राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : २.१.२०२२

प्रस्तूत सदरातून राष्ट्र आणि धर्म यांच्यावर होत असलेल्या घटना स्वरूपांतील विविध आघात अन् त्यांवर नेमकी उपाययोजना नि दृष्टीकोन देण्यात येतात. यातून आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

भारताची लज्जास्पद ‘धर्मनिरपेक्षता’ !

‘भारत हे एकमेव महत्त्वपूर्ण सांस्कृतिक राष्ट्र आहे, जेथे तेथील जनतेला तिचा गौरवशाली इतिहास आणि वारसा याचा विरोध करण्यासाठी अन् त्यांच्यावर आक्रमण करणार्‍यांचा उदोउदो करण्यासाठी शिस्तबद्ध पद्धतीने शिकवले जाते. यालाच भारतामध्ये ‘धर्मनिरपेक्षता’ म्हणतात !’

– ‘गरुड प्रकाशन’चे प्रमुख आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. संक्रांत सानू, नेपाळ


खोटे बोलणार्‍या अधिवक्त्यांनाही शिक्षा केली पाहिजे !

‘मुंबईमध्ये अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणे, तिला डोळा मारणे आणि पैशांचे आमीष दाखवून तिला जवळ बोलावणे, ही कृत्ये करणार्‍या २८ वर्षांच्या युवकाला विशेष पॉक्सो न्यायालयाने ४ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. दोषी युवक आतापर्यंत ४ वर्षे कारागृहात असल्यामुळे न्यायालयाने त्याला आणखी ३ दिवसांची साधी शिक्षा ठोठावली आहे. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी पूर्ववैमनस्यातून आरोपीला गोवल्याचे आरोपीच्या अधिवक्त्याने न्यायालयात म्हटले; मात्र त्याविषयी कोणतेही ठोस पुरावे त्यांना न्यायालयात सादर करता आले नाहीत.’


शिक्षकांच्या शिबिरामध्ये सरस्वती पूजन होण्यासाठी आग्रह करावा लागतो, हे प्रशासनाला लज्जास्पद !

‘राज्य सरकारकडून शिक्षकांसाठी तालुका पातळीवर घेतल्या जाणार्‍या शिबिरामध्ये ‘सरस्वती पूजन झाले पाहिजे’, असा आग्रह करावा लागतो.’ – सौ. सुवर्णा साळुंखे, शिक्षक, पाळधी (जळगाव)


उत्तरदायींची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना आयुष्यभर कारागृहात ठेवा !

‘नागपूर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संजय थूल यांनी माहितीच्या अधिकारात रिझर्व्ह बँकेकडे मागितलेल्या माहितीतून वर्ष २०११-२०१२ पासून २०२०-२०२१ पर्यंतच्या १० वर्षांत राष्ट्रीयीकृत बँकांचे ८ लाख ८४ सहस्र ६७९ कोटी रुपये बुडीत खात्यात गेले असल्याचे निदर्शनास आले आहे. खासगी बँकांप्रमाणे वसुली मोहीम राबवण्यास राष्ट्रीयीकृत बँका अपयशी ठरल्या. कर्जदाराची विनाउपयोगी मालमत्ता जप्त करून विकल्यानंतरही वसुली अपूर्णच राहिली, अशीही माहिती उघड झाली आहे.’