‘सतत साधनारत राहिल्याने शाश्वत आनंद मिळतो’, याची अनुभूती घेणार्‍या श्रीमती अनुपमा देशमुख यांच्या छायाचित्रांच्या संदर्भातील संशोधन !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘श्रीमती अनुपमा देशमुख (वय ७५ वर्षे) यांच्या छायाचित्राकडे पाहून त्या आनंदी असल्याचे लक्षात आले. त्यांची दोन छायाचित्रे काढण्यात आली होती. पहिल्या छायाचित्रात श्रीमती अनुपमा देशमुख यांचा तोंडवळा गंभीर होता आणि दुसर्‍या छायाचित्रात त्यांचा तोंडवळा हसरा होता. ‘व्यक्तीच्या तोंडवळ्यावरील हावभाव पालटले की तिच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांमध्येही पालट होतो का ?’, हे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे वैज्ञानिक चाचणी केली. या चाचणीतील निरीक्षणे आणि त्यांचे विश्लेषण पुढे दिले आहे.

१. श्रीमती अनुपमा देशमुख यांचा गंभीर तोंडवळा असलेल्या छायाचित्रापेक्षा त्यांचा हसरा तोंडवळा असलेल्या छायाचित्रातून अधिक प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे

श्रीमती अनुपमा देशमुख यांचा गंभीर तोंडवळा असलेल्या छायाचित्रामध्ये अल्प प्रमाणात नकारात्मक आणि सकारात्मक स्पंदने आढळून आली. त्यांच्या हसरा तोंडवळा असलेल्या छायाचित्रामध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळून आली. हे बाजूला दिलेल्या सारणीतून लक्षात येते.

श्रीमती अनुपमा देशमुख यांचा गंभीर तोंडवळा

श्रीमती अनुपमा देशमुख यांचा हसरा तोंडवळा

२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

२ अ. श्रीमती अनुपमा देशमुख यांचा गंभीर तोंडवळा असलेल्या छायाचित्रापेक्षा त्यांचा हसरा तोंडवळा असलेल्या छायाचित्रातून अधिक प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे : व्यक्तीची स्पंदने तिच्या छायाचित्रातून प्रक्षेपित होतात. व्यक्तीतील स्पंदने मूलत: तिची आध्यात्मिक पातळी, तिला आध्यात्मिक त्रास असणे किंवा नसणे, तिची साधना इत्यादी अनेक घटकांवर अवलंबून असतात. तसेच व्यक्तीचा तोंडवळा, विशेषकरून तिच्या डोळ्यांतील भाव जणू तिच्या मनाचा आरसा असतात. तिच्या मनातील विचारांचे प्रतिबिंब तिच्या तोंडवळ्यावरील हावभावांच्या रूपात स्पष्टपणे दिसून येतात, उदा. व्यक्तीला राग आल्यास तिचा तोंडवळा रागीट दिसतो, तसेच तिच्या डोळ्यांतून तिच्या मनातील राग व्यक्त होतो. याउलट व्यक्ती आनंदी असल्यास तिच्या तोंडवळा आनंदी दिसतो आणि तिच्या डोळ्यांतून आनंद व्यक्त होतो. शाश्वत आनंद हा केवळ साधनेमुळेच मिळतो. साधनेमुळे व्यक्तीमध्ये आमूलाग्र पालट होतात. त्यामुळे तिचा तोंडवळा आनंदी दिसतो. श्रीमती अनुपमा देशमुख यांच्या दोन्ही छायाचित्रांमध्ये सकारात्मक ऊर्जा आढळून येणे, हे त्यांची साधना चांगली चालू असल्याचे द्योतक आहे. श्रीमती अनुपमा देशमुख यांचा गंभीर तोंडवळा असलेल्या छायाचित्रापेक्षा त्यांच्या हसरा तोंडवळा असलेल्या छायाचित्रातून अधिक प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाली आहेत. यातून ‘व्यक्तीने तिचा तोंडवळा हसरा ठेवल्याने तिच्यातील स्पंदनांमध्ये सकारात्मक पालट होतात’, हे लक्षात येते. यामुळे ‘साधकांनी सतत आनंदी रहाण्यासाठी प्रयत्न करावेत’, हेच यातून शिकायला मिळते.

हा प्रयोग रामनाथी आश्रमातील काही साधिकांवरही करून पाहिला, तेव्हा वरीलप्रमाणेच निष्कर्ष निघाला. ‘खरा आनंद हा केवळ साधनेमुळेच मिळू शकतो’, हे  श्रीमती अनुपमा देशमुख यांच्या साधना-प्रवासातून शिकायला मिळते. ‘हे ईश्वरा, आम्हा साधकांना सतत साधनारत राहून साधनेतील आनंद अनुभवता येऊ दे’, अशी तुझ्या चरणी भावपूर्ण प्रार्थना !’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२९.१.२०२२)

ई-मेल : [email protected]

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक