विशाळगडावर मद्याच्या बाटल्यांचा ढिग आणि मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा

  • पुरातत्व विभाग आणि प्रशासन यांचे अक्षम्य दुर्लक्ष

  • विशाळगड संवर्धन समितीकडून विशाळगडाची स्वच्छता !

प्रशासनाची असंवेदनशीलता राष्ट्रप्रेमींना गडकिल्ल्यांचे रक्षण करण्यास भाग पाडते हे दुर्दैवी ! – संपादक 

विशाळगडावर गोळा केलेल्या कचर्‍यासह शिवप्रेमी आणि गडकोटप्रेमी

कोल्हापूर, २८ डिसेंबर (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तसेच बाजीप्रभु आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांच्या बलीदानाने पवित्र झालेल्या विशाळगडाची सध्या दुरवस्था झालेली दिसून येत आहे. गडावर मद्यपान करणार्‍यांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले असून अनेक ठिकाणी मद्याच्या बाटल्या आणि प्लास्टिकचा कचरा आढळून येत आहे. गडावर मद्यबंदी केवळ नावालाच असून प्रशासन काहीच कृती करत नसल्याने विशाळगड संवर्धन समितीकडून २६ डिसेंबर या दिवशी विशाळगडाची स्वच्छता करण्यात आली. यात १ टन मद्याच्या बाटल्या आणि १ टन प्लास्टिकचा कचरा गोळा करण्यात आला. या संदर्भात शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला असून प्रशासनाला कधी जाग येणार ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. (इतक्या मोठ्या प्रमाणात मद्याच्या बाटल्या गोळा होईपर्यंत पुरातत्व विभाग आणि प्रशासन काय करत होते ? पुरातत्व विभाग पांढरा हत्ती बनला असून गेली अनेक वर्षे गडकोटांकडे दुर्लक्ष करत असल्याने शेवटी आता हे कार्य गडकोटप्रेमी आणि शिवभक्त यांना करावे लागत आहे, हे पुरातत्व खात्यासाठी लज्जास्पद आहे ! – संपादक)

विशाळगडावर सापडलेल्या मद्याच्या बाटल्या

हा कचरा नंतर एका टेंपोतून गजापूर ग्रामपंचायत येथे जमा करण्यात आला. या मोहिमेत शिवनिष्ठा प्रतिष्ठान, शिवसह्याद्री प्रतिष्ठान, टीम पावनगड, आम्ही कट्टर शिवभक्त संघटना, शिवगड टीम, छत्रपती शंभूराजे प्रतिष्ठान, शिवयज्ञ परिवार, मराठा तितुका मेळवावा संघटना अशा संघटनांमधील कार्यकर्ते यांसह शिवप्रेमी, गडकोटप्रेमी असे १५० कार्यकर्ते सहभागी झाले होते.

(सौजन्य : Dnyaneshwar Aswale)

विशाळगडावरील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष केल्यानेच गडाचे पावित्र्य भंग होत आहे ! – सुनील घनवट, प्रवक्ते, विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती

श्री. सुनील घनवट

या संदर्भात विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे प्रवक्ते श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘विशाळगडावरील अतिक्रमण, तेथील समाधी आणि मंदिरे यांची दुरवस्था, तसेच अन्य सूत्रांवर विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीने या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन अन् नंतर आंदोलन छेडून या विषयाला वाचा फोडली आहे. विशाळगडावर मोठ्या प्रमाणात सापडणार्‍या मद्याच्या बाटल्या, प्लास्टिक कचरा याला मुखत्वेकरून गडावर झालेले अतिक्रमणच कारणीभूत आहे. गडाचे पावित्र्य भंग करणार्‍या गोष्टींवर, (उदा. मद्यपान, मांसविक्री) तसेच आरोग्यास हानी पोचवणार्‍या सर्वच गोष्टींना गडावर प्रतिबंध करावा, अशी मागणी आम्ही यापूर्वीच केली आहे.’’