परात्पर गुरु डॉ. आठवले प्रतिदिन आई-वडिलांच्या (प.पू. बाळाजी (दादा) आठवले आणि पू. (सौ.) नलिनी आठवले यांच्या) करत असलेल्या सेवा !

स्वतः भगवंतस्वरूप असूनही आई-वडिलांची कृतज्ञताभावाने, परिपूर्णतेने आणि सहजभावाने सेवा करून समाजापुढे उत्तम सेवेचा आदर्श ठेवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘वर्ष १९९० पासून सनातन संस्थेचे कार्य मुंबई येथे चालू झाले. तेव्हापासून आम्ही काही साधक प.पू. डॉक्टरांच्या घरी सेवेनिमित्त जाऊ-येऊ लागलो. त्या वेळी प.पू. डॉक्टरांचे आई-वडील त्यांच्याकडे रहात होते. आम्ही सर्व साधक त्यांना प.पू. डॉक्टर संबोधायचे त्याप्रमाणे ‘ताई’ आणि ‘दादा’ असे संबोधत होतो. ते दोघेही आम्हा सर्व साधकांवर भरभरून प्रेम करायचे. ते आम्हाला स्वत:च्या कुटुंबाचाच एक भाग समजायचे. सध्या समाजात आई-वडील वृद्ध झाले की, मुलांना नकोसे होतात. काहीजण ‘त्यांची अडगळ नको’; म्हणून वेगळे घर घेऊन रहातात, तर काही जण त्यांना वृद्धाश्रमात सोडून देतात. ज्या आई-वडिलांनी आपल्यावर चांगले संस्कार करून समाजात नावलौकिक मिळवून दिला, त्यांच्याप्रती किती हा कृतघ्नपणा ! ‘अशा समाजाला योग्य दृष्टीकोन मिळावा’, यासाठी प्रत्यक्ष भगवंताने (परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी) त्याच्या आई-वडिलांची सेवा कशी केली ?’, हे येथे दिलेल्या उदाहरणांवरून लक्षात येईल आणि ‘देवाची प्रत्येक कृती किती परिपूर्ण असते ?’, हेही शिकता येईल.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वडील पू. बाळाजी आठवले आणि आई पू. (सौ.) नलिनी आठवले

‘सेवा करतांना प्रत्येक कृतीला भक्तीमार्गानुसार भावाची आणि कर्मयोगानुसार परिपूर्णतेची जोड देऊन आध्यात्मिक स्तरावर सेवा कशी करायची ?’ हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या त्यांच्या आई-वडिलांच्या सेवेतून शिकायला मिळते. यापूर्वी (१२.९.२०२१ या दिवशी) आपण ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या आई-वडिलांची सेवा कशी केली ?’, याविषयी डॉ. विलास आठवले (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कनिष्ठ बंधू) यांनी सांगितलेली सूत्रे पाहिली. आता मुंबई येथील सेवाकेंद्रात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेत राहून सेवा करणारे ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. दिनेश शिंदे यांनी ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी आई-वडिलांची सेवा किती परिपूर्ण केली !’ याविषयी अनुभवलेली सूत्रे पाहूया.

सध्याचे युग ‘वापरा आणि फेकून द्या’ (Use & Throw) या तत्त्वावर चालणार्‍यांचे आहे. ‘मुलांना पाळणाघरात आणि आई-वडिलांना वृद्धाश्रमात’ ठेवणारी पाश्चात्त्य संस्कृतीचा पगडा असलेली पिढी आता आई-वडिलांकडे ‘उपयोगिते’च्या दृष्टीने पाहू लागली आहे. ‘वृद्ध आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणे’, ही संस्कृती बनलेल्या समाजाकडून आई-वडिलांबद्दल आदर आणि मानसन्मान यांची अपेक्षा तर सोडाच; परंतु मुलांनी त्यांच्या मालमत्तेवर डोळा ठेवून त्यांचे जगणेही असह्य केलेले असल्याचे आपण पहातो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रमाणे संत-सेवा समजून आई-वडिलांची सेवा करणारी संतती तर फारच दुर्मिळ ! खालील सूत्रांमधून ‘वृद्धांची सेवा करतांना कसा भाव ठेवायला हवा ? कोणत्या गोष्टींची दक्षता घ्यायला हवी?’ प्रेमपूर्वक आणि परिपूर्ण सेवा कशी करावी ?’, हे समष्टीला शिकायला मिळणार आहे. साधकांनी संत वा वयोवृद्ध यांची सेवा अशीच सेवाभावाने केल्यास त्यांची आध्यात्मिक उन्नती जलद होणार, हे निश्चित!
(भाग २ रा)

दि. १२/०९/२०२१ रोजी प्रसिद्ध झालेला भाग १. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/510324.html

श्री. दिनेश शिंदे

१. प.पू. डॉक्टरांनी प्रतिदिन सकाळी लवकर उठून आई-वडिलांच्या अंघोळीची सिद्धता करणे

पू. (सौ.) ताई आणि प.पू. दादा दोघेही पहाटे ५.३० वाजता उठायचे. प्रथम प.पू. दादा उठायचे आणि त्यानंतर पू. (सौ.) ताई उठायच्या. प.पू. दादांचे वय झाल्यामुळे त्यांना प्रत्येक कृती करण्यासाठी कुणाचे तरी साहाय्य घ्यावे लागायचे. प.पू. दादा उठल्यावर प.पू. डॉक्टर त्यांच्यासाठी चहा करून द्यायचे. प.पू. दादा चहा घेईपर्यत प.पू. डॉक्टर शौचालयाचे दार उघडे करून ठेवायचे आणि आतील पाण्याची बालदी रिकामी असल्यास ती भरून ठेवायचे. त्यानंतर प.पू. डॉक्टर प.पू. दादांच्या अंघोळीची सिद्धता करायचे. ‘प.पू. दादांना अंघोळ करतांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये’, यासाठी अंघोळीची सिद्धता करतांनाही ते किती परिपूर्ण आणि बारीक-सारीक गोष्टींचा विचार करून करायचे, हे त्यांच्या पुढील कृतींवरून आपल्या लक्षात येईल.

अ. ‘स्नानगृहातील लादीवर पाणी/साबणाचे पाणी सांडलेले नाही ना ?’ याची ते निश्चिती करायचे. ‘स्नानगृहात पाय घसरून आई-वडील पडू नयेत’, यासाठी ते प्रतिदिन अशी दक्षता घ्यायचे.

आ. ‘अंघोळ करतांना त्यांना काही अडचण आली किंवा काही साहाय्य हवे असल्यास, ते करता यावे’, यासाठी प.पू. डॉक्टर त्यांना स्नानगृहाच्या दाराला आतून कडी न लावता ते थोडे उघडे ठेवायला सांगायचे.

इ. ‘भूमीवर बसून अंघोळ करायला आणि नंतर उभे रहायला अडचण येऊ शकते’, हे लक्षात घेऊन ‘अंघोळ झाल्यावर त्यांना सहजतेने उठता यावे’, यासाठी प.पू. डॉक्टरांनी त्यांना स्नानगृहात बसण्यासाठी छोटे ‘स्टूल’ आणून ठेवले होते.

ई. ऋतुमानाप्रमाणे त्यांना ‘अंघोळीसाठी पाणी किती गरम हवे किंवा कोमट हवे ?’, हे विचारून घेऊन त्याप्रमाणे प.पू. डॉक्टर त्यांच्यासाठी अंघोळीचे पाणी काढून ठेवायचे.

उ. अंघोळ करतांना ‘त्यांना बसल्या जागेवरून सहज अंगावर पाणी घेता येईल’, अशा पद्धतीने बालदी त्यांच्याजवळ ठेवायचे.

ऊ. बालदीतील पाणी घेतांना मोठा मग ठेवल्यास ‘तो उचलतांना प.पू. दादांना त्रास होईल’, असा विचार करून ‘त्यांना पाण्याने भरलेला मग सहज उचलता यावा आणि अंगावर पाणी घेतांना त्यांचा हात दुखणार नाही’, यासाठी प.पू. डॉक्टरांनी प्रसाधनगृहात लहान मग ठेवला होता आणि अन्य साधकांसाठी मोठा मग ठेवला होता.

ए. प. पू. दादांना अंगाला लावायचा साबण बसल्या जागेवरून सहज घेता यावा, यासाठी जवळच्या भिंतीवर तेवढ्याच उंचीवर सोपकेस लावून ठेवली होती.

ऐ. प.पू. डॉक्टर प.पू. दादांचा अंग पुसण्याचा पंचा भिंतीवरच्या खुंटीला अडकवून ठेवत. तेव्हा ते ‘त्याचे दुसरे टोक बसल्या जागेवरूनच प.पू. दादांच्या हाताला सहज येईल’, अशा पद्धतीने अडकवून ठेवायचे. त्यामुळे प.पू. दादांना तो सहज खेचून घेता यायचा.

ओ. पू. (सौ.) ताई आणि प.पू. दादा यांची अंघोळ झाल्यानंतर प.पू. डॉक्टर त्यांचे कपडे धुण्यासाठी बालदीमधे भिजत घालून ठेवायचे.

औ. पू. (सौ.) ताई किंवा प.पू. दादा अंघोळ करण्यासाठी गेल्यावर ते अंघोळ करून येईपर्यंतच्या मधल्या वेळेत प.पू. डॉक्टर त्यांच्या पलंगावरील चादर नीट करायचे आणि पलंगावरील अन्य साहित्य नीट आवरून ठेवायचे. त्याच वेळी सकाळी ७ वाजता सेवेला येणार्‍या साधकांसाठी ग्रंथाची सेवा काढून ठेवायचे. साधकांसाठी चहाचे पातेले, शीतकपाटामधे ठेवलेले दूध आणि खाऊ काढून ठेवायचे. हे सर्व झाल्यानंतर ते स्वतःचे आवरण्यासाठी जायचे.

अशा प्रकारे प.पू. डॉक्टरांचा प्रतिदिन सकाळचा बहुतेक सर्व वेळ आई-वडिलांची सेवा करण्यात आणि अन्य साधकांसाठी सेवा काढून ठेवण्यात जायचा. ते असे अनेक वर्षे न कंटाळता आणि त्यात एक दिवसही खंड न पडता अव्याहतपणे करत होते.

२. आई-वडिलांना चहा देतांना ‘त्यांच्या अंगावर चहा सांडू नये’, याची दक्षता घेणे

प.पू. डॉक्टर प.पू. दादा किंवा पू. (सौ.) ताई यांना चहा देतांना ‘बशीतील कपाचा कान त्यांना सहज धरता येईल’, अशा दिशेने चहाचा कप ठेवायचे. वयोमानानुसार त्यांचे हात थरथरायचे. अशा वेळी ‘कपातील चहा त्यांच्या अंगावर सांडू नये’, यासाठी कप पूर्ण न भरता थोडा अल्प भरायचे आणि त्यांना ‘अजून चहा हवा असल्यास सांगा’, असे सांगायचे.

३. प्रतिदिन सकाळी आई-वडिलांना वाचण्यासाठी वर्तमानपत्र देऊन ते त्या संदर्भात सांगत असलेल्या पालटांचा विचार करणे

प.पू. दादा आणि पू. (सौ.) ताई यांची अंघोळ झाल्यानंतर प.पू. डॉक्टर त्यांना वाचण्यासाठी वर्तमानपत्र आणून द्यायचे. सनातन संस्थेचे दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ चालू झाल्यावर पू. ताई तेही वाचायच्या आणि त्यामधे काही पालट हवा असल्यास प.पू. डॉक्टरांना तसे सांगायच्या आणि प.पू. डॉक्टरही त्यांनी सांगितल्याप्रमाणे करायचे.

४. आईला शौचाला होत नसतांना प.पू. डॉक्टरांनी स्वतःच्या हाताने तिचे शौच बाहेर काढणे आणि तेव्हा त्यांची ‘किळस वाटणे किंवा शौचाचा वास येतो’, अशी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया नसणे, तर केवळ ‘आईला त्रास होऊ नये’, एवढाच विचार असणे

काही वेळेला पू. (सौ.) ताईंना ३ – ४ दिवस शौचाला होत नसे. त्या वेळी त्यांना पुष्कळ त्रास व्हायचा; म्हणून प.पू. डॉक्टर त्यांना ‘एनिमा’ द्यायचे. मग त्यांना शौचाला व्हायचे. बर्‍याच वेळेला शौच घट्ट  झाले असल्यामुळे ते बाहेर पडत नसे. अशा वेळी प.पू. डॉक्टर स्वतः ते हाताने बाहेर काढायचे. त्या वेळी त्यांच्या तोंडवळ्यावर ‘किळस वाटणे किंवा शौचाचा वास येत आहे’, अशी कोणतीही प्रतिक्रिया नसायची. तेव्हा ते केवळ ‘आईला त्रास होऊ नये’, एवढाच विचार करायचे.

५. पू. (सौ.) ताईंना खाण्याविषयी सूचित करूनही त्यांनी न ऐकल्यास साक्षीभावाने पहाणे आणि त्यांना त्रास झाल्यास पुन्हा तेवढ्याच प्रेमाने औषध देणे

वयोमानामुळे पू. (सौ.) ताईंच्या प्रकृतीमध्ये चढ-उतार व्हायचे. थोडे अधिक खाल्यावर कधी-कधी त्यांना बराच त्रास व्हायचा. अशा वेळेस प.पू. डॉक्टर त्यांना ‘‘अधिक खाऊ नको, त्रास होईल’’, असे सांगायचे; परंतु तरीही त्यांनी खाल्ले, तर त्या वेळी प.पू. डॉक्टर त्यांना सांगायचे ‘‘खा; पण त्याचा त्रास तुलाच भोगावा लागेल.’’ नंतर त्यांना होणार्‍या त्रासाकडे ते साक्षीभावाने पहायचे. कधी त्यांना अधिक त्रास व्हायला लागल्यास प.पू. डॉक्टर त्याच प्रेमाने त्यांना औषधही द्यायचे. ‘आपण सांगूनही पू. (सौ.) ताईंनी ऐकले नाही’, हे ते विसरूनही जायचे. त्यातून एक प्रकारे ते ‘सतत वर्तमानकाळात कसे जगायचे ?’, हे साधकांना शिकवायचे.

६. अनेक सेवांमध्ये व्यस्त असूनही आई-वडिलांची सेवाही तितक्याच दायित्वाने पार पाडणे

६ अ. प.पू. डॉक्टर अध्यात्मप्रसाराच्या अनेक सेवा आणि चिकित्सालय सेवा यांत अविरत व्यस्त असूनही आई-वडिलांच्या सेवेचे अवधान सतत असणे :

प.पू. डॉक्टर सेवाकेंद्रात सेवेसाठी येणार्‍या साधकांच्या सेवेचे नियोजन करणे, त्यांच्याकडून सेवा करवून घेणे, स्वतः ग्रंथ लिखाणाची सेवा करणे, प्रसारातील साधकांशी समन्वय साधणे, त्यांच्या अडचणी सोडवणे इत्यादी सेवांमधे सतत व्यस्त असायचे, तरीही ते न विसरता बरोबर सकाळी ११ वाजता आई-वडिलांना जेवण द्यायचे. त्यांचे चिकित्सालय दुपारी ३ ते ७ या वेळेत चालू असायचे. रुग्ण पडताळत असतांनाही ते बरोबर ४ वाजता आई-वडिलांना चहा देण्यासाठी जायचे. त्यांना चहा देऊन आल्यावर ते पुढील रुग्ण तपासणी चालू करायचे. काही वेळा रुग्णांची संख्या अधिक असल्यास चिकित्सालयाचे काम संपायला रात्रीचे ८ वाजायचे. अशा वेळीही ते मधेच जाऊन आई-वडिलांना जेवण देऊन यायचे.

६ आ. सेवांच्या व्यस्ततेमुळे ‘आई-वडिलांची सेवा विसरली किंवा झाली नाही’, असा एकही दिवस नसणे : सेवांच्या एवढ्या व्यस्ततेतही प.पू. डॉक्टर ‘आई-वडिलांची सेवा करायला विसरले’, असे एक दिवसही झाले नाही. ‘त्यांना वेळेवर जेवण द्यायला विसरू नये’, यासाठी ‘कागदावर लिहून ठेवले किंवा घड्याळात गजर लावून ठेवला’, असेही त्यांनी कधी केले नाही. चिकित्सालय चालू असतांना प.पू. डॉक्टरांना रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक सांगत असलेली सर्व सूत्रे लक्षपूर्वक ऐकावी लागायची, तरीही त्यांचे आई-वडिलांच्या सेवांच्या वेळांचे भान कधीच सुटले नाही.’

– श्री. दिनेश शिंदे, सनातन आश्रम (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), रामनाथी, गोवा. (३०.८.२०२०)

(क्रमश:)  

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक