हिसार (हरियाणा) येथे भाजपच्या खासदाराच्या गाडीवर शेतकरी आंदोलकांचे आक्रमण

अन्य एका घटनेत आंदोलकांनी भाजपच्या नेत्यांना ७ घंटे घातला घेराव !

चंडीगड – हरियाणा राज्यातील हिसार जिल्ह्यामध्ये शेतकर्‍यांच्या आंदोलनाच्या वेळी भाजपचे राज्यसभेतील खासदार रामचंदर जांगरा यांच्या गाडीवर आक्रमण करण्यात आले. या वेळी त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. या आंदोलकांनी मात्र ‘भाजपच्या गुंडांनी आमच्यावर आक्रमण केले’, असा दावा केला आहे. जांगरा यांनी या आंदोलकांना ‘बेरोजगार’ आणि ‘मद्यपी’ अशा शब्दांत हिणवल्याने हे आक्रमण करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. जांगरा यांच्या गाडीची नासधूस केल्यावरून २ शेतकर्‍यांना अटक करण्यात आली आहे.

सौजन्य : IndiaTV

दुसर्‍या एका घटनेत राज्यातील रोहतक जिल्ह्यात शेतकरी आंदोलकांनी भाजपच्या काही नेत्यांना एका मंदिरात घेराव घालून अनुमाने ७ घंटे कोंडून ठेवले. केदारनाथला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. त्याचे थेट प्रक्षेपण पहाण्यासाठी हे नेते किलोई गावातील एका मंदिरात जमले होते. हे कळताच शेतकरी आंदोलकांनी मंदिराला घेराव घातला. ‘भाजपच्या नेत्यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर त्यांना मंदिरातून बाहेर येऊ देण्यात आले’, असा दावा शेतकरी आंदोलकांनी केला.

…तर डोळे फोडू आणि हात तोडून टाकू ! – भाजपचे खासदार अरविंद शर्मा यांची धमकी

जर कुणी हरियाणाचे माजी मंत्री मनीष ग्रोव्हर यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांचे डोळे फोडू आणि हात तोडून टाकू, अशी धमकी भाजपचे खासदार अरविंद शर्मा यांनी दिली.

येथे भाजपच्या काही नेत्यांना शेतकरी आंदोलकांनी घेराव घालून कोंडून ठेवल्यानंतर शर्मा यांनी ही धमकी दिली.