पू. (सौ.) अश्विनी पवार म्हणजे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील साधकांची माऊली !

१. साधिकेकडून कितीही मोठी चूक झाली, तरी साधिकेशी आईसारखे प्रेमाने बोलणे

पू. (सौ.) अश्‍विनी पवार

‘मी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात शिवणाची सेवा करते. काही दिवसांपूर्वी पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या ब्लाऊजची दुरुस्ती करण्याची सेवा चालू होती. मी त्यांचा ब्लाऊज उसवून त्याला इस्त्री करत होते. इस्त्री अधिक तापल्याने त्यांचा नवीन ब्लाऊज जळला. मला होणार्‍या आध्यात्मिक त्रासांमुळे यापूर्वी पू. ताईंचे ब्लाऊज व्यवस्थित शिवले न जाणे, माप बिघडणे, असे झाले होते. त्यात माझ्याकडून त्यांचा ब्लाऊज जळला. पू. ताईंना हे मी घाबरतच सांगितले. तेव्हा त्या शांतपणे आणि प्रेमाने म्हणाल्या, ‘‘बघूया. दुसर्‍या एका काकूंना विचारूया की, त्यात काही सुधारणा करून वाईट दिसत नाही, असे काही करता येईल का ?’’ मी म्हणाले, ‘‘मी असेच कापड आणून देते.’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘नको, आपण बघूया.’’ त्यानंतर रात्री त्या मला परत दिसल्या. तेव्हाही त्या माझ्याकडे पाहून हसल्या. तेव्हा त्यांच्या मनात माझ्याविषयी प्रेमच होते. माझ्याकडून ब्लाऊज जळला; म्हणून त्यांच्या वागण्यात वेगळेपणा नव्हता. त्या केवळ निर्मळपणे आईप्रमाणे प्रेमच करत होत्या. आई जसे बाळाने कितीही मोठी चूक केली, तरी बाळावर प्रेमच करते, तसे ‘पू. ताई माझ्यावर प्रेम करतात’, असे मला वाटले.

२. साधकांचे स्वभावदोष आणि अहंचे पैलू ठाऊक असूनही साधकांवर निरपेक्ष प्रेम करणे

कु. स्वाती शिंदे

पू. (सौ.) अश्विनीताईंना माझे आणि अन्य साधकांचे स्वभावदोष अन् अहंचे पैलू ठाऊक असतात. तरीही त्या आम्हाला भेटल्यावर जवळ घेतात आणि आमची विचारपूस करतात. त्या आईच्या मायेने माझा चेहरा आणि गाल यांवरून हात फिरवतात. त्यांच्या डोळ्यांत अपार निरपेक्ष प्रेम, माया आणि आनंद ओसंडून वहात असतो. त्यांच्या त्या निरपेक्ष प्रेमाने ‘गुरुमाऊलीच (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आपल्यावर प्रेम करत आहेत’, असे वाटून माझे मन भरून येते आणि मला हलकेपणा जाणवतो अन् ‘त्यांचे माझ्याकडे लक्ष आहे’, या विचाराने कृतज्ञताभाव जागृत होतो आणि मला साधनेचे प्रयत्न करायला शक्ती मिळते.

३. सेवा भावपूर्ण, परिपूर्ण आणि ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ करण्याची तळमळ असणे

आम्ही पायपोस शिवण्याची सेवा करत होतो. तेव्हा पू. ताईंनी आम्हाला ‘पायपोससाठी कापड निवडतांना त्याचा अभ्यास कसा करावा ? त्याच्या कडेला कोणत्या कपड्याची अन् रंगाची कड (पायपिंग) लावावी ?’ इत्यादी बारकावे शिकवले. तसेच त्यांनी आम्हाला सांगितले, ‘‘शरणागतभाव ठेवून शिवल्यास त्यातून चांगली स्पंदने येतील.’’ खरेतर पू. ताईंनी याआधी कधी शिवणाचे काम केलेले नाही, तरीही त्यांनी त्या सेवेतील बारकावे सांगून ‘सेवा भावपूर्ण करून गुरुचरणी कशी समर्पित करावी ?’ हे सांगितले. या प्रसंगांतून ‘संत कोणत्याही विषयावर मार्गदर्शन करून आमच्यासारख्या जिवाकडून भावपूर्ण सेवा आणि साधना करवून घेतात. तसेच ‘संतांना प्रत्येक सेवा भावपूर्ण, परिपूर्ण आणि ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ करण्याची तळमळ असते’, हे शिकायला मिळाले.

४. साधिकेला होणारा आध्यात्मिक त्रास सूक्ष्मातून जाणून नामजपादी उपाय करण्यास सांगणे

५.९.२०२४ या दिवशी, म्हणजेच पितृपक्ष चालू झाल्याच्या दुसर्‍याच दिवशी सकाळी मी ध्यानमंदिरात नामजप करत होते. तेव्हा माझे मन पुष्कळ अस्वस्थ आणि अस्थिर झाले होते. माझा नामजप होत होता; पण मला शांत वाटत नव्हते. ‘आता जप करणे राहू दे. आधी जेवून येऊया’, या विचाराने मी ध्यानमंदिरातून बाहेर आले. तेव्हा मला पू. ताई भेटल्या. त्या म्हणाल्या ‘‘स्वाती, त्रास वाढला आहे. तू दत्ताचा नामजप १.३० घंटे कर. सर्वांना एक घंटा सांगितला आहे; पण तू त्रासानुसार दीड घंटे कर.’’ मी महाप्रसाद झाल्यावर दीड घंटा नामजप केला आणि मला बरे वाटू लागले. तेव्हा मला पू. ताईंबद्दल कृतज्ञता वाटली. पू. ताईंना साधकांचा त्रास लगेच जाणवतो. त्यांची सूक्ष्मातील समजण्याची क्षमता अफाट आहे.

५. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन सत्संग भावसत्संग वाटणे

पू. ताई सत्संग घेतांना प.पू. गुरुमाऊलीची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची) आठवण होते. या सत्संगात भाव जागृत होतो आणि सत्संग स्वभावदोष अन् अहं निर्मूलनासाठी सत्संग नसून तो भावसत्संग वाटतो.

‘पू. (सौ.) अश्विनीताई या देवद आश्रमातील साधकांसाठी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आहेत’, असे मला वाटते. प.पू. गुरुमाऊली आपणच आम्हाला पू. (सौ.) अश्विनीताई दिल्याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– कु. स्वाती बाळकृष्ण शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.९.२०२४)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.