आज २४ नोव्हेंबर या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांचा महानिर्वाणदिन आहे. त्या निमित्ताने…
‘मी साधना करू लागणे आणि आतापर्यंत साधनेत टिकून रहाणे, यांचे कारण म्हणजे प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) ! प.पू. बाबांच्या सहवासात आल्यानंतर घडलेले काही प्रसंग, उदाहरणे आणि माझ्या मनाची झालेली प्रक्रिया येथे दिली आहे. प.पू. बाबांच्या देहत्यागानंतरही कधी कधी त्यांच्या उपदेशाचे चिंतन होते, त्यातून साधनेसाठी प्रयत्न करायला उभारी येते, तसेच ‘कधी कधी त्या सूत्रांतून नवा बोध आपोआप मिळतो’, असे मला वाटते. त्यामुळे पुढील सूत्रे दिली आहेत.
सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणी सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
प.पू. भक्तराज महाराज यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना दिलेला गुरुमंत्र त्यांच्या व्यष्टी आणि समष्टी दोन्ही साधनेसाठी पूरक असणे !
‘माझे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांनी मला गुरुमंत्र म्हणून रामनामाचा जप दिला होता. तेव्हा माझ्या लक्षात आले की, रामनामाचा जप हा माझी रामाची उपासना व्हावी, म्हणजेच माझी व्यष्टी साधना म्हणून होता. त्याचबरोबर काळानुसार रामराज्य स्थापनेसाठी (हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी) आवश्यक, म्हणजेच समष्टी साधनेसाठीही होता.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
१. प.पू. भक्तराज महाराज यांचे श्रेष्ठत्व बुद्धीला पटणे
१ अ. ‘प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांच्या भजनांतील अनोखेपण’ यांमुळे त्यांच्या भजनांची गोडी लागणे : वर्ष १९९३ च्या अखेरीस सांगलीमध्ये सनातन संस्थेचे कार्य चालू झाले. त्यानंतर सुमारे ३ मासांनंतर, म्हणजे ६.३.१९९४ या दिवशी मला प.पू. बाबांचे दर्शन लाभले. मध्यंतरीच्या काळात प.पू. बाबांच्या भजनांच्या ध्वनीमुद्रिका आणि संबंधित ग्रंथ घरात आले होते. एवढेच नव्हे, तर ती भजने ऐकून आणि वाचून माझ्या मनात भजनांची गोडीही निर्माण झाली होती. ‘जणू भजने लावली आहेत, म्हणजेच आम्ही कुणीतरी घरात आहोत’, असे समीकरण बनले होते. ही गोडी आणि त्यातून प.पू. बाबांची थोरवी मनात रुजायला जशी ‘ही भजने, त्यांचे अनोखेपण आणि प.पू. बाबा’ ही कारणे आहेत, तसेच बुद्धीच्या स्तरावरील दुसरेही एक कारण होते. ते पुढे दिले आहे.
१ आ. ‘कविता म्हणजे काय’, याच्या आकलनामुळे प.पू. बाबांची थोरवी बुद्धीला पटणे : वर्ष १९७६-७७ मध्ये मी सांगलीत १२ वी शास्त्र या शाखेत शिकत असतांना प्रा. दिलीप परदेशी हे आम्हाला मराठी शिकवायचे. खरेतर ‘मराठी’ हा विषय पुढच्या व्यावहारिक जीवनात फारसा महत्त्वाचा नव्हता’, असे आज कुणालाही वाटणे स्वाभाविक आहे; परंतु प्रा. दिलीप परदेशी यांनी पहिल्याच ‘लेक्चर’मध्ये सांगितले, ‘‘तुम्ही अशी शाखा निवडली आहे की, येथून पुढे तुम्ही इंग्रजीतूनच शिकणार आहात. मराठी शिकण्याचे हे शेवटचे वर्ष आहे. त्यामुळे ‘जरा मातृभाषा शिकता का पहा !’’ त्यांनी शिकवतांना कवितेची व्याख्या सांगितली, ‘भावनांचा उत्कट उद्गार म्हणजे कविता !’ हे सर्व मनात इतके खोलवर जाऊन बसले की, त्यानंतरच्या जीवनात जेव्हा कधी कविता समोर यायची, तेव्हा ‘त्यामागचे स्फुरण काय ? भावना काय ?’ हे पहायची मला सवय लागली. माझ्याकडूनही काही कविता केल्या गेल्या, तर काही प्रत्यक्ष अनुभवायलाही मिळाले.
१ आ १. प.पू. बाबांच्या भजनांविषयी झालेले चिंतन आणि भजनांतून त्यांच्या थोरवीची झालेली पहिली ओळख ! : सांगलीत सनातन संस्थेचे कार्य चालू झाल्यानंतर प.पू. बाबांची भजने ऐकले. तेव्हा ‘त्यांच्या मागचे स्फुरण काय ? भावना काय ? त्यांचे मूळ काय ?’, यांचा मला काहीच थांग लागेना. ना त्या प्रेमकविता होत्या, ना त्या निसर्गकविता होत्या, ना त्यात कथित सामाजिक वेदना होत्या. मग लक्षात आले की, ‘भजनांमागील स्फुरण आणि त्यातील उत्कटता फारच खोलवरची आहे.’ मला वाटले, ‘ईश्वरासंबंधीच्या पराकोटीच्या उत्कट भावातून ज्यांना भजने स्फुरतात, त्यांच्या साक्षात्काराचा स्तर काय असेल !’ प.पू. बाबांच्या चरित्रात ‘त्यांना भजने कशी स्फुरली’, हे वाचले होते. ते सर्व वाचून आणि त्यातील ‘बाप माझा’ या भजनाविषयी वाचून अन् ते भजन प्रत्यक्ष ऐकून, अभ्यासून मला ते इतके अद्भुत वाटले की, ‘असे शब्द, त्यांची योजना, लय, यमक, ताल, सूर आदी भल्या पहाटे थंडीत चूल पेटवतांना एखाद्याला कसे स्फुरू शकते ? तो आपोआप कसा गाऊ आणि नाचू लागतो ?, हे सर्व कल्पनातीत आहे.’ प.पू. बाबांच्या भजनांतून त्यांच्या थोरवीची झालेली ही पहिली ओळख होती.
२. प.पू. बाबांनी आरंभी त्यांच्या स्वरचित भजनांचे अर्थ समजावून सांगणे, त्या वेळी ‘जणू श्रीकृष्णाने गीतेतील श्लोकांचा अर्थ सांगणे’, असे वाटणे
प.पू. बाबा अनेकदा भजनांच्या संदर्भात स्वतःचा उल्लेख ‘मी लिहीले आहे, मला स्फुरले आहे’, असा करत नसत. ते तृतीय पुरुषी एकवचनी म्हणजे ‘भक्तराज महाराज’ने सांगितले आहे, गुरूंच्या कृपेने स्फुरले आहे’, असा उल्लेख करत. आरंभी त्यांच्या तीन दर्शनांच्या वेळी प.पू. बाबांनी स्वतः आपल्या भजनांचे अथवा त्यातील काही पंक्तींचे अर्थ समजावून सांगितले. मला त्यांनी सांगितलेला अर्थ विशेष आकलन होत नसे किंवा समजला, तरी आत उमगत नसे; परंतु मला त्यांनी ते स्वतः सांगणे, म्हणजे ‘श्रीकृष्णाने गीतेतील श्लोकाचा अर्थ सांगणे’, असे काहीसे वाटत असे. त्यामुळे ‘प.पू. बाबा भजनांतील शिकवणीला किती महत्त्व देतात’, हे मनात ठसले.
३. प.पू. बाबांनी प्रथम भेटीतच ‘दुःखाचे जे मूळ’ या भजनाचा अर्थ उलगडून सांगतांना पतीच्या अहंकाराची जाणीव करून देणे आणि त्यातून त्यांच्या आध्यात्मिक अधिकाराची जाणीव होणे
‘ज्ञानचक्षु तुझे ।’, ‘दुःखाचे जे मूळ सुखासी कारण ।’, ‘प्रभु या माया बाजारी ।’, ‘या गुरुराया मम मंदिरा ।’, तसेच ‘बोलवितो मज नंदाचा नंदन ।’ ही भजने त्यातीलच काही उदाहरणे ! त्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण सूत्र म्हणजे ‘दुःखाचे जे मूळ .. ।’ या भजनाचा अर्थ उलगडून सांगतांना प.पू. बाबा म्हणाले, ‘‘तुम्ही लग्नाच्या वेळी तुमच्या बायकोला ‘तिचा सांभाळ करीन’, असे म्हणालात ना ?’’ मी म्हणालो, ‘‘हो.’’ तेव्हा प.पू. बाबा म्हणाले, ‘‘आमच्या भजनामध्ये (‘दुःखाचे जे मूळ ..’ यामध्ये) म्हटलेले आहे, ‘पत्नीचे पालन पती अंगीकारी …।’ पतीला उगाच वाटते, ‘आपण पत्नीचे दायित्व घेतले. आपल्यानंतर तिचे काय होणार ?’ हा (पती) मरतो. मग काय होते ? काही दिवसांनी ती (पत्नी) बरी मुलाबाळांत रमलेली असते ! सगळे छान चाललेले असते. ‘आपल्यानंतर तिचे काय होणार ?’, हा पतीचा केवळ अहंकार असतो !’’
प.पू. बाबांचे बोलणे ऐकतांनाच माझ्या लक्षात आले की, ‘प्रथमच भेटलेल्या आणि २ – ३ वर्षांपूर्वी लग्न झालेल्यांना इतके बिनधास्तपणे केवळ तेवढा अधिकार असलेलाच सांगू शकतो.’ मी ‘हो’, असे म्हणालो. मग ते म्हणाले, ‘‘सध्या मात्र तुम्हाला जे समजेल, ते हिला (पत्नीला) सांगा !’’
४. ‘कुणा बुवा-बाबांच्या नादी लागू नको’, असे सांगणार्या मित्राला प.पू. बाबांच्या श्रेष्ठत्वाविषयी सांगणे आणि व्यावसायिक कारकीर्द चालू केल्यानंतर ‘ईश्वरप्राप्ती’ हेच ध्येय निर्माण होणे
मी काही मासांतच मंदिरात जाऊन सत्संग घेणे, भजने म्हणणे, छोटी प्रवचने घेणे, असे करू लागलो. हे माझ्याबरोबर वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या माझ्या एका मित्राला समजले. त्याने मला बोलावून सांगितले, ‘‘तू व्यवसाय चालू केला आहेस. तो ५५ ते ६० वर्षांपर्यंत कर. नंतर मग हे कर. आजकालचे बाबा-बुवा खरे नसतात. ज्ञानदेव, तुकाराम महाराज यांसारखे संत आता नाहीत.’’ तेव्हा मी सांगितले, ‘‘प.पू. बाबांना स्फुरलेली भजने ज्ञानदेव, तुकाराम महाराज आदींच्या साहित्यासारखीच आणि त्याच स्तराची आहेत. आदी शंकराचार्यांना जो अद्वैत साक्षात्कार झाला तो खरा असेल, तर तसा साक्षात्कार नंतरही होऊ शकतो; कारण ईश्वर नष्ट होत नाही. त्यानंतर माझ्यापुढे ‘ईश्वरप्राप्तीसाठी काही करणे’, याविना दुसरे कोणतेच ध्येय राहिले नाही.’’
– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत (वय ६३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.४.२०२४) (क्रमशः)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |