स्वतः भगवंतस्वरूप असूनही आई-वडिलांची कृतज्ञताभावाने, परिपूर्णतेने आणि सहजभावाने सेवा करून समाजापुढे उत्तम सेवेचा आदर्श ठेवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘वर्ष १९९० पासून सनातन संस्थेचे कार्य मुंबई येथे चालू झाले. तेव्हापासून आम्ही काही साधक प.पू. डॉक्टरांच्या घरी सेवेनिमित्त जाऊ-येऊ लागलो. त्या वेळी प.पू. डॉक्टरांचे आई-वडील त्यांच्याकडे रहात होते. आम्ही सर्व साधक त्यांना प.पू. डॉक्टर संबोधायचे त्याप्रमाणे ‘ताई’ आणि ‘दादा’ असे संबोधत होतो. ते दोघेही आम्हा सर्व साधकांवर भरभरून प्रेम करायचे. ते आम्हाला स्वत:च्या कुटुंबाचाच एक भाग समजायचे. सध्या समाजात आई-वडील वृद्ध झाले की, मुलांना नकोसे होतात. काहीजण ‘त्यांची अडगळ नको’; म्हणून वेगळे घर घेऊन रहातात, तर काही जण त्यांना वृद्धाश्रमात सोडून देतात. ज्या आई-वडिलांनी आपल्यावर चांगले संस्कार करून समाजात नावलौकिक मिळवून दिला, त्यांच्याप्रती किती हा कृतघ्नपणा ? ‘अशा समाजाला योग्य दृष्टीकोन मिळावा’, यासाठी प्रत्यक्ष भगवंताने (परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी) त्यांच्या आई-वडिलांची सेवा कशी केली ?’, हे येथे दिलेल्या उदाहरणांवरून लक्षात येईल आणि ‘देवाची प्रत्येक कृती किती परिपूर्ण असते ?’, हेही शिकता येईल.
‘सेवा करतांना प्रत्येक कृतीला भक्तीमार्गानुसार भावाची आणि कर्मयोगानुसार परिपूर्णतेची जोड देऊन आध्यात्मिक स्तरावर सेवा कशी करायची ? हे प.पू. डॉ. आठवले यांनी केलेल्या त्यांच्या आई-वडिलांच्या सेवेतून शिकायला मिळते. ३१.१०.२०२१ या दिवशी आपण मुंबई येथील सेवाकेंद्रात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेत राहून सेवा करणारे ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच ेश्री. दिनेश शिंदे यांनी ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी आई-वडिलांची सेवा किती परिपूर्ण केली !’ याविषयी अनुभवलेली काही सूत्रे पाहिली. आज त्यापुढील भाग पाहूया.
सध्याचे युग ‘वापरा आणि फेकून द्या’ (Use & Throw) या तत्त्वावर चालणार्यांचे आहे. ‘मुलांना पाळणाघरात आणि आई-वडिलांना वृद्धाश्रमात’ ठेवणारे पाश्चात्त्य संस्कृतीचा पगडा असलेली पिढी आता आई-वडिलांकडे ‘उपयोगिते’च्या दृष्टीने पाहू लागली आहे. ‘वृद्ध आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणे’, ही संस्कृती बनलेल्या समाजाकडून आई-वडिलांबद्दल आदर आणि मानसन्मान यांची अपेक्षा तर सोडाच; परंतु मुलांनी त्यांच्या मालमत्तेवर डोळा ठेवून त्यांचे जगणेही असह्य केलेले असल्याचे आपण पहातो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रमाणे संत-सेवा समजून आई-वडिलांची सेवा करणारी संतती तर फारच दुर्मिळ ! खालील सूत्रांमधून ‘वृद्धांची सेवा करतांना कसा भाव ठेवायला हवा ? कोणत्या गोष्टींची दक्षता घ्यायला हवी?’ प्रेमपूर्वक आणि परिपूर्ण सेवा कशी करावी ?’, हे समष्टीला शिकायला मिळणार आहे. साधकांनी संत वा वयोवृद्ध यांची सेवा अशीच सेवाभावाने केल्यास त्यांची आध्यात्मिक उन्नती जलद होणार, हे निश्चित ! (भाग ३ रा)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/523270.html
७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी रुचिपालट म्हणून प.पू. दादांच्या खाण्यात विविधता ठेवणे
प.पू. दादांचे जेवण फारच अल्प झाले होते. ‘सकाळ-संध्याकाळ चहा घेणे आणि दुपारी अन् रात्री जेवणात एक वाटी दूध पिणे’, एवढाच त्यांचा दिवसभराचा आहार असायचा. प.पू. दादांना दात नसल्यामुळे त्यांना कुठलाही पदार्थ चावून खाता येत नसे. यासाठी प.पू. डॉक्टर त्यांना केकचा चुरा करून तो दुधामध्ये घालून द्यायचे, कधी लाडवाचा चुरा करून तो दुधात घालून द्यायचे, तर कधी कधी त्यांच्यासाठी उसाचा रस आणून ठेवायचे आणि त्यांना तो हवा असेल, त्या वेळी द्यायचे. अशा प्रकारे प.पू. डॉक्टर ‘प.पू. दादांना तेच-तेच खाऊन कंटाळा येऊ नये’, यासाठी त्यांच्या खाण्या-पिण्यात विविधता ठेवायचे आणि ‘त्यांना काय आवडते ?’, ते आठवणीने द्यायचे.
८. परात्पर गुरु डॉ. आठवले आई-वडिलांच्या खोलीची करत असलेली स्वच्छता !
८ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आई-वडिलांच्या खोलीची अल्पावधीत परिपूर्ण स्वच्छता करणे : प.पू. डॉक्टर प्रती १५ दिवसांनी पू. (सौ.) ताई आणि प.पू. दादांच्या खोलीची पूर्ण स्वच्छता करायचे. त्या वेळी ते त्यांच्या रहाण्याची व्यवस्था तात्पुरती बाजूच्या खोलीमधे करायचे. नंतर ते खोलीतील आणि भिंतींवरील जळमटे काढणे, दंडदीप (ट्युबलाईट) आणि पंखा पुसणे, पलंगावरील गाद्यांना ऊन दाखवणे, पलंगाखालची जळमटे काढणे, ‘त्यात ढेकूण होऊ नये’, यासाठी औषधे मारणे, कपाटातील कपड्यांच्या घड्या घालून ते नीट लावून ठेवणे, अनावश्यक साहित्य काढणे, पलंगावरील चादर पालटणे आणि ती धुणे’, अशा सर्व सेवा करायचे. या सर्व सेवा ते एकटेच करत असूनही एक ते दीड घंट्यात सर्व सेवा पूर्ण करायचे. यावरून त्यांची सेवेची गतीही लक्षात येते.
८ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आई-वडिलांच्या खोलीची सेवा करण्यासाठी साधकांना सिद्ध केल्याने साधकांकडून संतांची सेवाही परिपूर्ण होणे : प.पू. दादा आणि पू. (सौ.) ताई यांच्या खोलीच्या स्वच्छतेची सेवा करत असतांना प.पू. डॉक्टर एका साधकाला शिकण्यासाठी समवेत घ्यायचे. त्यामुळे ‘वेळप्रसंगी आणि पुढे-मागे साधक ती सेवा करू शकेल’, असा त्यांचा दृष्टीकोन होता. बरेच साधक प.पू. डॉक्टरांसमवेत प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या आश्रमात भंडार्याला जायचे आणि प.पू. डॉक्टरांनी शिकवल्याप्रमाणे तेथील सेवा करायचे. प.पू. बाबांचे भक्त साधकांची सेवा पाहून कौतुक करायचे. अशा प्रकारे प.पू. डॉक्टर साधकांना परिपूर्ण सेवा करता येण्यासाठी सिद्ध करत होते.
९. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या अनुपस्थितीत आई-वडिलांची सेवा व्यवस्थित होण्यासाठी साधकांची करून घेतलेली सिद्धता !
९ अ. आरंभी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्री गुरूंकडे जातांना त्या कालावधीत भावांना आई-वडिलांच्या सेवेसाठी घरी रहाण्यास बोलावणे : प.पू. डॉक्टर प.पू. भक्तराज महाराज यांच्याकडे जाऊ लागले. तेव्हा आरंभी ‘प.पू. दादा आणि पू. (सौ.) ताई यांच्या सेवेकडे दुर्लक्ष होऊ नये’, यासाठी ते त्यांचे भाऊ सद्गुरु अप्पाकाका (सद्गुरु (कै.) डॉ. वसंत आठवले), श्री. विलासकाका किंवा (कै.) डॉ. सुहासकाका यांना त्या कालावधीत आई-वडिलांसमवेत येऊन रहाण्यास सांगायचे.
९ आ. श्री गुरूंकडे आणि प्रसारासाठी गावोगावी वारंवार जावे लागल्यावर ‘आई-वडिलांच्या सेवेत खंड पडू नये आणि शीव येथे येण्यासाठी भावांनाही प्रवासाचा त्रास होऊ नये’, या उद्देशाने प.पू. डॉक्टरांनी आई-वडिलांची सेवा करण्यासाठी साधकांना सिद्ध करणे : पुढे-पुढे संस्थेचे कार्य पुष्कळ वाढल्यामुळे प.पू. डॉक्टरांचे दौर्यांवर जाण्याचे प्रमाण वाढले. ‘आपल्याला सातत्याने दौर्यावर जावे लागणार आणि भावांना प्रतिदिन प्रवास करून शीव येथे येऊन रहाणे कठीण जाणार’, असा विचार प.पू. डॉक्टरांच्या मनात आला. त्यानंतर ‘प.पू. दादा अन् पू. (सौ.) ताई यांना कुठलीही अडचण येऊ नये आणि त्यांचे सर्व नीट व्हावे’, या दृष्टीने प.पू. डॉक्टरांनी प.पू. दादा आणि पू. (सौ.) ताई यांच्या संदर्भातील सर्व सेवा एक-एक करून साधकांना शिकवल्या.
९ इ. साधकांना सेवा करायला शिकवल्यावर साधक त्या सेवा वेळेत आणि परिपूर्ण करत असल्याची निश्चिती करणे : त्यानंतर काही दिवस प.पू. डॉक्टर ‘साधक प.पू. दादा आणि पू. (सौ.) ताई यांची सेवा करतांना त्यात काही चुका होत नाहीत ना ?’, हे पहायचे. हळूहळू साधकांना त्या सेवा व्यवस्थित जमायला लागल्यावर त्यांनी स्वतः त्या सेवा करणे थांबवले. प.पू. डॉक्टरांनी सेवा करणार्या साधकांना इतके उत्तमरित्या सिद्ध केले होते की, पू. (सौ.) ताई आणि प.पू. दादा प.पू. डॉक्टरांना म्हणायचे, ‘‘तुम्ही निश्चिंत होऊन प्रसाराला जा. आमचे करायला साधक आहेत. तुम्ही आमची काळजी करू नका.’’ त्यामुळे प.पू. डॉक्टरांची काळजी मिटली. त्यानंतर प.पू. डॉक्टरांना त्यांची सेवा करावी लागली नाही.
– श्री. दिनेश शिंदे, सनातन आश्रम (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), रामनाथी, गोवा. (३०.८.२०२०) (क्रमश:)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/527070.html