कार्तिक वारी पूर्ववत् करण्यासाठी अखिल भाविक वारकरी मंडळाचे निवेदन !

निवासी उपजिल्हाधिकार्यां ना निवेदन देतांना अखिल भाविक वारकरी मंडळाचे पदाधिकारी

सोलापूर, २३ ऑक्टोबर (वार्ता.) – कोरोना संसर्गामुळे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या सर्व परंपरांवर निर्बंध घालण्यात आले होते. आता ते सर्व निर्बंध शिथिल करून महाराष्ट्रातील सर्व वारकर्‍यांचे श्रद्धास्थान असणारी कार्तिकी वारी सध्या पूर्ववत् चालू करण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे, या मागणीचे निवेदन ‘अखिल भाविक वारकरी मंडळा’च्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी माया पवार यांना देण्यात आले.

या वेळी अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे, राष्ट्रीय सचिव ह.भ.प. बळीराम जांभळे, वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष ज्योतीराम चांगभले, वारकरी मंडळाचे जिल्हा सचिव ह.भ.प. मोहन महाराज शेळके, वारकरी मंडळाचे सोलापूर शहराध्यक्ष संजय पवार यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की,

१. दिंड्या आणि पालखी सोहळा पूर्ववत् करून पंढरपूर येथील ६५ एकरमध्ये असणार्‍या सर्व सोयीसुविधा आणि त्या ठिकाणी उपलब्ध असलेली जागा वारकर्‍यांना देण्यात यावी. चंद्रभागा नदीचे स्नान, पंढरपूर नगर प्रदक्षिणा, वारकरी संप्रदायाच्या सर्व परंपरा पूर्ण करण्यासाठी अधिकृत अनुमती देऊन सहकार्य करावे.

२. शासनाने कार्तिक वारीला अनुमती न दिल्यास अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन केले जाईल.