सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर भाजपची सत्ता

विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह १० संचालकांचा पराभव एकूण १९ जागांपैकी भाजपला ११, तर महाविकास आघाडीला ८ जागा

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (जिल्हा बँकेवर) अखेर भाजपने सत्ता स्थापन केली आहे. बँकेच्या संचालकपदाच्या १९ जागांसाठी ३० डिसेंबरला निवडणूक झाली होती. तिचा निकाल ३१ डिसेंबर या दिवशी घोषित करण्यात आला. यामध्ये भाजपप्रणित सिद्धिविनायक पॅनलला ११, तर महाविकास आघाडीप्रणित सहकार समृद्धी पॅनलला (शिवसेना ३, राष्ट्रीय काँग्रेस ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेस २) एकूण ८ जागांवर विजय मिळवता आला. या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष तथा शिवसेनेचे नेते सतीश सावंत, उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश दळवी, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांच्यासह १० संचालकांचा पराभव झाला, तर विद्यमान ५ संचालक विजयी झाले.

भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे त्यागपत्र

जिल्हा बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी पदाचे त्यागपत्र दिले आहे.

जिल्हा बँक जिंकली, आता लक्ष महाराष्ट्राच्या सत्तेकडे ! – नारायण राणे, केंद्रीय मंत्री

कणकवली – जिल्हा बँकेच्या निवडणुकीत १९ पैकी ११ पदांवर भाजपप्रणित उमेदवार निवडून आल्यानंतर भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, ‘‘जिल्हा बँक जिंकली आहे, आता लक्ष महाराष्ट्राच्या सत्तेकडे आहे. आमदार नितेश राणे, माजी खासदार नीलेश राणे यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे या निवडणुकीत यश मिळवता आले. तेली यांनी दिलेल्या त्यागपत्रावर पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील आणि तो आम्हाला मान्य असेल.’’

सतीश सावंत यांचा निसटता पराभव

या निवडणुकीत बँकेचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे नेते सतीश सावंत यांचा निसटता पराभव झाला. सावंत आणि त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे विठ्ठल देसाई यांना समसमान मते मिळाली. त्यामुळे चिठ्ठी टाकून नाव निवडण्यात आले. त्यामध्ये देसाई विजय झाले. सावंत यांचा झालेला पराभव शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.