बापूंकडून बाबूंकडे !

संपादकीय

गांधीवाद हा देशासाठी हानीकारक आहे, हे स्पष्टपणे सांगण्याची वेळ आली आहे !

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा होलोग्राम लॉन्च करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात ‘बापू’ आणि ‘बाबू’ ही नावे अग्रभागी राहिली आहेत. बापूंनी सत्याग्रहातून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची भाषा केली, तर बाबूंनी स्वातंत्र्यसेना उभी केली. हे ‘बाबू’ म्हणजे आझाद हिंद सेनेचे प्रणेते ‘सुभाषबाबू’. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशात बापूंचे अनेक पुतळे उभारण्यात आले, शेकडो रस्ते, वास्तू, योजना यांना ‘गांधी’ यांचे नाव देण्यात आले; मात्र नेताजी दुर्लक्षित राहिले. २३ जानेवारी २०२२ हा दिवस मात्र देशाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस ठरणार आहे; कारण या दिवशी ‘इंडिया गेट’वर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची पायाभरणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. मोदी यांनी २ दिवसांपूर्वी ‘ट्वीट’ करून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्वातंत्र्यकार्यातील योगदानाचे प्रतीक म्हणून हा भव्य पुतळा उभारला जात असल्याचे सांगितले. जुलै २०२२ मध्ये या भव्य पुतळ्याचे काम पूर्ण होऊन त्याचे अनावरण होईल, तोपर्यंत ‘इंडिया गेट’ येथे सुभाषचंद्र बोस यांची प्रतिमा ठेवण्यात येणार आहे. देशात कुठे ना कुठे असे पुतळे उभारले जात असतात; यात काय मोठे ? असे कुणाला वाटू शकते; मात्र स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेसच्या सत्ताकाळात ‘गांधी-नेहरू’ यांच्या नावांतच अडकलेल्या देशात आता प्रखर राष्ट्रभक्ती असलेल्या नेत्यांचे पुतळे उभे रहात आहेत. हा नव्या भारताचा विचार आहे, हे लक्षात येते.

पोकळ गांधीवाद !

फुग्यामध्ये हवा भरावी, तसा देशात काँग्रेसने ‘गांधीवाद’ फुगवून ठेवला आहे; प्रत्यक्षात मात्र तो आतून पोकळ आहे. ‘गांधीवाद’ म्हणजे नेमके काय ? याची स्पष्टता नेमकी काँग्रेसलाही नाही. ‘मुन्नाभाई एम्.बी.बी.एस्.’ या चित्रपटातील गांधीवादाची पोलखोल करणारे उदाहरण येथे बोलके ठरेल. ‘कुणी एका गालावर थप्पड मारली, तर गांधीजींनी दुसरा गाल पुढे करायला सांगितला आहे; मात्र दुसर्‍या गालावरही थप्पड मारली, तर काय करावे ? हे गांधीजींनी सांगितलेले नाही,’ असे म्हणून गांधीवादाचा पुरस्कार करणार्‍या या चित्रपटातील नायक गुंडांना चोप देतो. हेच सामाजिक वास्तव आहे. गांधीवादाच्या अर्धवट ज्ञानाचे हे उत्तम उदाहरण आहे. नपुंसक होऊन गुंडांनी केलेली मारहाण मान्य करण्याची गांधीगिरी नाकारून अन्यायाला प्रतिकार करण्याचा पुरस्कार नायकाने या चित्रपटात केला. ‘गांधीवाद’ हे थोतांड आहे, याचा अर्थ ‘हिंसेचे समर्थन’ असा होत नाही. युद्ध होऊ नये, यासाठी स्वत: भगवान श्रीकृष्णाने पांडवांच्या बाजूने कौरवांशी बोलणी केली; मात्र ज्या वेळी दुर्जन प्रबळ होतात, त्या वेळी धर्माच्या रक्षणासाठी अन्य कोणता पर्याय उरत नाही, त्या वेळी सर्व पर्यायांचा विचार करावा लागतो. सामाजिक जीवनात दंड देण्याचा अधिकार राजाला असतो; मात्र वैयक्तिक अन्यायाच्या वेळी प्रसंग जिवावर बेतल्यास प्रसंगी कठोर भूमिका घेणे, हाच धर्म असतो; मात्र गांधीवाद्यांनी भगवत्गीतेतील ज्ञान अर्धवट मांडून अन्यायाच्या विरोधातही कठोर भूमिका घेण्याला ‘हिंसा’ ठरवून टाकले. गांधींनी भारतियांची दिशाभूल केली !

‘भारतावर राज्य करण्यासाठी ‘गांधीवाद’ सोयीचा आहे’, हे इंग्रजांच्या लक्षात आल्यावर इंग्रजांनी ‘गांधींच्या सत्याग्रहाचा बागुलबुवा निर्माण केला आणि भारतियांच्या हातातील शस्त्रे काढून घेतली. भारतियांना मवाळ करण्याच्या कुटनीतीमधील ‘गांधीवाद’ हे इंग्रजांचे महत्त्वाचे हत्यार ठरले. अशा गांधीजींच्या अंगाखांद्यावर खेळलेल्या भारताच्या भूतपूर्व पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही गांधीवादाचा पुरस्कार केला नाही. त्यांनी थेट भारतीय सैन्य पाठवून पाकिस्तानची नांगी ठेचली. त्यामुळे ‘काँग्रेसची मतपेढी’ या पलीकडे देशात गांधीवादाला किंमत नाही. केवळ स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी काँग्रेस आजही गांधीवादाचा कित्ता गिरवत आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘मी मोदी यांना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो’, असे वक्तव्य केले. काँग्रेसच्या नेत्यांचे हे वक्तव्य कोणत्या गांधीवादात बसते ? अशा प्रकारे काँग्रेसचेच नेते ऊठसूठ गांधीवादाची हत्या करतात आणि तोंडाने मात्र गांधीवादाचे गुण गातात. राष्ट्राच्या दृष्टीने केलेली गांधीगिरी भारताला चीन आणि पाकिस्तान यांच्या घशात घालणारी ठरेल. त्यामुळे प्रखर राष्ट्रहिताचा विचार करणारा नेता भारताला ‘गांधीग्रस्त’ कसा ठेवेल ?

क्षात्रवृत्तीचा गौरव हवा !

नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतांना त्यांनी गुजरातमध्ये नर्मदा नदीच्या काठावर भारताचे भूतपूर्व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला होता. पंतप्रधान झाल्यानंतर वर्ष २०१८ मध्ये त्यांनी या पुतळ्याचे अनावरण केले. हा पुतळ्याची उंची १८२ मीटर असून हा जगातील सर्वांत उंच पुतळा आहे. वल्लभभाईंनी ५६२ स्वतंत्र संस्थानांना भारतात सहभागी करून घेतले. त्यासाठी त्यांनी प्रसंगी सैन्यबळाचाही वापर केला होता. वर्ष २०२१ हे नरेंद्र मोदी यांनी भारताचे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांचे शतक महोत्सवी वर्ष साजरे करण्याचे आवाहन ‘मन की बात’ या कार्यक्रमातून केले होते. या वेळी मोदी यांनी ‘नरसिंहराव यांनी नवीन इतिहास रचला’, या शब्दांत त्यांचा गौरव करून त्यांच्या चरित्राचा अभ्यास करण्याचे आवाहन केले. वल्लभभाई पटेल असोत, नरसिंहराव असोत वा सुभाषचंद्र बोस असोत, हे सर्व काँग्रेसचेच वरिष्ठ नेते होते; मात्र त्यांनी ‘गांधीवाद’ झिडकारून देशहिताच्या निर्णयांना प्राधान्य दिले. या तिघांचाही गौरव करणे नक्कीच योगायोग नाही. या औचित्याने ‘या देशात गांधीवादाला तिलांजली द्यायला हवी’, हाच संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. गांधीजींच्या राष्ट्रहिताविषयी कुणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही. त्यांचे नेतृत्व, चिकाटी हे गुण अनुकरणीय आहेत; मात्र त्यांनी सांगितलेला गांधीवाद हा देशासाठी हानीकारक आहे, हे स्पष्टपणे सांगण्याची वेळ आली आहे. युवकांना संभ्रमित करणारे देशाच्या मानगुटीवर बसलेले गांधीवादाचे भूत बाजूला करून देशातील क्षात्रवृत्तीचा गौरव करायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जर हे कार्य करणार असतील, तर समस्त भारतियांनी त्यांच्या या भूमिकेचे स्वागत करायला हवे !