परात्पर गुरु डॉ. आठवले प्रतिदिन आई-वडिलांच्या (प.पू. बाळाजी (दादा) आठवले आणि पू. (सौ.) नलिनी आठवले यांच्या) करत असलेल्या सेवा !

स्वतः भगवंतस्वरूप असूनही आई-वडिलांची कृतज्ञताभावाने, परिपूर्णतेने आणि सहजभावाने सेवा करून समाजापुढे उत्तम सेवेचा आदर्श ठेवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘वर्ष १९९० पासून सनातन संस्थेचे कार्य मुंबई येथे चालू झाले. तेव्हापासून आम्ही काही साधक प.पू. डॉक्टरांच्या घरी सेवेनिमित्त जाऊ-येऊ लागलो. त्या वेळी प.पू. डॉक्टरांचे आई-वडील त्यांच्याकडे रहात होते. आम्ही सर्व साधक त्यांना प.पू. डॉक्टर संबोधायचे त्याप्रमाणे ‘ताई’ आणि ‘दादा’ असे संबोधत होतो. ते दोघेही आम्हा सर्व साधकांवर भरभरून प्रेम करायचे. ते आम्हाला स्वत:च्या कुटुंबाचाच एक भाग समजायचे. सध्या समाजात आई-वडील वृद्ध झाले की, मुलांना नकोसे होतात. काहीजण ‘त्यांची अडगळ नको’; म्हणून वेगळे घर घेऊन रहातात, तर काही जण त्यांना वृद्धाश्रमात सोडून देतात. ज्या आई-वडिलांनी आपल्यावर चांगले संस्कार करून समाजात नावलौकिक मिळवून दिला, त्यांच्याप्रती किती हा कृतघ्नपणा ! ‘अशा समाजाला योग्य दृष्टीकोन मिळावा’, यासाठी प्रत्यक्ष भगवंताने (परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी) त्याच्या आई-वडिलांची सेवा कशी केली ?’, हे येथे दिलेल्या उदाहरणांवरून लक्षात येईल आणि ‘देवाची प्रत्येक कृती किती परिपूर्ण असते ?’, हेही शिकता येईल.

‘सेवा करतांना प्रत्येक कृतीला भक्तीमार्गानुसार भावाची आणि कर्मयोगानुसार परिपूर्णतेची जोड देऊन आध्यात्मिक स्तरावर सेवा कशी करायची ?’, हे प.पू. डॉ. आठवले यांनी केलेल्या त्यांच्या आई-वडिलांच्या सेवेतून शिकायला मिळते. ७.११.२०२१ या दिवशी आपण मुंबई येथील सेवाकेंद्रात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेत राहून सेवा करणारे ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच ेश्री. दिनेश शिंदे यांनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या अनुपस्थितीत आई-वडिलांची सेवा व्यवस्थित होण्यासाठी साधकांची करून घेतलेली सिद्धता’ याविषयी सूत्रे पाहिली. आज आपण त्यापुढील भाग पाहूया.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वडील पू. बाळाजी आठवले आणि आई पू. (सौ.) नलिनी आठवले

सध्याचे युग ‘वापरा आणि फेकून द्या’ (Use & Throw) या तत्त्वावर चालणार्‍यांचे आहे. ‘मुलांना पाळणाघरात आणि आई-वडिलांना वृद्धाश्रमात’ ठेवणारी पाश्चात्त्य संस्कृतीचा पगडा असलेली पिढी आता आई-वडिलांकडे ‘उपयोगिते’च्या दृष्टीने पाहू लागली आहे. ‘वृद्ध आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणे’, ही संस्कृती बनलेल्या समाजाकडून आई-वडिलांबद्दल आदर आणि मानसन्मान यांची अपेक्षा तर सोडाच; परंतु मुलांनी त्यांच्या मालमत्तेवर डोळा ठेवून त्यांचे जगणेही असह्य केलेले असल्याचे आपण पहातो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रमाणे संत-सेवा समजून आई-वडिलांची सेवा करणारी संतती तर फारच दुर्मिळ ! खालील सूत्रांमधून ‘वृद्धांची सेवा करतांना कसा भाव ठेवायला हवा ? कोणत्या गोष्टींची दक्षता घ्यायला हवी?’ प्रेमपूर्वक आणि परिपूर्ण सेवा कशी करावी ?’, हे समष्टीला शिकायला मिळणार आहे. साधकांनी संत वा वयोवृद्ध यांची सेवा अशीच सेवाभावाने केल्यास त्यांची आध्यात्मिक उन्नती जलद होणार, हे निश्चित !

(भाग ४ था)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/525095.html


श्री. दिनेश शिंदे

१०. अध्यात्मप्रसाराच्या दौर्‍यावर जातांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आई-वडिलांच्या सेवेची केलेली परिपूर्ण सिद्धता !

१० अ. अध्यात्मप्रसारासाठी दौर्‍यावर गेल्यावर ‘आई-वडिलांना आरोग्याविषयी अडचणी येऊ नयेत’, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना प्रथमोपचार शिकवणे : वयोमानानुसार पू. (सौ.) ताईंना अन्य दुखण्यांसमवेतच दम्याचाही त्रास होता. त्याची तीव्रता मधे-मधे वाढत असे. अशा वेळेस ‘त्यांच्यावर कोणते वैद्यकीय उपचार करायचे ?’, हे प.पू. डॉक्टरांनी साधकांना प्रत्यक्ष कृतीतून शिकवले. ‘दमा लागल्यावर प्रथम ‘इन्हेलर स्प्रे’ मुखातून द्यायचा. त्याने काही पालट झाला नाही, तर १० मिनिटांनी गोळी द्यायची. गोळीनेही पालट झाला नाही, तर प्राणवायू (ऑक्सिजन) द्यायचा. प्राणवायू देतांना त्याचे प्रमाण एकदम न वाढवता हळूहळू कसे वाढवायचे आणि त्याचे प्रमाण किती ठेवायचे ?’, हे सर्व त्यांनी साधकांना शिकवले. ‘वेळ पडल्यास पू. ताईंना ‘इंजेक्शन’ कसे द्यायचे ? ‘इंजेक्शन’ देतांना त्यांचा हात कसा धरायचा ? नस (रक्तवाहिनी) कुठे असते ? त्यात ‘इंजेक्शन’ची सुई हळूवार कशी टोचायची ? मग औषध आत कसे ढकलायचे ?’, अशा बारीकसारीक सर्व गोष्टी प.पू. डॉक्टरांनी काहीही वैद्यकीय ज्ञान नसलेल्या आम्हा साधकांना शिकवल्या होत्या.

१० आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रसारदौर्‍यावर जाण्यापूर्वी प.पू. दादा आणि पू. (सौ.) ताई यांच्या औषधांचा तपशील लिहून ठेवणे, त्यांची प्रकृती किंवा औषधे यांसंदर्भात साधकांना अडचण आल्यास स्वतःच्या नियोजित वास्तव्याचा संपर्क क्रमांक लिहून ठेवणे : ‘पू. (सौ.) ताई आणि प.पू. दादा यांना लागणारी औषधे शोधण्यासाठी साधकांना काही अडचण येऊ नये’, या दृष्टीने दौर्‍यावर जाण्याआधी प.पू. डॉक्टर वैद्यकीय उपचारासंदर्भातील सर्व औषधांची सिद्धता स्वतःच करून ठेवायचे. ‘पू. (सौ.) ताई आणि प.पू. दादांना सकाळी, दुपारी आणि रात्री कोणत्या गोळ्या द्यायच्या ?’ याची प्रत्येकी वेगवेगळी डबी करून त्यावर ते तसे लिहून ठेवायचे. तसेच ‘साठ्यामधे किती दिवसांचे औषध शिल्लक आहे ? किती दिवसांनी परत औषध विकत आणावे लागणार ?’ याचा दिनांकही ते लिहून ठेवायचे. हे सर्व ते कागदावर बारीकसारीक तपशीलासह लिहून ठेवायचे. एवढेच नाही, तर प.पू. डॉक्टर दौर्‍यावर असतांना आई-वडिलांच्या प्रकृतीविषयी साधकांना काही अडचण आल्यास ‘त्यांना संपर्क करता यावा’, यासाठी त्या काळी भ्रमणभाष नसल्याने प्रत्येक दिवशी ते कोणत्या गावात असतील, त्या गावाचे नाव आणि तेथील साधकांचा दूरभाष क्रमांक कागदावर लिहून तो कागद आई-वडिलांच्या औषधांच्या पेटीत ठेवायचे. त्यामुळे काही अडचण आली, तरी साधक त्यांना संपर्क करून विचारून घेऊ शकत.

१० इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रसारदौर्‍याच्या ३ – ४ दिवस आधीपासूनच प.पू. दादा आणि पू. (सौ.) ताई यांच्या वैद्यकीय सेवेच्या दृष्टीने सिद्धता करणे आणि त्यांना प्रसार दौर्‍याविषयी सर्व सांगून जातांना त्यांचे आशीर्वाद घेणे : प.पू. डॉक्टर प्रसारदौर्‍यावर निघण्याच्या ३ – ४ दिवस आधीपासूनच पूर्वसिद्धता चालू करायचे. त्याची ते पू. (सौ.) ताई आणि प.पू. दादांना सर्व कल्पना द्यायचे. ‘ते कुठल्या दिवशी कुठे असणार आणि त्या दिवशी तेथे कुठला कार्यक्रम असणार ?’, याविषयी ते त्या दोघांना सांगायचे. पू. (सौ.) ताई आणि प.पू. दादाही त्यांना मधे-मधे ‘हे घेतले का ? ते घेतले का ?’ अशी आठवण करून द्यायचे. त्या वेळी आम्हाला त्या दोघांचा प.पू. डॉक्टरांप्रतीचा वात्सल्यभाव अनुभवता यायचा. प्रवासाला पहाटे लवकर निघायचे असल्यास प.पू. डॉक्टर त्यांना रात्रीच नमस्कार करायचे आणि ‘मी पहाटे लवकर निघणार आहे. तुम्हाला पहाटे लवकर उठायला नको; म्हणून आताच नमस्कार करतो’, असे सांगायचे. तेही त्यांना प्रेमाने आशीर्वाद द्यायचे. कधी ते पहाटे उठले असतील, तर ते खोलीच्या आगाशीत उभे राहून प.पू. डॉक्टर गाडीत बसून जाईपर्यंत हात हालवून त्यांना निरोप द्यायचे आणि प.पू. डॉक्टरही ते दिसेनासे होईपर्यत त्यांना हात हालवून प्रतिसाद द्यायचे.

११. दौर्‍यावर असतांना पू. (सौ.) ताई आणि प.पू. दादा यांच्याशी बोलून त्यांची विचारपूस करणे

प.पू. डॉक्टरांचा दौरा १५ ते २० दिवसांचा असल्यास ते प्रत्येक आठवड्याला पू. (सौ.) ताई आणि प.पू. दादांना दूरभाष करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करायचे आणि ‘दौर्‍यात कुठे कुठे प्रवचने झाली ?’, याविषयी त्यांना सांगायचे. पू. (सौ.) ताईही ‘इकडे काय-काय झाले ?’, हे त्यांना सांगायच्या. असे त्यांचे १५ ते २० मिनिटे संभाषण व्हायचे.

१२. दौर्‍याहून परत आल्यावर पू. (सौ.) ताई आणि प.पू. दादा यांना खोलीत जाऊन भेटणे

प.पू. डॉक्टर दौर्‍याहून परत आल्यावर पू. (सौ.) ताई आणि प.पू. दादांना भेटायला त्यांच्या खोलीत जायचे आणि ‘मी आलो आहे’, असे सांगायचे; तेही प.पू. डॉक्टरांची वाट पहात असायचे. कधी कधी ते गमतीने आम्हाला म्हणायचे, ‘‘आज डॉक्टर येणार आहेत, सर्व नीट आवरून ठेवा हो !’’

– श्री दिनेश शिंदे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.८.२०२०)

(क्रमश:)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/529103.html