‘ख्रिस्ती’ पंजाब !

संपादकीय

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी

भारत धर्मनिरपेक्ष देश असला, तरी या देशातील एकजात सर्व राजकीय पक्ष धर्माच्या आधारे त्यांच्या पक्षाची ध्येयधोरणे राबवत असतात. भारतात शेकडो जाती आहेत. त्यातून देशात जातीद्वेष शेकडो वर्षांपासून चालू आहे. हा जातीद्वेष दूर करण्याविषयी प्रत्येक राजकीय पक्ष बोलत असतो; मात्र काही ठराविक जातींना झुकते माप देण्याचे राजकारणही याच राजकीय पक्षांकडून स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत होत आले आहे. धर्म आणि जात यांच्याविना देशातील राजकीय पक्षांचे राजकारण होऊ शकत नाही, ही वस्तूस्थिती आहे. ही स्थिती पालटण्याचा प्रयत्न कुणी केला, तर तो कदापि यशस्वी होऊ शकणार नाही. याला कारण देशातील जनताच आहे. त्यांनाच या दोन्ही गोष्टी हव्या आहेत. यांतील सर्वच गोष्टी चुकीच्या आहेत, असे म्हटले जाईल, असे नाही; मात्र शासनकर्त्यांनी सर्वांना समानतेने पाहून सर्वांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहेत; मात्र तसे होतांना दिसत नाही. त्यातही देशातील बहुसंख्य असणारा हिंदु धर्म आणि धर्मीय यांना अनेक अवमान आणि त्रास यांना सामोरे जावे लागले आहे. काही राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्ष प्रत्येक राज्याच्या धर्म आणि जाती यांनुसार त्यांचे धोरण आखत आहे. पंजाबमध्ये काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांनी तेथील १० टक्के लोकसंख्या असणार्‍या ख्रिस्त्यांसाठी विशेष सुविधा पुरवण्याची घोषणा केली आहे. राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात बहुसंख्य हिंदूंऐवजी ८ ते १० टक्के असणार्‍या अल्पसंख्यांकांना विशेष सुविधा देण्याचा प्रयत्न प्रत्येक राजकीय पक्ष करत आला आहे. त्यातलाच हा प्रकार आहे. जर अशा सुविधा मिळत नसतील, तर त्या अल्पसंख्यांकांना मिळायला हव्यात, याविषयी कुणाचेही दुमत नसेल; मात्र बहुसंख्य हिंदूंना उपाशी ठेवून अल्पसंख्यांकांना पोटभर देणार असाल, तर याचा विरोध झाला पाहिजे.

तसेच पंजाबमध्ये गेल्या काही वर्षांपासून ख्रिस्ती मिशनर्‍यांचा सुळसुळाट झाला आहे. येथील गरीब आणि अनुसूचित जाती-जमातींमधील हिंदूंना, तसेच शिखांना आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करण्याचे प्रकार मोठ्या संख्येने घडत आहेत. काही ठिकाणी त्याला विरोधही होत आहे. हे बाटलेले ख्रिस्ती स्वतःचे नाव पालटत नसल्याने त्यांचे धर्मांतर झाले आहे कि नाही, हे लक्षात येत नाही. काही संघटनांचा आरोप आहे की, मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी हेही धर्मांतर करून ते ख्रिस्ती झाले आहेत. याविषयी चन्नी यांनी कधीही स्पष्टीकरण दिल्याचे ऐकिवात नाही. राज्याच्या अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष इमॅन्युएल नाहर यांनी, ‘राज्यात ख्रिस्त्यांसाठी अशा सुविधा देणारे चन्नी हे पहिले मुख्यमंत्री आहेत’, असे म्हटले आहे. त्यामुळे आता काही संघटनांनी चन्नी यांच्यावर ते ख्रिस्ती असल्याचा पुन्हा आरोप केल्यास आश्चर्य वाटू नये. चन्नी यांनी आता राज्यातील अन्य धर्मियांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. १० टक्के असलेल्यांच्या मतदानावर सत्ता मिळवता येत नाही, हे काँग्रेसने लक्षात ठेवले पाहिजे.