मालवण तालुक्यातील एका युवतीवर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार

संशयित आरोपी साहिल शकील आजरेकर याच्यावर गुन्हा नोंद

मालवण – तालुक्यातील एका गावातील युवतीला लग्नाचे आमिष दाखवून वर्ष २०२२ ते २५ या कालावधीत विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. युवतीला तिची अश्लील छायाचित्रे प्रसारित करण्याची, तसेच युवतीला आणि तिच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी युवकाने दिली होती. या प्रकरणी पीडित युवतीने ६ मार्च २०२५ या दिवशी तक्रार प्रविष्ट केल्यानंतर लैंगिक अत्याचारासह पोक्सो कायद्याच्या कलमानुसार संशयित आरोपी साहिल शकील आजरेकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पीडित युवतीने तक्रारीत म्हटले आहे की, मी वर्ष २०२२ मध्ये इयत्ता १० वीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर खासगी शिकवणीला जात असे. त्या वेळी माझ्या मैत्रिणीच्या माध्यमातून साहिल याची माझ्याशी ओळख झाली होती. मला प्रेमाच्या जाळ्यात ओढून मी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही लग्नाचे अमिष दाखवून माझ्या इच्छेविरुद्ध बलपूर्वक वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केले. या घटनांनी मी मानसिक तणावात होते. कुटुंबातील सदस्यांनी मला सुरक्षित असल्याची खात्री पटवून दिली आणि माझे समुपदेशन केले. त्यानंतर मी सर्व घटना सांगितली आणि या अन्यायाच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहेत, असे वृत्त स्थानिक वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाले आहे.