घटस्फोट : सध्याची एक मोठी समस्या !

१. पूर्वीची परंपरागत जुनी लग्नपद्धत

‘लग्न हे सामाजिक बंधन आहे. विवाह ही परंपरागत चालत आलेली प्रथा आहे आणि सुसंस्कृत घरात तो एक शिष्टाचार म्हणून पाळला जातो. पूर्वी राजेशाहीच्या काळात लग्न, विवाह हे ‘पण’ लावून केले जात असत. त्यामुळे नवरा मुलगा राजबिंडा, हुशार, पराक्रमी, कर्तबगार असाच असे. हे सगळे गुण पाहून ‘पण’ जिंकल्यानंतर नवरी मुलगी वराच्या गळ्यात वरमाला घालत असे. जसा नवरदेवाचा इतिहास असेल, तशीच नवरी मुलगी ही सुंदर, चारित्र्यवान, नावलौकिक असलेली आणि घरात गृहलक्ष्मी शोभेल अशीच असे. त्यामुळे लग्न झाल्यावर वागणूकसुद्धा शिष्टाचाराला शोभेल अशीच असायची.

१ अ. एकत्र कुटुंबपद्धतमुळे आनंदी जीवनाचा प्रभाव समाजात टिकून असणे : लग्न झाल्यानंतर ‘पती हा परमेश्वर आहे’, असे पत्नी मानायची, तर ‘पत्नी गृहलक्ष्मी आहे’, असा आदरभाव पती ठेवायचा. अशा भावनेमुळे प्रेम, ममता, आदर, काळजी या गोष्टी आपसूकच नांदायच्या आणि एकत्र कुटुंबपद्धती असल्यामुळे संपूर्ण कुटुंब जिव्हाळ्याने, गुण्या-गोविंदाने रहायचे. त्यामुळे आनंदी जीवनाचा प्रभाव समाजात टिकून राहिला होता आणि तो अगदी आतापर्यंत जाणवत होता.

१ आ. पूर्वी सर्व कुटुंबे आनंदाने नांदत असल्यानेच घटस्फोटाचे प्रमाण अत्यल्प असणे : या गोष्टींना कारणही तसेच होते. ते म्हणजे पूर्वजांनी केलेले आपल्या मुला-मुलींवरील संस्कार, शिस्त, आदर, आपल्यापेक्षा मोठ्यांना मान देणे, त्यांचे विचार ऐकून घेणे, त्यांच्या चांगल्या सूचनांचे पालन करणे आदी गोष्टींमुळेच सर्व कुटुंबे गुण्या-गोविंदाने आणि आनंदाने नांदत होती. त्यामुळे ‘घटस्फोट’ हा शब्द विरळच ऐकू यायचा.

२. सध्या घटस्फोटाचे वाढते प्रमाण दिसण्याची कारणे

२ अ. अलीकडच्या काळात घटस्फोटित मुला-मुलींचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे पालकांचा मुलींवरील संस्कारांचा अभाव, तसेच मुलेही आई-वडील, काका, मामा यांचा मान आणि आदर राखत नाहीत. वडीलधार्‍या माणसांना उद्धटपणे उत्तरे देतात. याचसमवेत दूरदर्शनवरील वेगवेगळ्या मालिका, तसेच चित्रपट पाहून त्यामधील व्यक्तीरेखांची स्वतःशी तुलना करणे या गोष्टींमुळेही वाईट परिणाम होत असतात आणि पाश्चात्त्य पद्धतीचा उदय या सर्वच गोष्टी वरील समस्येला कारणीभूत आहेत.

२ आ.  तसेच भरमसाठ वेतनाच्या नोकर्‍या, विविध व्यवसायांतून मिळणारा अमाप पैसा, रेस्टॉरंटमधील चटकदार पद्धतीचे खाणे, विभक्त कुटुंबपद्धत असल्यामुळे वडीलधार्‍या व्यक्तींच्या आदराचा अभाव ! वेगवेगळी लागलेली व्यसने, क्षुल्लक गोष्टीवरून भांडणे, स्वतःविषयीचा अहंकार यांमुळेच घटस्फोट घेण्याच्या कारणात भर पडत आहे. साहजिकच त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. याचा मनस्ताप त्या त्या कुटुंबाला होत आहे.

३. घटस्फोटाच्या परिणामाची आणखी एक समस्या

३ अ. वरपक्षाकडून भरपूर पैसे उकळण्याचा गैरप्रकार घडत असणे : या घटस्फोटाच्या परिणामाची आणखी एक समस्या समाजात रूजू पहात आहे. ती म्हणजे एकदा घटस्फोट घेतला की, न्यायालयाने त्याचा योग्य निवाडा दिल्याविना दुसरे लग्न करता येत नाही. न्यायालयाचा निकाल लागण्यासाठी पुष्कळ दिवस लागतात; म्हणून न्यायालयात जाण्यापेक्षा वधू-वराकडील मंडळी बसून तोडगा काढतात आणि प्रकरण मिटवतात; परंतु हे प्रकरण मिटवण्यासाठी वरपक्षाकडून भरपूर पैसे उकळले जातात.

४. सूज्ञ ज्ञाती बांधवांनी समाजात घटस्फोटाची प्रकरणे घडू नयेत, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !

अशा गोष्टींचा बीमोड वेळीच केला पाहिजे, तरच यापुढे समाजात निर्माण होणारे दुष्परिणाम टळतील. २-२ वर्षे स्थळे शोधायची, थाटात लग्न करायचे, कष्टाने जमवलेले पैसे व्यय करायचे आणि लग्न झाल्यावर ४-६ मासांनी घटस्फोट घ्यायचा अन् कुटुंबाची नाचक्की करून घ्यायची ! सूज्ञ ज्ञाती बांधव, बंधू-भगिनी यांनी यावर विचार करून समाजात अशी घटस्फोटाची प्रकरणे घडू नयेत; म्हणून आवर्जून आपापल्या परीने प्रयत्न करावेत आणि आपलीच कुटुंबे सुखी करावीत !’

(सध्या घटस्फोटाचे वाढते प्रमाण न्यून होण्यासाठी पाश्चात्त्य विकृतीचे अंधानुकरण टाळण्यासह हिंदूंना धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. याच्या जोडीला पूर्वापार चालत आलेली एकत्र कुटुंबपद्धतही आवश्यक आहे. हिंदूंना धर्मशिक्षण देणे आणि एकत्र कुटुंबपद्धत यांसाठी हिंदु राष्ट्र हवे ! – संपादक)

– श्री. नितीन मतकरी (साभार : ‘श्री पूर्णानंद वैभव’, माघी गणेशोत्सव २०१४)