सदोष लोकशाही आणि त्यासंदर्भात काही न करता झोपलेले मतदार !

लोकशाही कि भ्रष्टशाही ?

भाग ८. 

भाग ७. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/549918.html

६. लोकशाही कि घराणेशाही ?

श्री. रमेश शिंदे

६ अ. घराणेशाही चालवणार्‍या नेत्यांच्या मुलांची मानसिकता ! : ‘घराणेशाहीचे समर्थन करणार्‍या काही जणांचे म्हणणे असते की, तुम्ही या घराणेशाहीवर टीका का करता ? ज्याप्रमाणे एखाद्या ‘डॉक्टर’ला ‘आपला मुलगा ‘डॉक्टर’च व्हावा’, असे वाटते, एखाद्या अधिवक्त्याला ‘आपला मुलगा अधिवक्ताच व्हावा’, असे वाटते, एखाद्या अभिनेत्याला ‘आपला मुलगाही अभिनेताच बनावा’, असे वाटते, त्याचप्रमाणे एखाद्या राजकीय नेत्याला ‘आपला मुलगाही राजकीय नेता बनावा’, असे वाटल्यास त्यात चुकीचे काय आहे ? हा युक्तीवाद ऐकल्यावर आपल्यालाही एक क्षण ते योग्यच बोलत असल्याचे वाटते; मात्र प्रत्यक्षात ते खरे नाही. एखाद्या ‘डॉक्टर’ला ‘आपला मुलगा ‘डॉक्टर’ व्हावा’, असे कितीही मनापासून वाटले आणि त्याने केवळ घोषणा केली की, माझा मुलगा उद्यापासून ‘डॉक्टर’ असणार आहे आणि तो तुमच्यावर उपचार करणार आहे, तर समाज ते स्वीकारील का ? तर निश्चितच नाही. प्रत्यक्षात त्याच्या मुलाला ‘डॉक्टर’ व्हायचे असेल, तर त्याला समाजातील अन्य मुलांपेक्षा अधिक अभ्यास करावा लागतो, प्रवेशपरीक्षा द्यावी लागते, ५ वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागते, मगच तो स्वतःला ‘डॉक्टर’ म्हणवून घेऊ शकतो. असे कोणते परिश्रम नेता बनण्याची इच्छा असणारी या घराणेशाही चालवणार्‍या नेत्यांची मुले घेतात ? राजकीय नेता असणार्‍या वडिलांच्या ‘होर्डिंग’वर (रस्त्यावर लावण्यात येणार्‍या मोठ्या फलकांवर) ‘भावी नेतृत्व’, ‘युवा नेतृत्व’, ‘उदयोन्मुख नेतृत्व’ म्हणून झळकून त्यांच्या राजकीय प्रवासाचा प्रारंभ होतो आणि मग विद्यार्थी संघटन, युवा संघटन, सामाजिक संघटनेचे प्रमुख, सहकारी संस्था, नगर परीषद, जिल्हा परीषद ते राजकीय नेते, असा सहजसोपा प्रवास ते करतात.

अशाच एका घराणेशाहीवरील चर्चेत एका राजकीय नेत्याने प्रश्न केला होता की, अभिनेत्यांची मुले नाही का अभिनेता बनत; मग आमच्या मुलांनी राजकीय नेते बनण्याविषयीच आक्षेप का घेतला जातो ? याला प्रतिपक्षातील सामाजिक कार्यकर्त्याने छान उत्तर दिले होते की, अभिनेत्याचा मुलगा अभिनेता बनला, तर समाज त्याचा अभिनय पाहून त्याला स्वीकारायचे कि नाही, ते ठरवतो. त्यातही त्याचा चित्रपट चालला नाही, तर त्याची फार तर आर्थिक हानी होऊ शकते, देशावर त्याचा परिणाम होत नाही; मात्र तुमचा क्षमता नसलेला आणि केवळ घराणेशाहीमुळे राजकीय पदावर बसलेला मुलगा उद्या जनहित आणि देशहित यांचे निर्णय घेणार असतो, तेथे क्षमतेच्या अभावी त्याचे निर्णय चुकल्यास त्याचा थेट परिणाम देशावर होऊन देशच बुडू शकतो. त्यामुळे अभिनेता आणि नेता यांच्यात घराणेशाहीविषयी समान दृष्टीकोन ठेवता येणार नाही.

आपल्या देशातील १३५ कोटी इतक्या प्रचंड लोकसंख्येत अनेक हुशार आणि गुणवंत विद्यार्थी घडतात, ते परदेशात जाऊन तेथील बहुराष्ट्रीय आस्थापनांचे प्रमुखही बनतात; मात्र घराणेशाही चालवणार्‍या आपल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना राजकीयपदी हुशार कार्यकर्त्याची नव्हे, तर नातलगाची आवश्यकता वाटत असते. यात एक प्रकारे आपल्याच देशाची हानी करून घेतली जात आहे.

६ आ. पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय करणारी घराणेशाही ! : सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांकडून त्यांची पत्नी, मुले, पुतणे आदींना उमदेवारीत प्राधान्य देऊन घराणेशाही जोपासली जात आहे. नेत्याला प्रथम प्राधान्य असते; मात्र मतदारसंघ आरक्षित झाला किंवा काही कारणाने नेत्याला निवडणूक लढवणे शक्य नसले की, त्वरित त्याच्या पत्नीचे नाव पुढे केले जाते. आपल्याच देशातील एक प्रसिद्ध उदाहरण आहे की, चारा घोटाळ्यात बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र देऊन कारागृहात जावे लागलेल्या लालूप्रसाद यादव यांनी त्वरित राजकारण आणि शिक्षण यांचा गंधही नसणार्‍या स्वतःच्या पत्नीला, राबडी देवी यांना थेट मुख्यमंत्रीपदी विराजमान केले आणि सत्ताकारभार स्वतःच्याच हाती ठेवला. निवडणुकीच्या काळात ही नेतेमंडळी त्यांच्या पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणार्‍या निष्ठावान कार्यकर्त्यांना ‘पुढच्या निवडणुकीत तुलाच तिकीट (उमेदवारी) देतो’, असे आश्वासन देऊन वेळ मारून नेतात. त्यामुळे बिचारे निष्ठावान कार्यकर्ते ‘पुढच्या निवडणुकीत आपल्यालाच उमेदवारी मिळणार आहे’, या आशेतून कंबर कसून कामाला लागतात. पाच वर्षांत ते मतदारसंघाची बांधणी करतात, लोकसंग्रह करतात, काही प्रमाणात लोकांची कामे करतात; परंतु निवडणुकीच्या वेळी मात्र ‘पक्षश्रेष्ठी’ नावाचे हुकूमशहा स्वतःच्या नात्यागोत्यातील दुसर्‍यालाच उमेदवारी बहाल करतात. हा त्या निष्ठावान कार्यकर्त्यांशी केलेला विश्वासघातच असतो.

(क्रमशः)

भाग ९. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/550581.html

– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.