कोल्हापूर – ‘सुवर्ण जयंती नगरोत्थान’ (राज्यस्तर) मधून करण्यात येत असलेल्या रस्त्यांची कामे दर्जेदार होत नसल्याने प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी ठेकेदार ‘मे.एव्हरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपर्स’ यांना दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली आहे. या वेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, ठेकेदारांचे प्रतिनिधी, प्रकल्प सल्लागार यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या वेळी प्रशासकांना ठेकेदार ‘मे.एव्हरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपर्स’ यांनी निविदेतील शर्ती आणि अटींनुसार आवश्यक गोष्टींची जसे ‘साईट लॅब’ चालू करणे, प्रत्यक्ष कार्यालय चालू करणे आणि इतर गोष्टी यांची पूर्तता केली नाही, हे दिसून आले. डांबरीकरण करतांना ‘सेन्सर पेव्हर’चा वापर केला नाही. त्यामुळे प्रशासकांनी पहाणी करतांना कामाच्या जागेवर पंचनामा करून त्या ठिकाणचा चाचणी तुकडा घेऊन ते पडताळणीचे आदेश दिले. प्रारंभी पडताळणीमध्ये गुणवत्तेपेक्षा अल्प प्रमाणात डांबराची गुणवत्ता आढळून आल्याने त्यांना निविदेतील अटी आणि शर्तीच्या अधीन राहून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
शहर अभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांनाही ‘कारणे दाखवा’ नोटीस देऊन दंडात्मक कारवाई !
सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानातील कामाची १६ रस्त्यांची कामे विहित कालावधीत, गुणवत्तापूर्वक आणि दर्जेदार करून घेणे, कामावर देखरेख ठेवण्याचे दायित्व शहर अभियंता यांचे आहे. यासाठी सल्लागार आस्थापन आणि ठेकेदार यांच्याशी समन्वय ठेऊन सर्व गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक होते. ही कामे झाली नसल्याने शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यावर ५ सहस रुपये आणि तत्कालीन शहर अभियंता हर्षजित घाटगे यांच्यावर ४ सहस्र रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, तसेच कनिष्ठ अभियंता निवास पोवार हे दसरा चौक ते नंगिवली चौक या रस्त्यावर प्रशासक फिरती करतांना कामाच्या ठिकाणी उपस्थित नसल्याने त्यांना ३ सहस्र ५०० रुपये इतका दंड केला आहे.
संपादकीय भूमिका :रस्त्यांची कामे दर्जेदार न होण्याला ठेकेदार आणि सल्लागार यांचा निष्काळजीपणाच कारणीभूत ! |