युरोप येथील पू. देयान ग्लेश्चिच यांना ‘स्वतःमध्ये रामराज्याची स्थापना कशी  करायची ?’, याविषयी ईश्वराने केलेले मार्गदर्शन

‘एक दैदिप्यमान राजप्रासाद संयमाने कुणाची तरी प्रतीक्षा करत आहे. या निर्मनुष्य प्रासादात सर्वत्र शांती आहे. या प्रासादाचे तेज विश्वाच्या कानाकोपर्‍यात पसरले आहे. मी या प्रासादाच्या जवळ जाऊन त्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला; पण दुर्दैवाने त्याची प्रवेशद्वारे माझ्यासाठी उघडली नाहीत. त्या वेळी माझे आणि ईश्वराचे सूक्ष्मातून पुढील संभाषण झाले.

पू. देयान ग्लेश्‍चिच

मी : हे ईश्वरा, मी ज्या राजप्रासादासमोर उभा आहे, तो कुणाचा आहे ?

ईश्वर : तुझ्या लक्षात आले नाही का ? हा ईश्वरी राज्यातील राजप्रासाद आहे. यातील सिंहासन केवळ एकाच व्यक्तीची वाट पहात आहे. ही व्यक्ती आदर्श मानव, आदर्श मित्र, आदर्श मुलगा, आदर्श भाऊ आणि आदर्श राजाही आहे. परिपूर्णतेचे दैवी रूप असलेली ही व्यक्ती म्हणजे एकमेवाद्वितीय भगवान राम आहे. त्याच्या आगमनाने अखिल ब्रह्मांडात ईश्वरी राज्याची स्थापना होणार आहे आणि हा प्रासादही त्याच्याच प्रतीक्षेत आहे.

मी : देवा, मलाही या प्रासादात निवास करायचा आहे; पण स्वभावदोष आणि अहं यांमुळे माझे मन अशुद्ध झाले आहे. माझ्यात पुष्कळ उणिवा आहेत. त्यामुळे मी आदर्श आचरण करत नाही. असे असूनही मला या सुंदर प्रासादात रहायची पुष्कळ इच्छा आहे. देवा, ‘या प्रासादात प्रवेश मिळावा’, यासाठी मी काय करू ?

ईश्वर : माझ्या प्रिय साधका, हे अत्यंत सोपे आहे. तू या प्रासादात प्रवेश करू शकत नाहीस; पण भगवान राम निश्चितच यात प्रवेश करू शकतो. त्यामुळे तुझे मन, बुद्धी आणि विचार यांमध्ये भगवान रामाला प्रस्थापित कर. तुझे विचार, भावना आणि कृती निर्मळ कर अन् स्वतःच्या अंतरंगात रामराज्याची स्थापना कर. हे घडल्यावर या राजप्रासादाची द्वारे तुझ्यासाठी स्वतःहून उघडतील.’

– पू. देयान ग्लेश्चिच, युरोप (२५.६.२०२०)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक