दीपावलीतील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रामनाथी आश्रमात सौ. शुभांगी यांच्या हातातून हळदीची डबी निसटून खाली पडणे आणि हळदीचा आकार हातात शस्त्र घेतलेल्या देवीप्रमाणे दिसणे
१. दीपावलीतील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कपाळावर हळद-कुंकू लावत असतांना देवीला आतून प्रार्थना होणे आणि त्या वेळी श्री भवानीदेवीचे दर्शन होणे
‘७.११.२०१८ या दिवशी दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचा दिवस होता. मी सकाळी अंघोळ करून कपाळावर हळद-कुंकू लावत असतांना माझ्याकडून देवीला आतून प्रार्थना झाली, ‘मी तुझाच अंश आहे. आतापर्यंत तूच मला सांभाळले आहेस. माझे हे शरीर, मन आणि बुद्धी श्री गुरूंच्या अवतारी कार्यासाठीच आहे अन् त्यासाठीच ते पूर्णपणे समर्पित होऊ दे. आई, माझ्यातील तुझे अस्तित्व जागृत राहू दे आणि तुझा अन् परात्पर गुरुमाऊलीचा आशीर्वाद माझ्यावर अखंड असू दे. ‘तू माझ्या समवेत सतत आहेस’, याची मला जाणीव राहू दे.’
ही प्रार्थना करत कुंकू लावत असतांना मला श्री भवानीदेवीचे दर्शन झाले.
२. आवरून झाल्यावर हळद-कुंकू कपाटात ठेवतांना हातातून हळदीची डबी निसटून खाली पडणे, हळद भूमीवर सांडणे, तेव्हा हे ‘शुभ कि अशुभ ?’, असा प्रश्न पडणे; पण सांडलेल्या हळदीकडे पाहून चांगले वाटणे
माझे आवरून झाल्यावर मी नेहमीप्रमाणे हळद-कुंकवाची डबी कपाटात ठेवतांना अकस्मात माझ्या हातातून हळदीची डबी निसटून खाली पडली आणि हळद लादीवर सांडली; पण डबी सरळच होती. त्या वेळी ‘लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अशी हळद सांडणे शुभ आहे कि अशुभ ?’, असा प्रश्न मला पडला; पण सांडलेल्या हळदीकडे पाहून मला चांगले वाटले.
३. त्या दिवशी शूलिनी दुर्गादेवीचा यज्ञ असणे आणि यज्ञाविषयी माहिती सांगतांना श्री. दामोदर वझे यांनी ‘शूलिनी दुर्गादेवीने हाती शस्त्र घेऊन महिषासुराचा वध केला’, असे सांगणे
मी हळदीचे छायाचित्र काढून कु. प्रियांका लोटलीकर हिला पाठवले. त्या वेळी तिने मला त्याविषयी सद्गुरु मुकुल गाडगीळ (सद्गुरु गाडगीळकाका) किंवा श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना विचारायला सांगितले. मी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ काकूंना भ्रमणभाषमधून सांडलेल्या हळदीचे छायाचित्र पाठवले आणि आवरून यज्ञासाठी सभागृहात गेले. त्या वेळी सनातन पुरोहित पाठशाळेचे संचालक श्री. दामोदर वझे यज्ञाविषयी माहिती सांगत होते. ते म्हणाले, ‘‘आजचा यज्ञ हा शूलिनी दुर्गादेवीचा आहे. शूलिनी दुर्गादेवीने हाती शस्त्र घेऊन महिषासुराचा वध केला.’’
४. सांडलेल्या हळदीचा आकार दुर्गादेवी महिषासुराचा वध करत असल्याप्रमाणे जाणवणे अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी त्याला पुष्टी देणे
ही माहिती ऐकतांना मला हळदीचे छायाचित्र आठवले. मी ते छायाचित्र पहातांना माझ्या लक्षात आले, ‘हळदीचा आकार दुर्गादेवी महिषासुराचा वध करत असल्याप्रमाणे आहे.’ तेव्हा ‘माझ्या मनात आलेले हे विचार योग्य आहेत कि नाही ?’, हे विचारण्यासाठी मी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकूंना भ्रमणभाषवरून लघुसंदेश पाठवला. त्यावर श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ काकूंचा उत्तरादाखल लघुसंदेश आला, ‘योग्य आहे. शुभांगी, ‘दुर्गादेवीने हातात शस्त्र घेतले आहे’, असे वाटते. हळदीच्या चित्रात तसे दिसत आहे.’
– सौ. शुभांगी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.११.२०१८)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |