नाशिक येथे ३ डिसेंबरपासून ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार ! – छगन भुजबळ, पालकमंत्री

नाशिक – लोकहितवादी मंडळ, नाशिक आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ‘कुसुमाग्रज नगरी’, भुजबळ नॉलेज सिटी, आडगाव येथे ३, ४ आणि ५ डिसेंबर या दिवशी होणार आहे. समस्त साहित्यिक, साहित्यप्रेमी, रसिक आणि नाशिककर यांनी मोठ्या संख्येने संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी २५ ऑक्टोबर या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

छगन भुजबळ पुढे म्हणाले की,

१. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर संपूर्ण देशात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाल्यामुळे नाशिकमध्ये होणारे संमेलन स्थगित करण्यात आले होते.

२. त्यानंतर कोरोनाच्या संदर्भातील शासनासहित सर्वांचे प्रयत्न निश्चितपणे कामी आले. मोठ्या प्रमाणावर या महामारीवर नियंत्रण मिळाले आहे, असे सध्याचे वातावरण आहे.

३. हळूहळू सर्वच व्यवहार चालू करण्यास शासनाने अनुमती दिली आहे. साहजिकच येथे होणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कधी घेता येईल ?, यावरही विचार चालू होता. त्यानंतर एकूण परिस्थितीचा विचार करून आणि संमेलनाध्यक्षांच्या सोयीचा विचार करता हे संमेलन वरील कालावधीत घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

४. संमेलनपूर्व २ डिसेंबर या दिवशी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम संमेलनस्थळी होणार आहेत, तसेच ४ डिसेंबर या दिवशी येथील स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम आणि ५ डिसेंबर या दिवशी संमेलनाचा समारोप झाल्यावरही सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.