नगर – शहरातील जिल्हा रुग्णालयाला आग लागल्याच्या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात ९ नोव्हेंबर या दिवशी वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे आणि सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत या २ परिचारिका अशा चौघांना अटक करण्यात आली आहे. यातील शिंदे आणि पठारे यांना निलंबित करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले होते, तर शेख आणि आनंत यांच्या सेवा समाप्तीचा आरोग्य विभागाचा आदेश आहे. काही सीसीटीव्ही फुटेजमधून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी आग लागल्यानंतर रुग्णांच्या बचावासाठी प्रयत्नच केले नसल्याचे आढळले आहे. चौघांच्या अटकेमागील हे एक प्रमुख कारण असल्याचे समजते.
जिल्हा रुग्णालयातील परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनांनी परिचारिकांना या गुन्ह्यात अटक केल्यामुळे निषेध नोंदवला असून ही कारवाई एकतर्फी असल्याचा आरोप केला आहे. यामधील प्रमुख सूत्रधाराला अटक करण्याची मागणी केली आहे. संघटनांनी सकाळी १ घंटा ‘काम बंद’ आंदोलन करत रुग्णालयाच्या आवारात राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.