नृत्यसाधनेद्वारे स्वतःमध्ये भक्तीभाव रुजवणारी, प्रगल्भ आध्यात्मिक दृष्टीकोन असलेली रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील साधिका कु. अपाला औंधकर (वय १४ वर्षे) !

फोंडा (गोवा) येथील सौ. रेखा माणगावकर, मूळच्या नंदुरबार येथील सौ. निवेदिता जोशी आणि सनातनच्या रामनाथी आश्रमातील कु. अपाला औंधकर यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

‘पूर्वीच्या युगांत ध्रुवबाळ, भक्त प्रल्हाद इत्यादींनी लहान वयातच श्री विष्णूची भक्ती करून त्याला प्रसन्न करून घेतले. त्याप्रमाणे सनातन संस्थेची दैवी बालके साधना करून संतपदाकडे वाटचाल करत आहेत. कु. अपाला ही त्यांपैकीच एक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१.११.२०२१)

कु. अपाला औंधकर

रामनाथी (गोवा) – उच्च लोकांतून साधनेसाठी पृथ्वीवर जन्म घेतलेली दैवी बालके, हे सनातनला लाभलेले ईश्वरी वरदानच आहे ! जन्मतःच ईश्वराप्रती भक्तीभाव असणे, प्रगल्भ विचार, मायेची ओढ अल्प असणे, यांसह नेतृत्वगुण, समष्टीला मार्गदर्शन करण्याची क्षमता आदी गुणही आता काळानुसार उलगडत आहेत. उपजतच साधनेची तळमळ असलेल्या या बालसाधकांना आध्यात्मिक दिशा मिळाली की, ते ईश्वरप्राप्तीच्या दिशेने गतीने मार्गक्रमण करतात, हे रामनाथी आश्रमातील साधकांनी अनुभवले आहे.

१ नोव्हेंबर या दिवशी मूळची रत्नागिरी येथील आणि सध्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधना करणारी एक वैशिष्ट्यपूर्ण बालसाधिका, म्हणजे नृत्यकलेद्वारे साधना करणारी कु. अपाला औंधकर (वय १४ वर्षे) हिने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे आज एका अनौपचारिक सत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी घोषित केले आणि सर्व साधकजन आनंदले. या सत्संगाला कु. अपाला हिच्यासमवेत संगीत सेवा करणारे साधक, तिचे आजी-आजोबा (आईचे आई-वडील) सौ. सुजाता रेणके आणि श्री. अशोक रेणके, तसेच आश्रमातील काही दैवी बालक उपस्थित होते.

कु. अपाला हिची आई सौ. दीपा औंधकर, रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करणारी तिची मावशी सौ. अक्षता रेडकर आणि काका श्री. रूपेश रेडकर हे संगणकीय प्रणालीद्वारे या सत्संगाला जोडले होते.

कु. अपाला औंधकर (उजवीकडे) हिला भेटवस्तू देऊन सत्कार करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

ईश्वरप्राप्तीची तीव्र तळमळ, भाव, अल्प अहं आणि शिकण्याची वृत्ती यांमुळे कु. अपाला हिची आध्यात्मिक उन्नती जलद होत आहे ! – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

कु. अपाला आश्रमातील श्री भवानीदेवीचे दर्शन घेण्यासाठी यायची, तेव्हा तिच्या मुखावर ईश्वरभेटीची आर्तता जाणवायची. कधीच ‘ती अन्य विचारांत आहे’, असे जाणवायचे नाही. कु. अपाला हिने व्यक्त केलेल्या मनोगतातून लक्षात येते की, तिच्या बोलण्यात कुठेच अहं, तसेच कर्तेपणा जाणवत नाही. तिच्यात ईश्वरप्राप्तीची तीव्र तळमळ, भाव आणि शिकण्याची वृत्ती आहे. ती वस्तूंकडून, अन्य साधकांकडून, परात्पर गुरुदेवांकडून सतत शिकत असते. त्यावरूनच लक्षात येते की, तिची आध्यात्मिक प्रगती जलद गतीने चालू आहे.

कु. अपाला हिला आलेल्या काही अनुभूती, तसेच तिने लिहिलेली साधनाविषयक चिंतनात्मक सूत्रे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सत्संगात सांगितली. त्यातून तिच्या बोलण्यातील, तिच्या विचारांतील प्रगल्भता सर्वांनाच अनुभवता आली.

कु. अपाला हिने व्यक्त केलेले मनोगत !

परात्पर गुरुदेवांनीच माझा उद्धार केला आहे ! – कु. अपाला औंधकर

मी काहीच केले नाही. परात्पर गुरुदेवांची दृष्टी माझ्यावर पडली आणि त्यांनीच माझा उद्धार केला. त्यांची दृष्टी माझ्यावर पडल्यानेच माझे प्रारब्ध नष्ट होत आहे. प्रतिदिन श्रीगुरूंची दृष्टी मी अनुभवत असते.

(या वेळी कु. अपाला हिचा भाव पुष्कळ जागृत झाला आणि ती पुढे बोलू शकली नाही.)

कुटुंबियांनी सांगितलेली कु. अपालाची गुणवैशिष्ट्ये !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांनीच कु. अपाला हिला घडवले ! – सौ. दीपा औंधकर (कु. अपाला हिची आई)

सौ. दीपा औंधकर

अपालाला ६१ टक्के आध्यात्मिक पातळीपर्यंत आणण्यासाठी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांनीच सर्व केले. मी काहीच केले नाही. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई याच तिच्या खर्‍या (आध्यात्मिक) आई आहेत !

कु. अपालाला कधी रामनाथी आश्रमाविषयी विचारल्यावर ती म्हणायची, ‘‘आई, आश्रमातील निर्जीव वस्तूसुद्धा नामजप करतात गं ! आपण तर किती नामजप करायला हवा !’’ अपाला घरी असतांनाही तिचे सतत गुरुस्मरण चालू असते. तिच्याशी कधी साधनेविना अन्य विषयांवर बोलू लागले, तर ती म्हणते, ‘‘आई, हे मायेतील बोलू नको ना ! साधनेविषयीच बोलूया.’’

पाण्याविना मासा तडफडतो, तशी अपाला हिला आश्रमात जाण्याची ओढ असते ! – सौ. सुजाता रेणके (कु. अपाला हिची आजी)

सौ. सुजाता रेणके

१. दळणवळण बंदीच्या काळात शाळा बंद असतांना कु. अपाला तिच्या घरी रत्नागिरीला होती. त्या वेळी ‘गोव्याला रामनाथी आश्रमात कधी जायला मिळेल ?’, याचा तिला ध्यास लागला होता. त्यानंतर आईसमवेत गोव्याला आजोळी आल्यानंतरही ती आम्हाला हेच विचारत असे की, मला आश्रमात कधी जाता येणार ?

जसा पाण्याविना मासा तडफडतो, त्याप्रमाणे तिची गुरुगृही जाण्यासाठी तळमळ होती. एक दिवस तिचे आजोबा बाहेर चालले होते. त्या वेळी त्यांनी कु. अपालाला विचारले की, तुला बाजारातून काय खाऊ आणू ? त्यावर अपाला म्हणाली, ‘आश्रमात बोलावले आहे’, हाच निरोप घेऊन या !

२. तिच्यात होणारे पालट आम्ही पहातच होतो. त्यामुळे ‘तिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाली आहे’, असे आम्हाला जाणवत होते. आम्ही आजच्या दिवसाची वाटच पहात होतो.

आध्यात्मिक पातळीत न अडकता अन्य बालसाधिकांकडून शिकून गुरुदेवांना अपेक्षित अशी समष्टी सेवा करण्याची तळमळ असलेली कु. अपाला औंधकर !

‘एका मासापूर्वी माझी आणि कु. सायली देशपांडे (वय १२ वर्षे) अन् कु. अनास्तासिया वाले (वय १७ वर्षे) यांची आध्यात्मिक पातळी ५९ टक्के होती. एका आठवड्यापूर्वी कु. सायली देशपांडे हिने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. ३०.१०.२०२१ या दिवशी कु. अनास्तासिया वाले हिने ६१ टक्के व्यष्टी आध्यात्मिक पातळी गाठली; परंतु माझी आध्यात्मिक पातळी ५९ टक्केच आहे. (‘१.११.२०२१ या दिवशी कु. अपाला हिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले.’ – संकलक) आम्ही तिघी सहसाधिका आहोत. यावरून दोन साधकांनी मला विचारले, ‘‘त्या दोघींची प्रगती झाली आणि तुझी प्रगती झाली नाही. तुझ्या मनात तुलनेचे विचार येत नाहीत ना ? तुला जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होण्यास (६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठण्यास) एकच टक्का राहिला आहे.’’

त्या साधकांचे बोलणे ऐकल्यावर माझ्या मनात पुढील विचार आले, ‘जेव्हा आपली एखाद्या बालसाधकाशी तुलना होते, तेव्हा ‘तो बालसाधक आपला आहे’, असे न वाटता ‘तो वेगळा आहे’, असे आपल्याला वाटते. तो बालसाधकही माझाच आहे आणि आम्ही सर्व दैवी बालसाधक गुरुदेवांचेच अंश आहोत. एक ना एक दिवस गुरुदेव मलासुद्धा जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त करणारच आहेत. मला केवळ तळमळ वाढवायची आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत गुरुदेवांचे आज्ञापालन करायचे आहे.’

त्यानंतर मी त्या साधकांना उत्तर दिले, ‘‘मला आध्यात्मिक पातळीत अडकायचे नाही, तर शिकायचे आहे आणि गुरुदेवांनी दिलेली समष्टी सेवा त्यांना अपेक्षित अशी करायची आहे.’’

‘कु. सायली आणि कु. अनास्तासिया यांच्याकडून मला काय काय शिकता येईल ?’, असा विचार केल्याने मला लवकर ‘स्व’चा त्याग करता येऊन देवाला अपेक्षित असे बनता येणार आहे’, असे लक्षात येऊन माझ्याकडून गुरुदेवांप्रती कोटीशः कृतज्ञता व्यक्त झाली.’

– परात्पर गुरुदेवांची, कु. अपाला औंधकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३१.१०.२०२१)

चुकांवर सकारात्मक राहून मात करणे, हे आम्ही कु. अपालाकडून शिकलो ! – संगीत विशारद कु. तेजल पात्रीकर (६३ टक्के आध्यात्मिक पातळी), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

कु. तेजल पात्रीकर

१. ३ वर्षांपूर्वी कु. अपाला सुटीसाठी रत्नागिरी येथून आश्रमात आली होती, तेव्हा तिला साधनेची विशेष गोडी नव्हती. २ वर्षांपूर्वी एका संतांनी एका सत्संगात उपस्थित साधकांना विचारले, ‘‘तुम्हाला पुढे काय व्हायचे आहे ?’’ त्यावर अनेक जणांनी ‘आम्हाला संत व्हायचे आहे’, असे सांगितले. त्या वेळी कु. अपालाने मला ‘आधुनिक वैद्य किंवा अभियंता व्हायचे आहे’, असे सांगितले. त्या वेळी ते संत तिला म्हणाले, ‘‘ठीक आहे. तू घे शिक्षण !’’

नंतर ‘आपल्या उत्तराने आपण देवापासून दूर गेलो का ?’, या विचाराने तिला पुष्कळ रडू आले. तिने या प्रसंगाचे सकारात्मकतेने चिंतन केले. घरी राहूनही पुष्कळ भावप्रयोग आदी करून साधनेत सातत्य ठेवले. त्यानंतर वर्षभराने ती ज्या वेळी रामनाथी आश्रमात आली, त्या वेळी तिच्यात आमूलाग्र पालट झाल्याचे आम्हा सगळ्यांच्या लक्षात आले. संतांच्या बोलण्याचा सकारात्मक दृष्टीने विचार करून तिने साधनेची तळमळ वाढवली.

२. नृत्यविषयक सेवा केल्यानंतर प्रारंभी तिच्याकडून काही चुका व्हायच्या. मी तत्त्वनिष्ठ राहून तिला स्पष्टपणे चुका सांगायचे. ती कधीही चुकांमुळे निराश झाली नाही. चुका सांगितल्यानंतर तिला पुष्कळ खंत वाटायची; परंतु ‘ही सेवाच नको, मला जमणार नाही’, असे ती कधीच म्हणाली नाही. ती चुका सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यावर अधिक भर द्यायची. यातूनच तिची शिकण्याची वृत्ती आणि सकारात्मकता आम्हाला शिकायला मिळाली ! तिचे वय पहाता हे कठीण आहे, तरी गुरुकृपेमुळे तिला हे सहजतेने जमले !

आनंद अन् उत्साह घेऊनी आली दिवाळी ।
प्रज्वलित होती साधकांच्या आत्मज्योती ।
सर्वांच्या अंतरी ज्ञानदीप, श्रद्धादीप तेवती ।
येई आध्यात्मिक दीपावलीची अनुभूती ।।
चैतन्याच्या स्तरावर राहून सेवा करणार्‍या मूळच्या नंदुरबार येथील आणि सध्या सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात वास्तव्यास असलेल्या सौ. निवेदिता जोशी (वय ४९ वर्षे), तसेच  भावाच्या स्तरावर राहून साधनेचे प्रयत्न करणार्‍या फोंडा (गोवा) येथील सौ. रेखा माणगावकर (वय ६० वर्षे) यांनीही ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे १ नोव्हेंबर या दिवशी एका सत्संगाद्वारे घोषित करण्यात आले.

सौ. निवेदिता जोशी
सौ. रेखा माणगावकर

या सत्संगाचे सविस्तर वृत्त लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन

६१ टक्के आध्यात्मिक पातळी म्हणजे साधकातील देवत्व जागृत होण्यास प्रारंभ होणे ! – श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

‘वसुबारस’च्या दिवशी विष्णुलोकातील स्पंदने पृथ्वीवर कार्यरत होतात. वसुबारसच्या दिवशी गोमातेला विष्णुलोकातील वासवदत्ता गायीचे स्वरूप प्राप्त होते. तिचे एक प्रकारे बारसे होऊन तिला देवत्व प्राप्त होते. यासाठीच या दिवसाला ‘वसुबारस’ असे म्हणतात. आपल्या साधकांच्या संदर्भात पाहिले, तर गुरुदेवांच्या कृपेने साधक साधना करत अध्यात्मात पुढे पुढे वाटचाल करतो. गुरूंना अपेक्षित असे प्रयत्न करायला आरंभ केला की, हळूहळू त्याची प्रगती होत जाते. तो जीव ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठतो, म्हणजे तो जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होतो. याच आध्यात्मिक पातळीला साधकामधील देवत्व जागृत होण्याची प्रक्रिया आरंभ होते. कु. अपाला हिने तळमळीने केलेल्या प्रयत्नांमुळे तिच्यातील देवत्व जागृत होण्याला आरंभ झाला आहे. ‘दैवी बालिका, ६१ टक्के आध्यात्मिक पातळी’, हे गुरुदेवांनी केलेले आध्यात्मिक नामकरणच आहे ! आज ‘वसुबारस’ या दिवशी कु. अपाला हिला हे आध्यात्मिक नामकरण होण्याचे भाग्य लाभले आहे ! गुरुदेवांनी दिलेली ही आनंददायी भेटच आहे ! ६१ टक्के आध्यात्मिक पातळी होणे, हा त्या जिवाचा पुनर्जन्मच असतो.

साधकाची ईश्वरप्राप्तीची तळमळ वाढली की, त्याच्यात गुरूंच्या चैतन्याचा संचार होईल !

श्रीगुरूंची दृष्टी साधकावर पडली की, त्याचा उद्धार होतो. साधकातील देवत्व जागृत होते. साधकाची जन्मतःच जी आध्यात्मिक पातळी असते, ती वाढत जाते. श्रीगुरूंच्या माध्यमातून दैवी प्रवाह साधकाकडे प्रवाहित होऊन साधकाचा उद्धार होतो. गुरूंना स्थुलातून साधक भेटले नसले, तरी श्रीगुरूंची कृपादृष्टी त्यांच्या सर्व साधकांवर असते आणि परात्पर गुरुदेवच साधकांचा उद्धार करत आहेत. ईश्वरप्राप्तीसाठी आपला जन्म होणे, ही गुरूंची लीलाच आहे.

सर्व साधकांनी पुढे जाण्यासाठी तळमळीने प्रयत्न करावेत. साधकाची तळमळ वाढली की, त्याच्यात गुरूंच्या चैतन्याचा संचार होईल.

वैशिष्ट्यपूर्ण क्षणचित्र

सध्या आश्रमातील काही दैवी बालकांना सत्संगाद्वारे साधनेची दिशा देण्याची सेवा कु. अपाला अत्यंत चिकाटीने आणि प्रगल्भतेने करत आहे. तिच्या सत्संगातून दिशा घेणार्‍या बालसाधकांनी ‘त्यांच्या अपालाताईने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे’, हे आधीच जाणले होते, हे या सत्संगाचे वैशिष्ट्य ठरले !

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक