चुनाभट्टी (मुंबई) येथे ७० ते ८० धर्मांधांकडून प्राणीकल्याण अधिकारी आणि गोरक्षक यांच्यावर प्राणघातक आक्रमण !

  • आक्रमणाची शक्यता असतांनाही गोरक्षकांना धर्मांधबहुल भागात अतिरिक्त पोलीस कुमक का नाही दिली ? – संपादक
  • पोलिसांनी स्वतः जाऊन धर्मांधांवर कारवाई का केली नाही ? कि पोलीस धर्मांधांना घाबरतात ? पोलिसांच्या या भूमिकेची सरकारने चौकशी केली पाहिजे  ! – संपादक
  • गोरक्षकांना पुरेसे पोलीसबळ न देता त्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलणारे पोलीस कसायांना सामील आहेत का ? याचीही चौकशी व्हायला हवी ! – संपादक
प्राणीकल्याण अधिकारी श्री. आशिष बारीक गंभीररित्या घायाळ !

मुंबई, १६ जानेवारी (वार्ता.) – कुर्ला येथे ७० ते ८० धर्मांधांनी गोमाता आणि गोवंशियांचे मांस यांची तस्करी रोखणारे प्राणीकल्याण अधिकारी (शासनाने दिलेले पद) श्री. आशिष बारीक अन् गोरक्षक श्री. प्रतीक नाणेकर यांच्यावर प्राणघातक आक्रमण केले. यामध्ये श्री. बारीक हे गंभीररित्या घायाळ झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या प्रकरणी चुनाभट्टी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून आतापर्यंत ७ धर्मांधांना अटक करण्यात आली आहे.  अस्लम अब्दुल कुरेशी तथा अस्लम मुल्ला या प्रमुख आरोपीला पोलिसांनी कह्यात घेतले आहे. १६ जानेवारीला सकाळी ६.२० वाजता ही घटना घडली. श्री. बारीक हे ‘ध्यान फाऊंडेशन’ या संस्थेचे स्वयंसेवक असून ते घाटकोपर येथे रहातात.

गोमांस तस्करीविषयी आतापर्यंत विविध ठिकाणी ६० गुन्हे नोंदवूनही पोलिसांकडून काहीच कारवाई नाही !

या तक्रारींकडे दुर्लक्ष करणार्‍या संबंधित पोलिसांना सरकारने आजन्म कारागृहात टाकले पाहिजे ! – संपादक

मागील वर्षभरात कल्याण, नवी मुंबई, कुर्ला, शाहपूर आदी भागांमध्ये गोमाता आणि गोवंशीय यांच्या मांसाच्या तस्करीच्या प्रकरणांत ६० हून अधिक गुन्हे नोंदवण्यात येऊनही पोलिसांकडून काहीच कारवाई करण्यात आली नाही’, अशी माहिती प्राणीकल्याण अधिकारी श्री. यतीन जैन यांनी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.

पोलिसांनी स्वतः कारवाई न करता गोरक्षकांना केवळ एका पोलिसासह तस्करी होत असलेल्या ठिकाणी पाठवल्याचा संतापजनक प्रकार !

श्री. बारीक यांना नाशिक येथून गोमाता आणि गोवंश यांचे मांस कुर्ला येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती त्यांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली. नियंत्रण कक्षाने त्यांना ही माहिती चुनाभट्टी पोलीस ठाण्यात कळवण्यास सांगण्यात आले. त्याप्रमाणे श्री. बारीक यांनी पहाटे स्वत: जाऊन चुनाभट्टी पोलीस ठाण्यात माहिती दिली. यावर पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित होते; मात्र चुनाभट्टी पोलीस ठाण्यातून त्यांनाच मांस तस्करी होत असलेल्या ठिकाणी पाठवण्यात आले आणि त्यांच्यासमवेत केवळ एका पोलीस हवालदाराला पाठवण्यात आले. या भागात वारंवार गोमांस तस्करीचे प्रकार होत असूनही, तसेच धर्मांध आक्रमक होत असूनही चुनाभट्टी पोलीस ठाण्यातून त्यांच्यासमवेत आवश्यक पोलीसबळ पाठवून कारवाई का करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा सर्व प्रकार पोलिसांच्या भूमिकेविषयी संशय निर्माण करणारा आहे. (धर्मांध नेहमीच गोरक्षकांवर आक्रमण करतात, असा इतिहास असतांनाही पोलिसांनी स्वत: कारवाई न करता केवळ एका पोलिसासह गोरक्षकांनाच धर्मांधाच्या भागात पाठवले. यावरून पोलिसांनी कसायांशी हातमिळवणी केली आहे का ? असा प्रश्न उपस्थित होतो ! – संपादक)

गोरक्षक आणि पोलीस यांची गाडी अडवणारे मुजोर धर्मांध !

श्री. बारीक आणि श्री. नाणेकर यांसह पोलीस हवालदार समाधान पवार हे कुरेशीनगर येथे गोमांसाची तस्करी रोखण्यासाठी जात असतांना एका ट्रकने त्यांचा मार्ग जाणीवपूर्वक अडवून त्यांच्या गाडीला पुढे जाऊ दिले नाही. अंततः गाडी रस्त्यावर लावून तिघेही कुरेशीनगर येथे गेले. या वेळी त्यांना तेथे गोमांसाने भरलेली गाडी दिसली. या वेळी धर्मांधांनी श्री. बारीक आणि श्री. नाणेकर यांच्यावर आक्रमण केले. यामध्ये पोलीस हवालदार समाधान पवार यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकारानंतर पोलिसांची गाडी घटनास्थळी आली. या वेळी पोलिसांनी ६ सहस्र किलो मांस कह्यात घेतले.

पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच गोरक्षकांवर आक्रमण झाले ! – यतीन जैन, प्राणीकल्याण अधिकारी

कुर्ला भागात होत असलेल्या अवैध मांसविक्रीविषयी काही दिवसांपूर्वी आम्ही पोलीस उपायुक्त कृष्णाकांत उपाध्याय यांची भेट घेऊन त्यांना माहिती दिली होती. मुंबईत मालेगाव, नाशिक, संगमनेर येथून मोठ्या प्रमाणात मांस येते. राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा आहे. असे असतांनाही दिवसाढवळ्या गोमाता आणि गोवंश यांचे मांस यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. हे सर्व पोलिसांच्या सहकार्याविना शक्य नाही. (असे असेल, तर संबंधित पोलिसांना सरकारने आजन्म कारागृहात टाकले पाहिजे ! – संपादक) आम्ही वेळोवेळी तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नाहीत. कसायांच्या विरोधात पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती, तर आज हे आक्रमण झाले नसते. गोरक्षकांवर झालेले आक्रमण हे पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच झाले आहे, अशी प्रतिक्रिया प्राणीकल्याण अधिकारी श्री. यतीन जैन यांनी या घटनेनंतर ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केली.