कोकण रेल्वेमार्गावरील प्रवासी वाहतूक पूर्ववत् करा अन्यथा ‘रेल्वे बंद’ आंदोलन करणार ! – राष्ट्रीय काँग्रेसची चेतावणी  

कुडाळ रेल्वेस्थानकाचे स्टेशन मास्तर यांना निवेदन देतांना राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी

कुडाळ – कोरोनाच्या कालावधीत कोकण रेल्वेमार्गावर काही विशेष गाड्या चालू करण्यात आल्या. या गाड्यांच्या तिकिटांचे दर नियमितच्या गाड्यांच्या तिकिटांपेक्षा अधिक आहे. आता कोरोनाचा संसर्ग उणावला असल्याने ‘विशेष रेल्वे’च्या नावाखाली चालू असलेली प्रवाशांची लूट थांबवून नियमितच्या गाड्या चालू कराव्यात अन्यथा ‘रेल्वे बंद’ आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी दिली. याविषयीचे कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांना द्यायचे निवेदन कुडाळ रेल्वेस्थानकाचे स्टेशन मास्तर यांना देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात चालू करण्यात आलेल्या विशेष गाड्यांच्या तिकिटावर ३० टक्के अधिकचा अधिभार लावण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिक, अपंग यांना देण्यात येत असलेली सवलत बंद करण्यात आली आहे. ‘तुतारी एक्सप्रेस’ आणि ‘नेत्रावती एक्सप्रेस’ या गाड्या सोडून इतर सर्व गाड्यांचे तात्काळ आरक्षण बंद आहे. कोरोनाचा संसर्ग अल्प झाला असून सर्व आस्थापने पूर्ण क्षमतेने चालू करण्यास शासनाने अनुमती दिली आहे. त्यामुळे येत्या मासात कोकण रेल्वेमार्गावरील वाहतूक पूर्वीप्रमाणे चालू करण्यात यावी अन्यथा कोकण रेल्वेमार्गावर ‘रेल्वे बंद’ आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभारी कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट यांनी दिली आहे.