आणखी किती पूल कोसळल्यानंतर प्रशासन जागे होणार आहे ? – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या तक्रारीनंतर साळाव-रेवदंडा (जिल्हा रायगड) पुलाच्या दुरवस्थेविषयी जिल्हाधिकार्‍यांकडून चौकशीचा आदेश !

पत्रकार परिषदेत बोलतांना श्री. सुनील घनवट आणि समवेत सौ. विशाखा आठवले

रायगड, ४ डिसेंबर (वार्ता.) – महाड येथील सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेत ४० जणांचे बळी गेले असतांना रायगडमधील प्रशासनाने यातून कोणताही बोध घेतल्याचे दिसून येत नाही. वाहतुकीची वर्दळ असलेल्या येथील साळाव-रेवदंडा पुलाची दुरवस्था झाली आहे. याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य मोहिमे’च्या वतीने रायगड जिल्हाधिकार्‍यांना १५ नोव्हेंबरला निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर रायगड जिल्हाधिकार्‍यांनी या पुलाच्या दुरवस्थेविषयी चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचा आदेश संबंधित विभागाला दिला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आधीही सावित्री नदीवरील पूल कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली असतांनाही प्रशासनाला जाग येत नसेल, तर आणखी किती पूल कोसळल्यानंतर प्रशासन जागे होणार आहे ?, असा प्रश्‍न हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी ४ डिसेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

साळाव-रेवदंडा (जिल्हा रायगड) पुलावर पडलेले खड्डे आणि त्याची झालेली दुरवस्था

या पुलाच्या, तसेच अन्य पुलांच्या दुरवस्थेविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेला सनातन संस्थेच्या सौ. विशाखा आठवले उपस्थित होत्या. त्यांनी पत्रकार परिषदेची प्रस्तावना केली.

श्री. सुनील घनवट पुढे म्हणाले,

१. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी साळाव-रेवदंडा पुलाची प्रत्यक्ष पहाणी केली असता या पुलावर गवत आणि झाडे उगवल्याचे आढळून आले. यामुळे पुलाच्या बांधकामाला तडे जात आहेत.

२. पुलांवर दिव्यांची व्यवस्था, तसेच आवश्यक सूचनांचे फलकही नाहीत. पुलाच्या दोन्ही बाजूला ‘रोड ब्लिंकर’ किंवा ‘केंट आय’ नाहीत. दगडी बांधकामातील कमानी आणि पुलांची दुरुस्ती अन् सुरक्षितता यांविषयी सरकारने आदेशही काढला आहे; मात्र त्यावर कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी विशेषत: पावसाळ्यात दुर्घटना घडण्याचा धोका आहे. प्रशासनाने तत्परतेने या पुलाच्या दुरुस्तीचेही काम पूर्ण करावे.

३. सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेनंतर चौकशीसाठी नियुक्त केलेल्या समितीवर लाखो रुपये व्यय करून अहवाल सिद्ध करण्यात आला. त्यामध्ये चौकशी समितीने पुलाच्या ठिकाणी दिव्यांची सोय करणे, सूचनाफलक लावणे, वनस्पतींची छाटणी करणे आदी उपाययोजना सूचवल्या आहेत. सरकारने त्याविषयीचा आदेशही काढला आहे; मात्र दुर्घटना घडलेल्या रायगड जिल्ह्यातील प्रशासनाने यावर कोणतीच कार्यवाही केलेली नाही.

४. विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने धोकादायक पुलांची वेळीच दुरुस्ती करावी. भविष्यात पुन्हा दुर्घटना घडल्यास कर्तव्यात कुचराई केल्याप्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हा नोंदवावा.

नागोठणे येथील पुलाचीही दुरवस्था !

साळाव-रेवदंडा पुलाप्रमाणे नागोठणे येथील पुलाचीही दुरवस्था झाली असल्याचे समितीच्या निदर्शनास आले. याविषयीही १ डिसेंबर या दिवशी ‘सुराज्य अभियान’च्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे. या पुलाची दुरुस्तीही तत्परतेने करावी, अशी मागणीही प्रशासनाकडे करण्यात आल्याचे श्री. घनवट यांनी सांगितले.