दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये वेगवेगळ्या देशांतील माती आणि पाणी यांचे वैज्ञानिक परीक्षण केल्याचे वृत्त आले होते. ते वाचल्यावर ‘देवाने आपल्याला या देवभूमीत जन्म दिला. इतके पवित्र वातावरण दिले’, याची जाणीव होऊन भारतभूमीविषयी मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
१. भारतभूमीने आपल्या हृदयी प्रभु श्रीराम आणि भगवान श्रीकृष्णादी अवतारांचे चैतन्य जपून ठेवल्यामुळे आजही ती दैवी स्पंदने अनुभवता येणे
एके काळी संपूर्ण पृथ्वीवर केवळ हिंदु धर्मच होता; पण सद्यःस्थिती पहाता केवळ भारतामध्येच तो शिल्लक आहे. तिथेही त्याला निधर्मीपणाच्या नावाखाली दडपण्याचे प्रयत्न चालू आहेत; पण भारतभूमीने तिचे पावित्र्य टिकवून ठेवले आहे. प्रभु श्रीराम आणि भगवान श्रीकृष्णादी अवतारांनी, तसेच अनेक थोर संतांनी याच भूमीत जन्म घेतला. त्यांचे चरणकमल ज्या क्षणी या भूमीवर पडले, ते अमूल्य सुवर्णक्षण या भूमीने आपल्या हृदयी साठवून ते चैतन्य जपून ठेवले आहे. त्यामुळे भारतभूमीमध्ये ती दैवी स्पंदने आजही आपण तेवढ्याच प्रमाणात अनुभवत आहोत.
२. ‘भारतातील चैतन्यरूपी दैवी ठेवा जपणे’, हे आपले दायित्व असणे
भारतातील कणाकणात ते चैतन्य मुरलेले आहे. हा आपला दैवी ठेवा आहे आणि ‘तो जपणे’, हे आपले दायित्व आहे. हे विचार चालू असतांना ‘भारतभूमीच्या नकाशामध्ये तिच्या सर्व सीमा सोनेरी आहेत. जणू ते दैवी संरक्षक कवच भगवंताने या भूमीला दिले आहे’, असे मला वाटत होते.
‘आपल्या या भारतमातेचे मोल आणि तिचे अनंत उपकार प्रत्येक भारतियाच्या मनात जागृत होऊ दे अन् प्रत्येक भारतीय हिंदु राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी सज्ज होऊ दे. लवकरात लवकर या भूमीवर पुन्हा एकदा तोच दैवी आविष्कार ‘हिंदु राष्ट्रा’च्या रूपात येऊ दे’, हीच श्री गुरूंच्या चरणी प्रार्थना आहे.’
– कु. स्वाती गायकवाड (आताच्या सौ. स्वाती संदीप शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के)), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.६.२०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |