एकदा कु. सायली कुटुंबियांच्या समवेत रामनाथी आश्रमात आली होती. त्या वेळी तिची आजी (आईची आई) श्रीमती मेघना वाघमारे आणि मामा श्री. धैवत वाघमारे यांना तिच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. कु. सायली रामनाथी आश्रमात आली असतांना जाणवलेली सूत्रे
१ अ. सायलीने बालसाधकांचा व्यष्टी साधनेचा आढावा घेणार्या साधिकेला ‘स्वतःचे कुठे चुकते ? आणि त्याचा अभ्यास कसा करायचा ?’, हे शिकण्यासाठी आश्रमात आलो असल्याचे सांगणे : ‘काही वर्षांपूर्वी कु. सायली रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आली होती. त्या वेळी तिला बालसाधकांच्या साधनेच्या व्यष्टी आढाव्याला बसण्याची संधी मिळाली. बालसाधकांचा आढावा घेणार्या साधिकेने तिला विचारले, ‘‘उन्हाळ्याच्या सुटीत लोक वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात. तू सुटीत आश्रमात कशी काय आलीस ?’’ त्यावर सायलीने सांगितले, ‘‘इकडे आल्यावर ‘आपले काय चुकते आणि त्याचा अभ्यास कसा करायचा ?’, हे शिकायला मिळते. त्यासाठी मी इकडे आले आहे.’’
१ आ. सेवेतून आनंद घेणे : त्या वेळी सायलीने आश्रमात पुष्कळ सेवा केली. ती आवरून खोलीतून सकाळी ८ वाजता प्रसाद घेण्यासाठी बाहेर पडल्यावर एकदम रात्री ९ वाजताच खोलीत यायची. तिला दिवसभर सेवा करतांना आनंद मिळायचा. एक सेवा संपली की, तिला लगेच दुसरी सेवा हवी असायची. त्यासाठी ती लगेच संबंधित साधकाकडे सेवा मागायला जायची.
१ इ. इतरांना साहाय्य करणे : सायलीने धान्य निवडण्याच्या ठिकाणीही सेवा केली. तेथील वयस्कर साधिकांना काही हवे असल्यास ती लगेच त्यांना साहाय्य करायची. ती त्यांना ‘तुम्ही उठू नका. मी तुम्हाला आणून देते’, असे सांगून तत्परतेने साहाय्य करायची.
१ ई. बालसाधकांना त्यांच्या चुकीची जाणीव करून देऊन सांभाळून घेणे : तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या बालसाधकांना ती सांभाळून घ्यायची. तिच्या वयाच्या बालसाधकांच्या समवेत सेवा करतांना ‘त्यांचे काही चुकत आहे’, असे लक्षात आल्यास ती त्यांना लगेच समजावून सांगायची आणि त्यांना चुकीची जाणीवही करून द्यायची.
१ उ. आश्रमात आल्यावर सायलीला लाभलेला एका संतांचा सत्संग
१ उ १. एका संतांच्या सत्संगाच्या वेळी सायलीचे मन निर्विचार होणे : एकदा एका संतांचा सत्संग होता. त्या वेळी ती त्यांच्याशी काहीच बोलली नाही. मी (श्रीमती मेघना वाघमार यांनी) तिला ‘तू त्यांच्याशी बोलली का नाहीस ?’, असे विचारल्यावर तिने सांगितले, ‘‘संतांना पाहिल्यावर आणि त्यांचे बोलणे ऐकतांना माझे मन निर्विचार झाले होते.’’ सत्संग चालू असतांना मी तिच्याकडे १ – २ वेळा बघितले. तेव्हा ‘त्यांच्याकडे पहातांना तिची भावजागृती होत आहे’, असे मला वाटले. ती ३ घंटे याच स्थितीत होती.
१ उ २. सूक्ष्मातील जाणणे
१ उ २ अ. एका संतांनी सत्संगात करवून घेतलेल्या सूक्ष्मातील प्रयोगांची सायलीने योग्य उत्तरे देणे : एका संतांनी साधकांकडून मधूनमधून ३ वेळा सूक्ष्मातील प्रयोग करून घेतला. त्यांनी ‘कुणाला सुगंध जाणवत आहे का ?’, असे विचारल्यानंतर प्रत्येक वेळी सायलीने सूक्ष्म गंध जाणवल्याचे सांगितले. त्यातही तिने ‘नेमकेपणाने कुठला गंध जाणवला’, हे अभ्यासपूर्ण सांगण्याचा प्रयत्न केला.
१ उ २ आ. गोव्यातील चर्च, मंदिरे आणि सनातनचा आश्रम यांतील सूक्ष्मातील भेद सायलीच्या लक्षात येणे : सायली आणि तिचे आई-वडील गोवा दर्शनाला गेले असतांना तिला चर्च, मंदिरे आणि सनातनचा रामनाथी आश्रम यांतील सूक्ष्मातील भेद लक्षात आला. चर्चमध्ये पाऊल टाकताक्षणीच तिला मळमळू लागले आणि ‘उलटी होते कि काय ?’, असे वाटल्याने ती चर्चमधून लगेच बाहेर आली. त्यानंतर गोव्यातील प्रसिद्ध मंदिरांमध्ये गेल्यावर तिला पुष्कळ चांगले आणि प्रसन्न वाटले. तिथून आश्रमात परत आल्यावर आश्रमात प्रवेश करतांना तिला अतिशय शांत अन् शीतल वाटले आणि अधिक चैतन्य जाणवले.’
– श्रीमती मेघना वाघमारे (आजी) आणि श्री. धैवत वाघमारे (मामा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.५.२०२१)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |