|
कुलाबा दुर्गावरील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करणार्या उत्तरदायी अधिकार्यांना सरकारने कारागृहाचाच रस्ता दाखवला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक
मुंबई, ११ जानेवारी (वार्ता.) – पुण्यातील लोहगडावरील थडगे आणि अवैधपणे साजर्या होणार्या दर्ग्याच्या उरुसाला (मुसलमानांच्या धार्मिक उत्सवाला) मूकसंकती देणार्या पुरातत्व विभागाने आता रायगड जिल्ह्यातील रामनाथ (अलीबाग) येथील कुलाबा दुर्गावरील अवैध थडग्यालाही मूकसंमती दिली असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. विशेष म्हणजे या गडावरील पुरातत्व विभागाच्या कार्यालयाच्या जवळच काही दिवसांपूर्वीच सिमेंट आणि लाद्या यांचे पक्के बांधकाम करून थडगे उभारण्यात आले आहे. यातून गड अन् दुर्ग यांचे जतन आणि संवर्धन करण्याचे दायित्व असलेला पुरातत्व विभागाच गड-दुर्ग यांवरील अवैध बांधकामांना पाठिंबा देत असल्याचे सिद्ध होत आहे.
छत्रपती शिवरायांच्या गडांवर थडगे बांधणे, नंतर त्यावर हिरवी चादर चढवणे, हळूहळू तेथे उरूस साजरा करून काही वर्षांनी ती जुनी परंपरा असल्याचे भासवणे आणि नंतर दर्गा उभारून ते ‘धार्मिक केंद्र’ बनवणे, हा सर्व प्रकार नियोजनबद्ध चालू आहे. यामुळे या ऐतिहासिक गडकोटांवरील छत्रपती शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाचा इतिहास पुसून टाकला जात आहे.
सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघूजी राजे आंग्रे यांच्या तक्रारीनंतरही पुरातत्व विभागाकडून कारवाई नाही !
‘स्वराज्याची सागरी राजधानी’ अशी ओळख असलेल्या कुलाबा दुर्गावरील थडग्याच्या विरोधात हिंदवी स्वराज्याच्या आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचे ९ वे वंशज श्री. रघुजी राजे आंग्रे यांनी नुकतीच मुंबई येथील महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाकडे ई-मेलद्वारे तक्रार केली आहे; मात्र या तक्रारीवर कारवाई करायची तर दूरच; पण पुरातत्व विभागाने या पत्राला साधे उत्तर देण्याचेही सौजन्य दाखवलेले नाही. (हिंदवी स्वराज्यासाठी योगदान देणार्या मावळ्यांच्या वंशजांनी लिहिलेल्या पत्राचीही पुरातत्व विभाग नोंद घेत नसेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी केलेल्या तक्रारींविषयी पुरातत्व विभाग काय करत असेल ? याची कल्पना येते ! – संपादक)
पुरातत्वीय महत्त्वाचे गड, दुर्ग आणि त्याचा परिसर येथे ‘लँड जिहाद’ चालू असल्याची शंका येते ! – रघुजी राजे आंग्रे, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज
माझ्या पूर्वजांच्या समवेत मुसलमान समाजातील अनेक जण स्वराज्यासाठी लढले. त्यांचा आम्ही आदरच करतो; मात्र कुलाबा गडावर असे कोण महान सत्पुरुष होऊन गेले, की त्यांची समाधी थेट गडाच्या तटबंदीवर यावी ? पुरातत्वीय महत्त्वाचे गड आणि परिसर यांवर अतिक्रमण करून, त्यांवर ताबा मिळवून नवीन ‘लँड जिहाद’ चालू केला आहे का ? अशी शंका वाटण्यास वाव आहे, अशी प्रतिक्रिया सरखेल कान्होजी आंग्रे यांचे ९ वे वंशज श्री. रघुजी राजे आंग्रे यांनी त्यांच्या ‘फेसबूक’ खात्यावरील संदेशात व्यक्त केली आहे.
पुरातत्व विभागाने कुलाबा गडावरील मदारीचे (थडग्याचे) अतिक्रमण त्वरित हटवावे ! – रघुजी राजे आंग्रे
कुलाबा गड हा ‘संरक्षित स्मारक’ आहे. त्यामुळे या गडावर कोणतेही नवीन बांधकाम किंवा असलेल्या बांधकामात पालट करता येत नाहीत. सध्या गडावर बांधण्यात आलेले मदारीचे (थडग्याचे) बांधकाम हे पूर्णपणे नवीन आहे. त्यामुळे पुरातत्व विभागाने तातडीने कारवाई करून हे अतिक्रमण हटवावे, अशी मागणी श्री. रघुजी राजे आंग्रे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना केली.
गडकिल्ल्यांवर उघडपणे होत असलेल्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करणारा पुरातत्व विभाग गड अन् दुर्ग यांचे जतन आणि संवर्धन कसे करणार ?
‘प्राचीन स्मारक तथा पुरातत्वीय स्थल अवशेष नियम १९५३ मधील कलम १९ आणि नियम ८’, तसेच ‘अधिनियम १९५९ च्या नियम ९’ यांनुसार प्राचीन स्मारक किंवा त्याच्या परिसरात धार्मिक कार्यक्रम साजरा करण्यास बंदी आहे. त्यामुळे प्राचीन स्मारकांमध्ये समावेश असलेल्या शिवकालीन गडांवर पुरातत्व विभागाच्या अनुमतीविना एक खिळाही ठोकता येत नाही. इतके कडक नियम असतांनाही राज्यातील गड अन् दुर्ग यांच्यावर थडगी, दर्गे यांची अवैधपणे पक्की बांधकामे करण्यात येत असून त्यांविरोधात अनेक तक्रारी करूनही कोणती कारवाई होतांना दिसत नाही. त्यामुळे असा पुरातत्व विभाग गड-दुर्ग यांचे जतन आणि संवर्धन कसे करणार ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. (छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अतुलनीय पराक्रमाचे साक्षीदार असलेले हे गड अन् दुर्ग समस्त हिंदूंसाठी प्रेरणास्थाने आहेत; मात्र याची जाण नसल्यामुळेच पुरातत्व विभागाला त्यांविषयी आत्मियता नाही आणि त्यामुळे कर्तव्याप्रती संवेदनशीलताही नाही ! ती असती तर पुरातत्व विभागाने गड-दुर्ग यांची अशी दूरवस्था होऊ दिली नसती. त्यामुळे शिवरायांच्या शौर्याचा हा अमूल्य ठेवा सुरक्षित रहावा, यासाठी आता धर्मप्रेमी हिंदूंनीच आवाज उठवायला हवा ! – संपादक)
गड-किल्ले यांवरील इस्लामी अतिक्रमण न हटवल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन छेडू ! – हिंदु जनजागृती समिती
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे मुख्य केंद्र असलेल्या ‘कुलाबा किल्ल्या’वर ज्या अधिकार्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे अनधिकृत मजार (थडगे) उभारण्यात आली आहे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. राज्यातील सर्वच गड अन् दुर्ग यांच्या ठिकाणी अशी अतिक्रमणे झाली आहेत का ? याचा अहवाल सादर करून ती अतिक्रमणे तात्काळ हटवण्यात यावीत. राज्यातील सर्व गडकोट इस्लामी आक्रमणमुक्त व्हायलाच हवेत. पुरातत्व खाते आणि प्रशासन यांनी गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे न हटवल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन छेडू, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीने दिली आहे. हिंदु जनजागृती समिती आणि राजे प्रतिष्ठान दुर्ग संवर्धन विभाग यांच्या वतीने ‘भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, मुंबई विभाग’ यांच्याकडे ११ जानेवारी या दिवशी देण्यात आलेल्या निवेदनामध्ये वरील चेतावणी देण्यात आली आहे.
गडांवरील थडगी आणि दर्गे यांच्या अवैध बांधकामाला संरक्षण देणारे पुरातत्व विभाग अन् पोलीस यांना वैध मार्गाने जाब विचारा !
गड-दुर्ग यांवर अवैधपणे उभारण्यात आलेली थडगी आणि दर्गे यांना पुरातत्व विभाग, पोलीस आणि प्रशासन संरक्षण देते; मात्र गडावर शिवजयंती साजरी करणार्या शिवप्रेमींवर गुन्हे नोंदवते. हा सर्व प्रकार निंदनीय आहे. समस्त शिवप्रेमींनी याचा पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांना जाब विचारावा. या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्याचा लोकशाहीने आपणाला अधिकार दिला आहे, हे लक्षात घ्या !
कुलाबा दुर्गावरील अवैध बांधकामाच्या प्रकरणी दोषींवर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करू ! – पुरातत्व विभागाचे आश्वासन
हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन सादर
मुंबई, ११ जानेवारी (वार्ता.) – आमचे अधिकारी कुलाबा किल्ल्यावर जाऊन आले आहेत. त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामाच्या प्रकरणातील दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी आम्ही योग्य प्रकारे प्रयत्न करू, असे आश्वासन शीव (मुंबई) येथील महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागातील साहाय्यक पुरातत्वशास्त्रज्ञ फाल्गुनी काटकर यांनी हिंदु जनजागृती समितीला दिले. ‘कुलाबा दुर्गावरील अनधिकृत बांधकाम त्वरित हटवावे आणि दोषींवर गुन्हे नोंदवावेत’, या मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ११ जानेवारी या दिवशी राज्य पुरातत्व विभागाच्या कार्यालयात निवेदन देण्यात आले. या वेळी नवी मुंबई येथील ‘दुर्ग संवर्धन विभागा’च्या ‘राजे प्रतिष्ठान’चे अध्यक्ष श्री. रोशन जंगम बेलसेकर, मानखुर्द शहराध्यक्ष श्री. राहुल आस्कट आणि हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक श्री. बळवंत पाठक हे उपस्थित होते.
पनवेल येथे नायब तहसीलदारांना निवेदन !
नायब तहसीलदार संजीव मांडे यांना निवेदन देतांना डावीकडून हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिलिंद पोंशे, दिघाटी ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री. रोहिदास शेडगे, सनातन संस्थेचे श्री. विराज दपके, नारी शक्ति संस्थेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीमती प्रतिमा चौहान आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. विक्रम पाटील आणि श्री. समीर भ्रमने
अतिक्रमणाच्या हेतूने टाकलेली चादर हटवणार्या शिवप्रेमींना धर्मांधांकडून धमक्या !
वर्ष २०२१ मध्ये दसर्याच्या दिवशी रायगड येथील ‘स्वराज्याचे शिलेदार’ आणि ‘मावळा प्रतिष्ठान’ या शिवप्रेमी संघटनांचे कार्यकर्ते कुलाबा किल्ल्यावर तोरण बांधण्यासाठी अन् गडावरील तोफांची पूजा करण्यासाठी गेले होते. त्या वेळी त्यांना गडावर एका ठिकाणी दगडांवर चादर पांघरून फुले वाहिलेली दिसली. त्या वेळी शिवप्रेमींनी ते साहित्य हटवले. त्या वेळी काही धर्मांधांनी चादर हटवणार्या शिवप्रेमी युवकांना मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आता त्याच ठिकाणी थडगे बांधण्यात आले आहे.
गडावरील दगडावर चादर टाकून, त्यानंतर फुले वाहण्याची परंपरा चालू करून गडांवर थडगी बांधण्याचे धर्मांधांचे षड्यंत्र यातून उघड होते ! पुरातत्व विभागाने धर्मांधांना वेळीच रोखले असते, तर ही वेळ आली नसती. गडावर शिवजयंती साजरी करतांना अनेकदा पोलीस आठकाठी करतात; मात्र गडावरील अशी अवैध थडगी हटवण्याचे धारिष्ट पोलीस का दाखवत नाहीत ?
अनधिकृत मदार (थडगे) बांधणारे धर्मांध आणि दुर्लक्ष करणारे अधिकारी यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंदवा ! – राजे प्रतिष्ठान
मुंबई, ११ जानेवारी (वार्ता.) – कुलाबा दुर्ग हे छत्रपती शिवरायांच्या आरमाराचे मुख्य केंद्र होते. या गडावर अनधिकृत मदार (थडगे) बांधण्यात आली आहे. ज्या अधिकार्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे हे अतिक्रमण झाले त्यांच्यावर आणि ज्या धर्मांधांनी हे कृत्य केले, त्या सर्वांवर तात्काळ गुन्हे नोंदवावेत, अशी मागणी ‘दुर्ग संवर्धन विभागा’च्या महाराष्ट्र राज्याच्या ‘राजे प्रतिष्ठान’च्या वतीने राज्य पुरातत्व विभागाकडे एका पत्राद्वारे करण्यात आली. या पत्रात म्हटले पुढे आहे की, राज्यातील सर्वच गडांच्या ठिकाणी अशी अतिक्रमणे झाली आहेत का ? याचा अहवाल शासनाने सादर करावा. अशी सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवण्यात यावीत. छत्रपती शिवरायांच्या वास्तूंवर होत असलेली अतिक्रमणे आम्ही कदापी सहन करणार नाही.
२ मासांपूर्वी कुलाबा दुर्गावर कोणतेही थडगे नव्हते, याचाच हा आहे पुरावा !!
१९ ऑक्टोबर २०२१ या दिवशी काही मुसलमानांनी कुलाबा किल्ल्यावर जाऊन तेथे एका ठिकाणी चादर चढवून फुले वाहिली. याची छायाचित्रे उपलब्ध झाली आहेत. त्या छायाचित्रावर दिनांकही आहे. या छायाचित्रातील बांधकामावर कोणतेही थडगे नाही; मात्र मागील आठवड्यात काढण्यात आलेल्या छायाचित्रामध्ये ज्या ठिकाणी मुसलमानांनी चादर चढवली आहे, त्याच ठिकाणी थडगे बांधून त्याला पांढरा रंग फासण्यात आला आहे. या दोन्ही छायाचित्रांवरून हे थडगे काही दिवसांपूर्वीच बांधण्यात आल्याचे सिद्ध होते.
गड-दुर्ग यांच्यावरील अवैध बांधकामाच्या विरोधात कारवाई न करणारे पोलीस आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी यांची वरिष्ठांकडे तक्रार करा आणि तक्रारीची प्रत दैनिक ‘सनातन प्रभात’लाही पाठवा !
शिवजयंतीच्या दिवशी गड-दुर्ग यांवर शिवजयंती साजरी करण्याला अनेक ठिकाणचे स्थानिक पोलीस विरोध करतात. पुरातत्व विभागाचे अधिकारी कार्यक्रमाला अनुमती देत नाहीत; मात्र हेच पोलीस आणि उपविभागीय आणि विभागीय पुरातत्व अधिकारी गड अन् किल्ले यांवरील दर्ग्यांचे अवैध बांधकाम, अवैधपणे साजरा केला जाणारा उरूस यांकडे दुर्लक्ष करतात. असे पोलीस आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी यांची वरिष्ठांकडे तक्रार करा आणि त्याची प्रत दैनिक ‘सनातन प्रभात’ला पुढील ई-मेल पत्त्यावर पाठवा : [email protected]
भाजपच्या नेत्यांनी घेतली केंद्रीय सांस्कृतिकमंत्री अर्जुन राम मेघवाल यांची भेट !
उच्चस्तरीय समिती स्थापन करून चौकशी करण्याची मागणी !
देहली – रायगड, विशाळगड, कुलाबा यांसह महाराष्ट्रातील अनेक गड अन् दुर्ग यांच्यावर धर्मांधांनी थडगी अथवा दर्गे बांधून केलेल्या अतिक्रमणाच्या गंभीर प्रकाराच्या विरोधात भाजपच्या नेत्यांनी केंद्रीय सांस्कृतिकमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे तक्रार केली आहे.
याविषयी ११ जानेवारी या दिवशी भाजपचे नेते श्री. विनय सहस्रबुद्धे आणि सुनील देवधर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने मंत्री महोदयांची भेट घेतली. उच्चस्तरीय समिती स्थापन करून गड अन् दुर्ग यांच्यावर अनधिकृत बांधकामाचे सर्वेक्षण करण्याची मागणी त्यांनी या वेळी केली.
याविषयी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना विनय सहस्रबुद्धे म्हणाले, ‘‘सातारा जिल्ह्यातील चंदन गडाचे नामकरण ‘दरगाह चंदन’ असे करून त्याला धार्मिक स्थळ बनवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पुणे येथील लोहगडावर भैरोबादेवाचे मंदिर असलेल्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात उरूस (धर्मांधांची धार्मिक मिरवणूक) साजरे करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. धार्मिक विधींशी जोडून गड अन् दुर्ग यांवर अशा प्रकारे नवीन बांधकाम करण्यात येत असल्याचे प्रकार पुढे आले आहेत. यांसह अशा प्रकारे अन्य गडांवरही प्रकार होत असल्यास त्याविषयी सर्वेक्षण होणे आवश्यक आहे.’’