लोकशाही कि भ्रष्टशाही ?
(भाग ९.)
भाग ८. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/550336.html
६. लोकशाही कि घराणेशाही ?
६ इ. लोकशाहीची ‘कौटुंबिक हुकूमशाही’कडे वाटचाल चिंताजनक ! : ‘राजकीय पक्षाची शक्ती काही ठिकाणी एका व्यक्तीत, तर काही ठिकाणी एका कुटुंबात केंद्रित होऊन रहात आहे. राजकारणावरील स्वतःचे नियंत्रण पुनर्प्रस्थापित करण्यासाठी ही राजकीय घराणी इतर कुणालाही संधी देत नाहीत. आपल्या देशातील आमदार किंवा खासदार हे देशभक्तीवर अनेक भाषणे ठोकतात; मात्र एकही राजकारणी स्वतःच्या मुलाला सैन्यात भरती होऊन देशरक्षणासाठी सीमेवर पाठवत नाही. त्याऐवजी त्याला एखाद्या सहकारी साखर कारखान्यावर निवडून आणण्याकडे त्यांचा कल असतो. एकूणच राजकारणात केवळ हितसंबंध कायम असतात, बाकी सर्व गोष्टी परिस्थितीनुसार पालटत जातात. त्यामुळेच आता ‘विचारधारांचे राजकारण’ हा राजकारणातील एक मोठा विनोद बनला आहे. काही मासांपूर्वी लोकशाहीतील घराणेशाहीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कठोर टीका करतांना ‘घराणेशाहीचे राजकारण हे सामाजिक भ्रष्टाचाराचे मोठे कारण आहे’, असे म्हटले होते. ही घराणेशाहीच लोकशाहीला ‘कौटुंबिक हुकूमशाही’कडे वेगाने घेऊन जात आहे. घराणेशाहीने लोकशाहीचा केलेला हा दारूण पराभव आहे. ही भारतीय राज्यघटनेला अपेक्षित असलेली लोकशाही निश्चितच नव्हे. हे चित्र ‘जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही’ला लज्जास्पद आहे.’
(क्रमशः)
– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.