धर्मांध इस्लामिक संघटना रझा अकादमीवर राष्ट्रीय स्तरावर बंदी घालावी !

अधिवक्ता खुश खंडेलवाल यांची पत्राद्वारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी !

अशी मागणी का करावी लागते ? – संपादक 

अधिवक्ता खुश खंडेलवाल

मुंबई, १९ डिसेंबर (वार्ता.) – त्रिपुरामध्ये जी घटना मुसलमानांच्या विरोधात घडलीच नाही, त्याविषयी अफवा पसरवून महाराष्ट्रातील अमरावती येथे १२ नोव्हेंबर या दिवशी योजनाबद्धरित्या दंगल घडवण्यात आली. यामध्ये हिंदूंची मंदिरे, दुकाने यांना लक्ष्य करण्यात आले. रझा अकादमीने राज्यात आतापर्यंत घडवलेल्या दंगलींविषयी महाराष्ट्राच्या गृहविभागाकडून अहवाल मागवून घेण्यात यावा. या अहवालाच्या आधारे त्यावरून रझा अकादमी या संघटनेवर राष्ट्रीय स्तरावर बंदी घालावी, अशी मागणी ‘हिंदु टास्क फोर्स’चे संस्थापक अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी १८ डिसेंबर या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

या पत्रामध्ये अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी म्हटले आहे की,

१. अमरावती येथे ३० सहस्रांहून अधिक मुसलमानांनी मोर्चा काढला. या मोर्च्याने हिंसक होऊन हिंदूंच्या मालमत्तेला आग लावून हानी केली. हा मोर्चा रझा अकादमीकडून नियोजनबद्ध पुकारण्यात आला असल्याचे महाराष्ट्र पोलिसांच्या अन्वेषणात उघड झाले आहे. या कारवाईत ५५ हून अधिक धर्मांधांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे.

२. वर्ष २०१३ मध्ये आझाद मैदानावर याच रझा अकादमीने दंगल घडवून आणली होती. यामध्ये ३ कोटी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेची हानी झाली. या दंगलीमुळे २ जणांचा मृत्यू झाला, ६३ जण घायाळ झाले, तर महिला पोलिसांची विटंबना करण्यात आली होती. या वेळी सैनिकांच्या हौतात्म्याचे प्रतिक असलेल्या ‘अमर जवान’ स्मारकाचीही तोडफोड करण्यात आली होती. हा मोर्चाही म्यानमारमध्ये मुसलमानांवर अन्याय झाल्याचे कारण पुढे करून रझा अकादमीने काढला होता.

३. रझा अकादमी प्रत्येक वेळी मुसलमान समाजाचा भव्य मोर्चा काढते आणि या मोर्च्याच्या आडून राज्यात दंगल घडवली जाते.