केवळ चेतावणी नको, तर कारवाई अपेक्षित आहे. – संपादक
पुणे – प्रवासी वाहतूक करणार्या अनधिकृत (नोंदणी न करणारी वाहने) आणि अवैधरित्या (कोणतीही अनुमती न घेता) चालू असणारी भाडोत्री बाईक (दुचाकी), टॅक्सी सेवा त्वरित बंद करावी, तसेच नागरिकांनीही आपली वाहने अशा सेवेसाठी उपलब्ध करून देऊ नयेत. अशी सेवा चालू असल्याचे आढळल्यास न्यायालयीन कारवाई केली जाईल, अशी चेतावणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी दिली आहे. प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांची परिवहन गटात नोंद करणे आवश्यक आहे. अशा सेवेचा लाभ घेणार्या प्रवाशांस अपघातानंतर कोणताही लाभ मिळत नाही. ही आस्थापने अनधिकृतपणे केवळ ‘ऑनलाईन’ संकेतस्थळ किंवा ‘अॅप’च्या माध्यमातून व्यवसाय करत असतात. अशा वाहनांतून प्रवास करणे धोकादायक असून त्या वाहनांवर ‘विनापरवाना प्रवाशांची वाहतूक करण्याच्या’ गुन्ह्याखाली कारवाई करण्यात येईल, असे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.