Live in Relationship : ‘लिव्‍ह-इन’मध्‍ये रहाणार्‍या नरेशने त्‍याच्‍या प्रेयसीची हत्‍या करून मृतदेहाचे केले ५० तुकडे !

खुंती (झारखंड) येथील घटना

(लिव्‍ह-इन म्‍हणजे विवाह न करता एकत्र रहाण्‍याचा प्रकार)

रांची (झारखंड) – ‘लिव्‍ह-इन’मध्‍ये रहाणार्‍या जोडीदारांसंबंधी अनेक गुन्‍हे गेल्‍या काही वर्षांत वारंवार समोर येत आहेत. यामध्‍ये आर्थिक शोषण, मारहाण, बलात्‍कार यांपासून ते निर्घृण हत्‍या येथपर्यंतच्‍या घटना समोर आल्‍या आहेत. अशीच एक भयावह घटना राज्‍यातील खुंती जिल्‍ह्यात नुकतीच घडली. येथील नरेश भेंगरा नावाच्‍या एका २५ वर्षीय तरुणाने त्‍याच्‍यासह ‘लिव्‍ह-इन’मध्‍ये रहाणार्‍या गंगी कुमारी (२४ वर्षे) हिची निर्घृण हत्‍या करत तिच्‍या मृतदेहाचे ५० तुकडे केले. २४ नोव्‍हेंबरला भटक्‍या कुत्र्यांनी जंगल परिसरातून मृतदेहाचे तुकडे बाहेर आणल्‍यानंतर या हत्‍येची उकल झाली. नरेश याला अटक करण्‍यात आली आहे.

१. नरेश आणि गंगी हे दोघे गेल्‍या काही वर्षांपासून चेन्‍नई येथे एकत्र रहात होते. दोघेही झारखंडमधील जोरडाग गावातील रहिवासी होते. कामाच्‍या निमित्ताने ते तमिळनाडूत रहात होते.

२. मधल्‍या काळात नरेशने गंगीला अंधारात ठेवून झारखंडमध्‍ये अन्‍य एका महिलेशी विवाह केला होता. असे असले, तरी तो तमिळनाडूमध्‍ये गंगी कुमारीसह रहात होता.

३. ८ नोव्‍हेंबरला नरेश आणि गंगी दोघेही झारखंडमधील गावी परतले होते. गंगीने त्‍याला त्‍याच्‍या घरी नेण्‍यास सांगितले. यावरून दोघांमध्‍ये भांडण झाले. अशात तिने त्‍याला आधी दिलेले पैसे त्‍याच्‍याकडे मागितले. नरेशने यासाठी नकार दिला. यानंतर नरेशने तिला जवळच्‍या जंगलात नेले. तिथे तिच्‍याच ओढणीने गळा दाबून हत्‍या केली आणि धारदार शस्‍त्रांनी तिच्‍या मृतदेहाचे ५० तुकडे केले अन् ते जंगलात फेकून दिले.

४. २४ नोव्‍हेंबरला भटक्‍या कुत्र्यांनी जंगल परिसरातून मानवी शरीराचे अवशेष बाहेर आणल्‍यानंतर लोकांना यासंदर्भात माहिती मिळाली. पोलिसांना जंगल परिसरातून गंगी कुमारीची बॅग मिळाली. त्‍यामुळे त्‍यांना नरेशपर्यंत पोचता आले.

संपादकीय भूमिका

‘लिव्‍ह-इन’मध्‍ये राहून अशा प्रकारचे भयावह गुन्‍हे करणे आता मोठ्या प्रमाणात घडू लागले आहे. मुळात धर्मशास्‍त्रविसंगत आणि अनैतिकतेचे भयावह प्रतीक असणार्‍या या प्रकाराला गुन्‍हा ठरवणे समाजहित जोपासण्‍यासाठी आवश्‍यक आहे, हेच खरे !