‘साधकांनी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन करण्याचे महत्त्व आणि कार्यात येणार्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर करायचे प्रयत्न’ यांविषयी पू. रमानंद गौडा यांनी केलेले मार्गदर्शन !
सनातन संस्थेच्या वतीने भारतभर राबवण्यात येणार्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या निमित्ताने…
सनातनची अनमोल ग्रंथसंपदा सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी गुरुकृपेने सनातन संस्थेचे कर्नाटक राज्याचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे समष्टी संत) यांच्या मार्गदर्शनानुसार कर्नाटक राज्यात ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ राबवण्यात आले. त्यासंदर्भात प्रकाशित करण्यात येत असलेल्या या लेखात अभियानात अडथळे आणणारे साधकांचे स्वभावदोष आणि अहं अन् त्यांचे निर्मूलन करण्याचे महत्त्व, अडथळ्यांवर मात करण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर करायचे प्रयत्न आणि वेळेचे सुनियोजन यांविषयी पू. रमानंद अण्णांनी केलेले मार्गदर्शन पाहूया.
(भाग ६)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/527143.html
१. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांचे महत्त्व
१ अ. स्वभावदोष आणि अहं यांमुळे वेळेचे महत्त्व अल्प वाटून योग्य नियोजन करण्यात अडथळे येणे, ‘कोणती कृती प्राधान्याने करायची ?’, हे विसरल्याने साधकांना ताण येणे आणि याचा परिणाम त्यांची व्यष्टी अन् समष्टी साधना यांवरही होणे : ‘आपल्यातील काही जण नोकरी, काही जण व्यवसाय, काही जण घरात असतात, तर काही जण पूर्णवेळ साधना करत आहेत. वैयक्तिक कृती, घर, नोकरी, व्यवसाय, व्यष्टी आणि समष्टी साधना यांचे चांगल्या प्रकारे वेळेचे नियोजन केले, तर फलनिष्पत्ती चांगली मिळू शकते. स्वभावदोष आणि अहं यांमुळे आपल्यात वेळेचे महत्त्व अल्प असते. त्यामुळे साधक सुनियोजन करण्यात न्यून पडतात. ‘अतीआत्मविश्वास असणे, आळस, चालढकलपणा, ‘मला येते’, असा विचार करणे, इतरांवर निर्भर रहाणे, विचारण्याचा वृत्तीचा अभाव, चिंतनाचा अभाव, गांभीर्याचा अभाव, स्वीकारण्याची वृत्ती न्यून असणे’, असे स्वभावदोष आणि अहं यांमुळे काही साधकांचे नियोजन योग्य होत नाही. यामुळे ‘कोणती कृती प्राधान्याने करायची ?’, हे आपण विसरतो आणि मग साधकांना ताण येतो. याचा परिणाम त्यांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेवर होतो.
१ आ. स्वभावदोष आणि अहं यांमुळे झालेल्या चुकांचा स्वतःची साधना अन् गुरुकार्य यांवर कसा परिणाम होत आहे ?’, असे चिंतन करून योग्य नियोजन करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत ! : एक क्षण व्यर्थ गेला, तर तो परत मिळत नाही. त्यामुळे वेळ पुष्कळ अमूल्य आहे. पृथ्वीवर सर्वकाही मिळू शकते; पण गेलेला वेळ कधीच परत येत नाही. त्यामुळे प्रतिदिन मी कुठे नियोजन ठीक करत नाही ? माझ्याकडून कुठे चूक होत आहे ? त्या सर्व चुका कोणत्या स्वभावदोष आणि अहं यांमुळे होत आहेत ? या चुकांमुळे काय परिणाम झाला ? ‘यांमुळे माझी साधना आणि गुरुकार्य यांवर कसा परिणाम होत आहे ?’, असे चिंतन करून ते लिहून योग्य नियोजन करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
२. वेळेचे सुनियोजन कसे करायचे ?
२ अ. दिवसभरातील वैयक्तिक कृती करतांनाही वेळेचे योग्य नियोजन करायचे आहे ! : नियोजन करतांना वैयक्तिक कृतींचे नियोजन, उदा. सकाळी वेळेवर उठणे, अंघोळ करणे, अल्पाहार करणे, कपडे धुणे अशा प्रत्येक कृतीचे नियोजन आपल्याला करायचे आहे. तसेच व्यष्टी साधनेच्या अंतर्गत नामजपादी उपाय, नामजप, स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन होण्यासाठी सारणी लिहिणे, स्वयंसूचनांची सत्रे करणे या सर्व कृती दिवसभरात केव्हा करायच्या ? याचे नियोजन करणे. घरातील कामे आणि नोकरी यांच्या वेळेचे नियोजनही आपल्याला करायचे आहे.
२ आ. आपल्या वेळेचे योग्य नियोजन करून समष्टी साधनेचीही फलनिष्पत्ती वाढवण्याचा प्रयत्न करू शकतो ! : ‘समष्टीमध्ये गुरुदेवांनी आपल्याला दिलेली समष्टी सेवा चांगल्या प्रकारे होण्यासाठी मी किती वेळ देऊ शकतो ? वेळेचे नियोजन कसे करू शकतो ? कोणत्या सेवा करू शकतो ? कोणत्या सेवेला किती वेळ द्यायला हवा ? यांमधील प्राधान्याची सेवा कोणती ?’, असा पूर्ण अभ्यास करून आपले ध्येय डोळ्यांसमोर ठेवून सुनियोजन करून समष्टी साधनेचीही फलनिष्पत्ती वाढवण्याचा प्रयत्न करू शकतो.
२ इ. जे साधक वेळेचा सदुपयोग करून पूर्ण फलनिष्पत्ती मिळवण्यासाठी प्रयत्न करतात, त्यांच्यावर अखंड गुरुकृपा होते ! : जे साधक चांगले नियोजन करतात आणि वेळेचा सदुपयोग करून पूर्ण फलनिष्पत्ती मिळवण्यासाठी प्रयत्न करतात, त्यांच्यावर अखंड गुरुकृपा होते. त्यांची आध्यात्मिक प्रगतीही शीघ्र गतीने होते. हे सुनियोजन आज, उद्या नाही, तर निरंतर करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.
३. पू. रमानंद गौडा यांनी घेतलेल्या भावसत्संगामुळे साधकांना झालेले लाभ
३ अ. ‘कोणतीही परिस्थिती आली, तरी त्याला सामोरे जाण्यासाठी सिद्ध आहे’, अशी मानसिकता साधकांमध्ये निर्माण होऊन स्वभावदोषांवर मात करता येणे अन् सेवेची गती वाढून फलनिष्पत्तीही वाढणे ! : पू. रमानंद गौडा यांनी घेतलेल्या भावसत्संगात साधक ध्येयानुसार कृती करण्यासाठी प्रयत्न करू लागल्याने त्यांना आनंद मिळू लागला. त्यांना दिवसभर भावस्थितीत रहाता येत होते. अनेक सेवा असूनही कुणालाही ताण आला नाही. साधकांमध्ये ‘कोणतीही परिस्थिती आली, तरी त्याला सामोरे जाण्यासाठी सिद्ध आहे’, अशी मानसिकता निर्माण झाली. भावसत्संगामुळे साधकांना पुष्कळ लाभ झाला. भावसत्संगात सांगितलेल्या ध्येयानुसार प्रयत्न केल्यामुळे साधकांचे प्रयत्न चालू झाले आणि स्वभावदोषांवर मात करता आली. आत्मविश्वास निर्माण झाला आणि आध्यात्मिक ऊर्जाही मिळाली. या प्रयत्नांमुळे ग्रंथ अभियान सेवेची गती वाढून फलनिष्पत्तीही वाढली.
३ आ. भावसत्संगामुळे साधकांना कठीण परिस्थितीलाही सामोरे जाता येणे : भावसत्संगात ध्येय दिल्याने सेवेच्या समवेत कौटुंबिक स्तरावरील कठीण परिस्थितीलाही साधकांना सामोरे जाता आले. तसेच ‘ग्रंथांविषयी समाजात माहिती सांगतांना काही अपेक्षा न ठेवता आपण केवळ माध्यम आहोत’, असा भाव निर्माण झाला. कोणताही प्रसंग आला, तरी तो त्यांना स्वीकारता येऊ लागला. भावसत्संगात साधक अनुभव सांगतांना ते अखंड कृतज्ञताभावात होते.
३ इ. साधकांना ईश्वराच्या अस्तित्वाची अनुभूती अखंड येणे आणि भावसत्संगाच्या माध्यमातून मन, बुद्धी अन् शरीर अशी तिन्ही स्तरांवर शुद्धी होऊन साधकांना आनंद मिळण्यास प्रारंभ होणे : भावसत्संगात साधकांना स्वतःचे अस्तित्व विसरून ईश्वराच्या अस्तित्वाची आणि चैतन्याची अनुभूती अखंड येत होती. वातावरणात शांतता आणि शीतलता अनुभवता येत होती. भावसत्संगातील वातावरणामुळे साधकांचा उत्साह आणि स्फूर्ती वाढत होती. भावसत्संगाच्या माध्यमातून शरीर, मन आणि बुद्धी अशा तिन्हींची शुद्धी होऊन साधकांना आनंद मिळू लागला. साधकांना त्यांच्या शरिरावरील त्रासदायक शक्तीचे आवरण न्यून झाल्याची अनुभूती आली. बर्याच साधकांना प्रत्यक्ष गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवता येणे, कैलास पर्वतावरील शिवाचे दर्शन होणे, देवतांचे दर्शन होऊन भावस्थिती अनुभवता येणे, अशा अनुभूती आल्या.
४. अभियानातील अडथळे दूर होण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर केलेले प्रयत्न
ज्ञानशक्ती अभियानाचा प्रसार करतांना त्यामध्ये काही अडचणी येऊ नयेत आणि सर्व सेवा निर्विघ्नपणे होण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर पुढील प्रयत्न केले.
अ. संपूर्ण राज्यातील साधकांनी प्रतिदिन ५ वेळा वेळ ठरवून एकाच वेळी सामूहिक प्रार्थना करणे
आ. ‘ज्या साधकांची आध्यात्मिक पातळी ६० टक्के आणि त्याहून अधिक असून ते सेवेसाठी बाहेर येऊ शकत नाहीत’, अशा प्रत्येक जिल्ह्यातील ३ साधकांनी या अभियानातील अडथळे दूर होण्यासाठी प्रतिदिन १ घंटा समष्टी साधना म्हणून नामजप करणे
इ. प्रतिदिन व्यष्टी साधना आणि नामजपादी उपाय पूर्ण करणे
ई. ‘माझ्यामध्ये साक्षात् परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत. त्यांच्या हृदयात मी बिंदू रूपात आहे. ‘समोरच्या व्यक्तीशी बोलतांना साक्षात् परात्पर गुरुदेवच बोलत आहेत’, असा भाव ठेवून जिज्ञासूंशी बोलण्याचा प्रयत्न करणे
‘अशा प्रकारे पूर्ण आध्यात्मिक स्तरावर प्रयत्न केल्यास या महान कार्यात येणार्या अडचणी दूर होतील आणि आपली साधनाही चांगल्या प्रकारे होईल’, असे दृष्टीकोन देऊन पू. रमानंद अण्णांनी आध्यात्मिक बळ वाढवण्याचे महत्त्व सांगितले.
५. प्रत्येक छोट्या छोट्या विषयात ‘आयोजन कसे परिपूर्ण करायचे ?’, गुरूंना अपेक्षित आणि प्रत्येक कृती ‘सत्यं शिवं सुन्दरम् ।’ कशी करायची ?’, हे पू. रमानंद अण्णा यांनी शिकवणे !
गुरुपौर्णिमेच्या कालावधीतही पू. रमानंद यांनी घेतलेल्या भावसत्संगामुळे सर्व सेवा समयमर्यादेपेक्षा लवकर संपून पुष्कळ मोठ्या प्रमाणात फलनिष्पत्ती मिळाली होती. कोणतीही सेवा ‘योगः कर्मसु कौशलम् ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्लोक ५०) म्हणजे ‘प्रत्येक कर्म चांगल्या प्रकारे करणे म्हणजे योग साधणे’, यानुसार सेवा बारकाव्यांसहित कौशल्याने कशी करावी ?
चुकांविरहित परिपूर्ण कशी करायची ? प्रत्येक सेवेचे नियोजन मुळापर्यंत जाऊन व्यापक दृष्टीकोन ठेवून कसे करायचे ? प्रत्येक साधकाला या सेवा प्रवाहात कसे जोडायचे ? प्रत्येक छोट्या छोट्या कृतीचे आयोजन कसे परिपूर्ण करायचे ? गुरूंना अपेक्षित, तसेच प्रत्येक कृती ‘सत्यं शिवं सुन्दरम् ।’ कशी करायची ?’, हे प्रयत्न करण्यास पू. रमानंद अण्णांनी साधकांना शिकवले.
६. अभियानाची सेवा पूर्वसिद्धतेपासून ‘प्रत्येक सेवेचे सुनियोजन आणि सुव्यवस्थापन’ या ध्येयाने केल्याने प्रत्येक साधकात संघभाव निर्माण होणे आणि ही सेवा एक दैवी नियोजन असल्याचे लक्षात येणे !
या अभियानाची सेवा प्रारंभीपासून, म्हणजेच पूर्वसिद्धतेपासून ‘प्रत्येक सेवेचे सुनियोजन आणि सुव्यवस्थापन’ या ध्येयाने केल्याने प्रत्येक साधकात संघभाव निर्माण झाला. सर्वांनी उत्साह आणि प्रेरणा घेऊन भावाच्या स्तरावर प्रयत्न केले. यामुळे सर्वांना पुष्कळ आनंद मिळाला. पू. रमानंद अण्णांशी अभियानाच्या संदर्भात बोलतांना सर्वांची भावजागृती होत होती. ‘ही सेवा एक दैवी नियोजन आहे’, असे लक्षात आले.
७. गुरुचरणी व्यक्त केलेली कृतज्ञता
‘हे गुरुदेवा, या ज्ञानशक्ती प्रसार अभियान सेवेच्या प्रवाहामध्ये आम्हा सर्वांना जोडून भावसागरात डुंबण्याची अनुभूती तुम्हीच आम्हाला दिलीत. आमची क्षमता नसतांना आम्ही अज्ञानी जीव असतांना ही सेवा तुम्हीच शिकवलीत. ‘संतांच्या माध्यमातून प्रत्येक टप्प्यावर कसे प्रयत्न करायला हवेत ?’, याची दिशा तुम्हीच दिलीत. अशा समष्टी संतांच्या माध्यमातून तुम्हीच हे कार्य करत आहात, याचीही अनुभूती तुम्हीच आम्हाला दिलीत. इतक्या मोठ्या अभियानाचे नियोजन करून तुम्हीच आमच्याकडून हे सारे प्रयत्न करवून घेतले. तुमच्याच कृपेने सर्वकाही होत आहे, याविषयी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.
‘आपण आम्हाला जे काही शिकवलेत, ते संतांच्या माध्यमातून आपल्या संकल्पाने सर्वकाही करवून घेतले’, हे सर्व शब्दरूपात आपल्या चरणी समर्पित करत आहोत !’
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/531116.html
– श्री. काशीनाथ प्रभु (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के), सौ. मंजुळा रमानंद गौडा (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), श्री. विजय रेवणकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), कर्नाटक (ऑक्टोबर २०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक