सांगली शहरातील अनधिकृत फ्लेक्स छापणार्‍या मुद्रणालयावर महापालिकेकडून कठोर कारवाई !

१८ सहस्र रुपयांचा दंड आणि साहित्य जप्त !

जप्त करण्यात आलेले विनापरवाना एल्.ई.डी. स्क्रीनवर विज्ञापन प्रसारित करणारे वाहन

सांगली, १० मार्च (वार्ता.) – महापालिका क्षेत्रात अनधिकृत फ्लेक्स प्रिटिंगचा व्यवसाय करणारे मुद्रणालयावर महापालिकेने कठोर कारवाई करून १८ सहस्र रुपयांचा दंड आणि मुद्रणालयाचे साहित्य जप्त केले आहे. महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी शहरातील अनधिकृत व्यवसायाची नोंद घेऊन जागेवर जाऊन ही कारवाई केली आहे. प्रभाग समिती २ मधील सांगली-मिरज रस्त्यावरील विनापरवाना तळघरांमध्ये फ्लेक्स छापायचा व्यवसाय अनधिकृतरित्या करण्यात येत होता. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली.

विनापरवाना एल्.ई.डी. स्क्रीनवर विज्ञापन प्रसारित करणारे वाहन जप्त !

सांगली – येथील कर्मवीर भाऊराव चौक येथे लावण्यात आलेल्या विनापरवाना एल्.ई.डी. स्क्रीनवर विज्ञापन प्रसारित करत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिलेल्या आदेशावरून एल्.ई.डी स्क्रीनवर विज्ञापन प्रसारित करणार्‍या वाहनासह स्क्रीनही जप्त केली. उच्च न्यायालयाने अनधिकृत प्रसिद्ध होणार्‍या होर्डिंग, फलक, एल्.ई.डी. स्क्रीनवर विज्ञापन प्रसारित करणार्‍या वाहनांवर कारवाईचा आदेश दिला आहे. त्यानुसार कारवाई झाली.