पाकिस्तानचे समर्थन केल्याचे प्रकरण

भारतातील राष्ट्रप्रेमींनी आवाज उठवल्यावर दक्षिण कोरियाने भारताशी व्यापारी संबंध बिघडू नयेत; म्हणून क्षमा मागितली आहे; मात्र ‘ह्युंदाई’ने अद्याप क्षमा मागितलेली नाही, हे लक्षात घ्या ! भारतियांच्या राष्ट्रभावनांचा आदर न करणार्‍या अशा आस्थापनांवर बहिष्कारच घालायला हवा !

नवी देहली – दक्षिण कोरियाचे आस्थापन ‘ह्यंदाई’ने पाककडून ५ फेब्रुवारीला साजरा केला जाणार्‍या ‘काश्मीर एकजूटता दिवसा’ला पाकच्या समर्थनार्थ सामाजिक माध्यमांतून पोस्ट केली होती. या प्रकरणी दक्षिण कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी क्षमा मागितली आहे. भारतातून मोठ्या प्रमाणात ह्युंदाईचा विरोध करण्यात येत होता.

यामुळेच दक्षिण कोरियाचे परराष्ट्रमंत्री चुंग युई-योंग यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांना दूरभाष करून दिलगिरी व्यक्त केली.
भारत सरकारने याविषयी दक्षिण कोरियाच्या राजदूताला प्रश्‍नही विचारले होते आणि त्यांच्या या वक्तव्याविषयी अप्रसन्नता दर्शवली होती. सेऊलमधील भारतीय राजदूतानेही हाच संदेश दक्षिण कोरिया सरकारला दिला होता.

‘ह्यंदाई’चा विरोध झाल्यावर या आस्थापनाने या प्रकरणात खेद व्यक्त करणारा संदेश सामाजिक माध्यमांत प्रसारित केला होता; मात्र थेट क्षमा मागण्यास टाळले होते.