भक्तवत्सल श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णप्राप्तीची तीव्र ओढ असलेल्या गोपी यांची भक्तीमय रासलीला !

कार्यक्रमात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक कु. तेजल पात्रीकर यांनी रासलीला आणि गोपींचे आध्यात्मिक महत्त्व यांविषयी दिलेली माहिती

आज कोजागिरी पौर्णिमा ! आजच्या पावन दिवशीच द्वापरयुगात श्रीकृष्णाने त्याच्या परम भक्त गोपी आणि राधा यांच्या समवेत रासलीला करून त्या माध्यमातून गोपी अन् राधा यांना साधनेतील सर्वाेत्तम आनंदाची अनुभूती दिली होती.

१. अशी झाली गोपी आणि  भगवान श्रीकृष्ण यांची पवित्र रासलीला !

वृंदावनातील भगवान श्रीकृष्णाचे स्मरण जरी केले, तर आपल्याला आठवते ती रासलीला ! साक्षात् भगवंताच्या समवेत केलेली रासलीला ही त्याची एक लीलाच आहे. श्रीमद्भागवत महापुराणात महर्षि व्यासांनी वर्णन केल्याप्रमाणे त्या रात्री हा रासोत्सव चालू झाला आणि तो दिशा प्रकाशेपर्यंत, म्हणजे सकाळपर्यंत अविरत चालू होता. ‘साक्षात् भगवंताच्या समवेतचा तो रास किती अद्वितीय असेल !’, याची खरेतर शब्दांत मांडणी करता येत नाही. गोपींच्या भक्तीला ‘आदर्श भक्ती’ म्हणतात. मोहमायेपासून विरक्त असलेल्या गोपी आणि भगवान श्रीकृष्ण यांची रासलीला किती पवित्र असेल !

१ अ. श्रीकृष्णाने बासरीवर गोपींना प्रिय असणारे गीत वाजवण्यास प्रारंभ केला आणि तो ध्वनी गोपींच्या कानी गेला. भगवंत वाजवत असलेल्या वेणूच्या नादाने त्या देहभान विसरून आणि आपल्या सर्व कृती टाकून श्रीकृष्णाकडे धावत गेल्या.

१ आ. ‘घरदार सोडून माझ्याकडे येणे’, हा अधर्म आहे’, असे श्रीकृष्णाने गोपींना सांगणे आणि ‘भगवंत समोर असतांना मागे कशा जाऊ ?’, असे गोपींनी विचारणे : गोपी श्रीकृष्णाकडे आल्यावर त्याने गोपींना सांगितले, ‘‘रात्रीच्या वेळी आपले घरदार सोडून माझ्याकडे येणे’ हा अधर्म आहे.’’ भगवंताचे वचन ऐकून गोपींनी श्रीकृष्णाला सांगितले, ‘‘कृष्णा, हा जो सगळा उपदेश आहे, तो योग्यच आहे; परंतु सर्व कृतींचे लक्ष्य काय आहे ? तुझी प्राप्तीच ना ! भगवंता, आम्हाला तुझ्या भक्तीचे वेड लागल्यामुळे प्रत्यक्ष भगवंत, म्हणजे तू समोर असतांना आम्ही मागे तरी कशा जाऊ ?’’

१ इ. गोपींचे तीव्र मुमुक्षत्व पाहून भगवान श्रीकृष्णाने अध्यात्मातील ‘उत्तमाधिकारी’ म्हणून त्यांचा स्वीकार करणे : गोपींच्या या बोलण्यामुळे भगवंत अतिशय आनंदी होतो. भगवान श्रीकृष्ण गोपींचे तीव्र मुमुक्षत्व पाहून अध्यात्मातील ‘उत्तमाधिकारी’ म्हणून त्यांचा स्वीकार करतो. अनेक मोठे तपस्वी घरादाराचा मोह सोडू शकत नाहीत, तो मोह गोपींनी सोडला. त्यामुळे श्रीकृष्णाने अत्यंत कौतुकाने त्यांचा स्वीकार करून त्यांच्या समवेत रासलीला केली.

१ ई. गोपींची श्रीकृष्णप्राप्तीची ओढ तीव्र असणे : या सूत्रावरून आपल्याला हे शिकायला मिळते की, गोपींची श्रीकृष्णप्राप्तीची ओढ किती तीव्र होती ! भगवंताने त्यांना ‘परत जा’, असे सांगूनही त्या गेल्या नाहीत. देवाच्या परीक्षेत त्या उत्तीर्ण झाल्या आणि भगवंताच्या समवेत रासलीला करू शकल्या.

१ उ. भक्तवत्सल श्रीकृष्ण ! : या रासलीलेच्या वेळी लक्षावधी गोपींच्या समवेत तेवढीच रूपे धारण करून श्रीकृष्णाने रासलीला केली. ती करत असतांना गोपींची तेवढीच रूपे धारण करून श्रीकृष्ण तितकाच काळ त्या गोपींच्या पतींच्या समवेत होता.

२. व्यासांनी भागवत महापुराणात सांगितलेले रासलीलेचे आध्यात्मिक माहात्म्य !

रासलीलेचे आध्यात्मिक माहात्म्य सांगतांना व्यासांनी भागवत महापुराणात सांगितले आहे, ‘जो कुणी श्रद्धायुक्त होऊन गोपींच्या समवेत (व्रजबालांच्या समवेत) भगवान श्रीकृष्णाने केलेल्या रासलीलेचे श्रवण करतो आणि तिचे वर्णन करतो, त्याला भगवंताच्या चरणी परम भक्तीची प्राप्ती होते.’

३. राधा आणि गोपी यांची वैशिष्ट्ये

३ अ. ‘मधुराभक्तीद्वारे श्रीकृष्णाशी एकरूप झालेल्या गोपी ! : सुदामा, अर्जुन इत्यादी श्रीकृष्णाचे अनेक भक्त आहेत; परंतु त्यांतील राधा आणि गोपी यांचे महत्त्व विशेष आहे. त्या मधुराभक्तीद्वारे, म्हणजे ‘श्रीकृष्णच आमचा प्रियतम आहे’, या भावाने श्रीकृष्णाशी एकरूप झाल्या होत्या.

अनेक जण राधा-कृष्णाच्या संबंधाच्या संदर्भात टीका करतात. श्रीकृष्णाच्या संदर्भात बरे-वाईट बोलले जाते; परंतु प्रत्यक्षात त्या वेळी श्रीकृष्णाचे वय केवळ ८ वर्षे होते आणि गोपी वयाने मोठ्या होत्या.

४. गोपींप्रमाणे श्रीकृष्णभक्ती करण्याचा संकल्प करूया !

द्वापरयुगात आजच्या दिवशीच रासलीला झाली होती. आपणही आजच्या या पावन दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीत आपले पुढील जीवन व्यतीत करण्याचा, म्हणजेच गोपींप्रमाणे साधना करत श्रीकृष्णभक्ती करण्याचा आज संकल्प करूया.

– कु. तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, संगीत विशारद), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा (१८.१०.२०२१)