कोल्हापूर येथील साहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर यांनी कार्यवाही करण्याचे दिले आश्वासन !

खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात न बांधण्याविषयी हिंदु जनजागृती समितीचे अन्न आणि औषध प्रशासनास निवेदन

अन्न आणि औषध प्रशासन साहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर (उजवीकडे) यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

कोल्हापूर, ५ जानेवारी (वार्ता.) – खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात बांधून देणे हे नागरिकांच्या आरोग्यासाठी हानीकारक आहे. वर्तमानपत्रासाठी वापरण्यात येणाार्‍या शाईत रसायन असल्याने गरम खाद्यपदार्थांच्या संपर्कात आल्यावर हे रसायन विरघळते अन् ते आरोग्यास अत्यंत घातक आहे. ही शाई पोटात गेल्यास पचनक्रियेत बिघाड होऊ शकतो, तसेच पोटाचे अनेक विकारही जडू शकतात. यामुळे ‘अन्न आणि औषध प्रशासना’च्या वतीने खाद्यपदार्थांच्या ‘पॅकिंग’साठी वर्तमानपत्राच्या कागदाचा उपयोग न करण्याविषयी तात्काळ आदेश निर्गमित करावेत, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अन्न आणि औषध प्रशासन साहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर यांना ४ जानेवारी या दिवशी देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे आणि श्री. आदित्य शास्त्री उपस्थित होते.

निवेदन स्वीकारल्यावर ‘या संदर्भात योग्य ती कार्यवाही करू आणि प्रसिद्धीपत्रक काढून संबंधितांना सूचित करू’, असे आश्वासन साहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर यांनी दिले.