आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेत परीक्षा केंद्रांवरून गोंधळ !

साधी परीक्षा घेऊ न शकणारे प्रशासन नागरी सुविधेच्या अन्य गोष्टी कशा करत असेल ? याची कल्पना येते. वारंवार अशा घटना घडूनही याविषयी संबंधितांवर कठोर कारवाई का केली नाही ? प्रशासनाची स्थिती असंवेदनशील असल्यामुळे लोकांचा त्यावरील विश्वासच उडाला आहे.

पुणे – राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या पद भरतीसाठी २४ ऑक्टोबर या दिवशी परीक्षा आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना सभागृह (हॉल) तिकिटावर परीक्षेचे केंद्र अन्य जिल्ह्यांतील आले आहे. गडचिरोलीतील उमेदवारांना पुण्याचे, तर पुण्यातील उमेदवारांना नाशिक, जळगाव येथील परीक्षा केंद्र मिळाले आहे. दोन पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना सकाळी एका जिल्ह्यात, तर दुपारी दुसर्‍या जिल्ह्यात परीक्षेचे केंद्र दिले आहे. काही पदांसाठी परीक्षा शुल्क भरले नसतांनासुद्धा त्यांना सभागृह (हॉल) तिकीट दिले आहे. या सर्व प्रकारामुळे उमेदवार आणि पालक संतापले असून परीक्षा केंद्र निवडीवरून पुन्हा एकदा गोंधळ झाला आहे. आरोग्य विभागाच्या पदभरतीसाठी ‘न्यासा’ या आस्थापनाकडून परीक्षा घेण्यात येत आहे; मात्र सभागृह तिकिटामध्ये झालेल्या या गोंधळामुळे उमेदवाराने संबंधित आस्थापनाला धारेवर धरत हे आस्थापन निवडल्याविषयी राज्य सरकारच्या आरोग्य विभागावरही टीका केली आहे. सभागृह तिकिटाच्या या गोंधळामुळे परीक्षेसाठी ‘साहाय्य क्रमांक’ उपलब्ध करून देण्याची मागणी युवा सेनेचे कल्पेश यादव यांनी आरोग्य विभागाकडे केली असून ‘लवकरच ‘साहाय्य क्रमांक’ कार्यान्वित करण्यात येईल’, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे.