मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या त्यागपत्राची मागणी करण्यासाठी विरोधकांनी माझ्या विधानांचा उपयोग करू नये !  सत्यपाल मलिक, माजी राज्यपाल, गोवा

डॉ. प्रमोद सावंत आणि सत्यपाल मलिक

पणजी, २६ ऑक्टोबर (वार्ता.) – दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या शासनावर गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. माझ्या विधानांचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या त्यागपत्राची मागणी करण्यासाठी विरोधकांनी उपयोग करू नये, असे सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले, ‘‘डॉ. प्रमोद सावंत यांच्या त्यागपत्राची मागणी करण्यासाठी विरोधी पक्ष माझ्या विधानांचा का उपयोग करत आहेत ? आता ते गोंधळ का घालत आहेत ? इतके दिवस गोव्यात काय होत आहे, हे त्यांना दिसत नाही का ? मी गोव्यातील लोकांवर प्रेम करतो. मुख्यमंत्र्यांविषयीही मला आस्था आहे. हानी होण्यासाठी कुणालाही लक्ष्य करण्याची माझी इच्छा नाही. मी सरकारला दोष देण्याचे कंत्राट घेतलेले नाही.’’

विरोधी पक्षांची माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी हातमिळवणी !  बाबू आजगावकर

बाबू आजगावकर

पणजी – ‘मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी विरोधी पक्षांनी माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी हातमिळवणी केली आहे’, असा आरोप उपमुख्यमंत्री बाबू आजगांवकर यांनी केला आहे. ते म्हणाले, ‘‘राज्यपालांनी विरोधी पक्षांना लाभ करून देण्याच्या दृष्टीने सरकारवर आरोप केले आहेत. या आरोपांकरिता गृह मंत्रालयाने राज्यपाल मलिक यांची चौकशी करावी. ते गोव्यात राज्यपाल असतांना त्यांनी का कारवाई केली नाही ? आता २ वर्षानंतर त्यांना जाग आली आहे का ? त्यांनी राज्यपाल म्हणून त्यागपत्र द्यावे आणि मग सरकारवर टीका करावी.’’

माजी राज्यपालांनी गोव्यातील भाजप सरकारवर केलेल्या आरोपांवरून राष्ट्रपतींनी सरकार विसर्जित करावे !  गोवा फॉरवर्ड पक्ष

पणजी – गोव्याची अपकीर्ती टाळण्यासाठी राष्ट्रपतींनी गोव्यातील मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे सरकार विसर्जित करून राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाने केली आहे. माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गोवा सरकारवर केलेल्या आरोपांचा संदर्भ देऊन गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख विजय सरदेसाई म्हणाले, ‘‘गोव्यात सत्तेवर रहाण्यासाठी विद्यमान भाजप सरकारने नैतिकता गमावली आहे.’’